मुंबई (विशेष प्रतिनिधी): नाशिकमधील रस्त्यावर काही महिन्यांपुर्वी आढळलेल्या गिधाडावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. पांढऱ्या पुट्ठ्याचे गिधाड ही दुर्मिळ असलेली प्रजात वाचविण्यात पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला यश मिळाले आहे.
नाशिकमधील रस्त्यावर दि. २ जून रोजी एक पांढऱ्या पुट्ठ्याचे गिधाड (White rumped vulture) थकलेल्या अवस्थेत आढळुन आले होते. त्या गिधाडाचा बचाव करण्यासाठी त्याला उचलुन रेस्कयू नाशिक विभागाने त्वरित प्रथमोपचार केले. वाहतुकीसाठी स्थिरस्थावर आणल्यानंतर त्याच रात्री या गिधाडाला रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पुण्यातील केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. निदानात गिधाडाच्या डाव्या पायात फ्रॅक्चर असल्याचे लक्षात आले. तसेच, फुप्फुसातुन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे ही उघडकीस आले. या गिधाडावर त्वरित उपचार सुरू केले गेले आणि ऍन्टिबायोटिक आणि फ्लुईड थेरपीमुळे ३ ते ४ दिवसांनी त्याची परिस्थिती आणखी सुधारली. त्यानंतर ते पुन्हा खायला लागले.
पायात फ्रॅक्चर असल्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली व त्या नंतर त्याची अगदी निगुतीने काळजी ही घेतली गेली. आणि पुढे या गिधाडाच्या पुनर्वसनाचा प्रवास सुरु झाला. पायाची जखम आणि शस्त्रक्रियेनंतर गिधाडाला त्याचा आत्मविश्वास परत मिळवायला बराच वेळ जावा लागला. या गिधाडाला काही काळ प्री-रिलीझ एव्हीयरी मध्ये ठेवण्यात आले होते. चाचण्यांदरम्यान या गिधाडाची झाडांच्या फांद्यांवर बसण्याची उंचीची पातळी वाढत होती. उड्डाणाच्या यशस्वी चाचण्या पुर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी तयारी केली. गुरूवार दि. २८ सप्टेंबर रोजी या गिधाडाला नाशिक इथेच पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
मुळातच दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या गिधाडाच्या प्रजातींमधील व्हाईट रम्पड व्लचर म्हणजेच पांढऱ्या पुट्ठ्याचे गिधाड गंभीरपणे धोक्यात असलेली प्रजात आहे. त्यामुळेच गिधाड संवर्धनातील अशा प्रकारच्या (रेस्क्यू) बचावकार्यांमध्ये लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.