अल्पावधीत मार्केटिंग क्षेत्रात नाव कमावणार्या आणि अनेकविध उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणार्या लघु उद्योजिका प्रिती दूधमांडे- निवर्गी यांचा हा जीवनप्रवास...
एखाद्या वस्तूंचे केवळ उत्पादन करून उपयोग नाही, तर त्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांची विक्रीदेखील करता आली पाहिजे. आजकाल मार्केटिंग मॅनेजमेंट क्षेत्रातील नोकर्यांची मागणीदेखील खूप वाढली आहे. डोंबिवलीतील प्रीती दूधमांडे-निवर्गी यांना लहानपणापासूनच वस्तूची विक्री करण्याची आवड आहे. त्यांच्या या आवडीलाच त्यांनी करिअर म्हणून निवडले आहे. त्यात त्या यशस्वीदेखील झाल्या आहेत. या लघुउद्योजिकेच्या प्रवासावर टाकलेला, हा प्रकाशझोत.
प्रीती यांचे बालपण डोंबिवलीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण टिळक नगर शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पेंढरकर महाविद्यालयातून ‘बीए’चे शिक्षण पूर्ण केले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या बालपणात कोणताही संघर्ष नव्हता. प्रीती यांचे बालपण खूप आनंदात गेले. त्या आईच्या खूप लाडक्या होत्या. प्रीती यांना एक लहान भाऊ आहे. त्या दोघांचे ‘बॉण्डिंग’ ही खूप छान आहे. महाविद्यालयामध्ये असताना त्या उज्ज्वला कारंडे यांच्या लाडक्या विद्यार्थिनी होत्या. आर्थिक परिस्थिती चांगली असली, तरी वस्तूची विक्री करण्याची प्रीती यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इयत्ता आठवीत असतानाच प्रीती त्यांच्या आईवडिलांच्या कार्यालयात जाऊन पर्स विकत असे. प्रीती यांचे वडील जयवंत हे सरकारी नोकरीत होते. आई स्मिता यादेखील मुंबईत नोकरी करीत होत्या. त्यामुळे पर्स विकण्यासाठी प्रीती या मुंबईत जात असे. प्रीती यांच्या वडिलांना मार्केटिंगची आवड होती. त्यांच्याकडूनच प्रीती यांना मार्केटिंगचा वारसा मिळाला. प्रीती यांनी पदवी संपादन केल्यानंतर नोकरीकडे वळल्या.
‘टेली मार्केटिंग’मध्ये प्रथम नोकरी केली. तिथे त्यांचे लक्ष्य त्या लवकर साध्य करीत असत. ‘बॅक ऑफिस’मध्ये त्यांनी दहा वर्षे नोकरी केली. नोकरी करीत असतानाच त्या विविध उत्पादनांची विक्री करीत असे. त्यांचे मन नोकरीत फारसे रमत नसल्याने, त्यांनी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या आईला कर्करोग आणि सासूबाईंना डायलेसिस करावा लागत असे. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीमुळे ही त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या परिचयाच्या आणि मित्रमैत्रिणींकडून त्यांना उत्पादन विक्री करण्याबाबत सूचविण्यात आले. त्यानुसार त्यांनी २०१६ पासून व्यवसायात उतरल्या. प्रीती यांनी तयार केलेल्या चकलीला विशेष मागणी आहे. प्रीती या खुसखुशीत चकली सोबतच चिवडा ही तयार करतात. या कामात त्यांना त्यांच्या मैत्रिणींचीदेखील मदत होते. पण, प्रीती यांचा मुख्य उद्देश वस्तूंची विक्री करण्याकडे अधिक असतो.
प्रीती यांचा २००४ साली अमित निवर्गी यांच्याशी विवाह झाला. अमित हे शेअर मार्केटमध्ये काम करतात. शेअर मार्केटमध्ये नेहमीच चढ आणि उतार सुरू असतात. त्यामुळे एकाच्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाढा हाकता येणार नाही, असा विचार करून प्रीती या कॅटरिंग व्यवसायात आल्या. त्या चकली आणि चिवडा करून विकू लागल्या. कॅटरिंग व्यवसायाची सुरुवात त्यांनी खरवस विकून केली. त्यांच्या गुळामध्ये तयार केलेला खरवसाला खवय्यांकडून विशेष मागणी आहे. ग्राहकांना उत्तम चव, पदार्थामध्ये नावीण्य आणि उत्तम दर्जा हवा असतो. ग्राहकांना ज्या गोष्टी हव्या आहेत. त्या पुरविण्याचे काम आपण करावे, या उद्देशाने त्या उत्पादन विक्री करीत आहेत. त्यासाठी त्या सोशल मीडियाचादेखील वापर करतात. अनेकदा उत्पादकांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत सॅम्पलच्या माध्यमातून पोहोचवितात. उत्पादकांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा काम त्या करतात. अनेक महिला वस्तू तयार करतात. पण, त्यांना त्यांची विक्री कशी करावी, हे समजत नाही. तसेच, वस्तूंची विक्री करण्यासाठी वेळ ही कमी पडतो, अशावेळी उत्पादन प्रीती यांच्याकडे देऊन त्या निश्चिंत होतात. कारण, त्यांच्या मालाची विक्री होणार, यांची त्यांना खात्री असते.
प्रीती या सुरुवातीला स्वतः वस्तूची विक्री करीत असे. त्यानंतर मागणी वाढू लागल्यावर त्यांनी मदतनीस ठेवला. वांद्रे, विलेपार्ले, करी रोड, अंधेरी, ठाणे, मुलुंड, भांडुप, डोंबिवली अशा विविध ठिकाणी जाऊन त्या उत्पादनाची विक्री करीत असे. प्रीती या डोंबिवलीतील ‘ब्राह्मण उद्योजक’ या संघटनेच्या सदस्या आहेत. यावेळी अनेक उद्योजकांशी त्यांचा संपर्क येतो. त्यांच्याशी संवाद साधल्यावर ग्राहक मिळत नसल्याने व्हॉट्सअॅप स्टेटस्वर त्यांची जाहिरात करावी. प्रीती सध्या पाच उद्योजकांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिला आहे. त्याबरोबर स्वतःचा कॅटरिंग व्यवसाय ही सांभाळत आहे. महिन्याला २५ किलो खरवस, ९० ते १०० किलो मूग चकली आणि १५ किलो भाजणी चकली विकत आहेत. जास्तीत जास्त लोकांना बाजारपेठ मिळवून देणे, हा त्यांचा मानस आहे, अशा या हरहुन्नरी उद्योजिकेला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा.