आज एक नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचं थोडं अतरंगी टायटल आहे, " तीन अडकून सिताराम" हे या चित्रपटाचे नाव! हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. या प्रकारचा सिनेमा मला नाही वाटत, मराठी मध्ये या आधी आलाय खरं म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा असा सिनेमा पाहिलेला नाही. त्याचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी आपल्याला माहितीच आहेत. एक उत्तम दिग्दर्शक आहेत, आणि स्वतः एक उत्कृष्ठ अभिनेते देखील आहेत. ' हटके ' सिनेमे देण्यासाठी ते नावाजलेले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा एक अतिशय सुंदर आणि मस्त सिनेमा आपल्यासाठी आणला आहे.
ह्या सिनेमात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे ह्या तिघांनी तरुण आणि अवखळ त्रिकुट मस्त सादर केले आहे.त्यांच्या बरोबर आनंद इंगळे आणि इतरही मान्यवर कलाकार आहेत. हीरोइन आहे प्राजक्ता माळी तिने फारच छान काम केलय. एक मॉडर्न आणि attitude असलेली सुंदर तरुणी तिने उत्तम सादर केली आहे. तसंच दुसऱ्या एका मुलीचा विशेष उल्लेख करावा लागेल. 'गौरी देशपांडे' हिने फार सुंदर काम केलय. तिचे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मधले रोल्स ह्या सिनेमात पाहताना ती अतिशय convincing अनुभव देऊन जाते. स्वतः दिग्दर्शक हृषिकेश जोशी देखील एका अफलातून भमिकेत येऊन एकच धमाल उडवून देतात!
पण या सिनेमाचं मुख्य वैशिष्ट्य सांगायचं तर हा सिनेमा सस्पेन्स व कॉमेडीचा उत्तम मिलाफ आहे आणि त्यामध्ये अतिशय वेगवान रीतीने घटना घडतात, त्यासुद्धा एका अनपेक्षित वळणाने आपल्याला सदिव चकित करतात. त्यातील ॲक्शन मध्ये तुमच्या मनात असलेली घटना वेगळ्याच रूपाने समोर येते. त्यामुळे प्रेक्षक सिनेमात संपूर्ण वेळ गुंतून राहतो.
तीन तरुण मुलं आणि एक तरुणी ह्यांच्यावर ओढवलेले एकामागून एक भयंकर प्रसंग, हे या सिनेमाचं मुख्य कथानक आहे आणि हा सिनेमा आजच्या तरुणाईवर आधारित असल्यामुळे भारताचे उसळते तारुण्य आणि त्यांची 'डेव्हिल मे केअर एटीट्यूड', " देखा जायेगा निपट लेंगे" हे फार चांगल्या तऱ्हेने दाखवले आहे. आजच्या तरुणाईला हा सिनेमा अतिशय आवडेल, त्यात पुन्हा याचं बहुतांश शूटिंग इंग्लंडमध्ये झाल आहे आणि त्यात फार सुंदर लोकेशनस् पाहायला मिळतात. त्यात पुन्हा गंमत म्हणजे इंग्लंडचे एका कालचं साम्राज्य आणि आता अगदी मोडकळीला आलेला देश, तो भाग सुद्धा यात अतिशय चांगल्या आणि हळुवार पद्धतीने मांडलेला आहे सिनेमा मधला उपहास आणि त्यातून निर्माण झालेला विनोद हे तर एका उच्च दर्जाचा अनुभव देतात.
अगदी त्या राजकीय पक्षांना दिलेली नावे " के एल पी डी आणि बीसीएमसी" ही सुद्धा आपल्याला प्रचंड हसायला लावतात हा सिनेमा त्यातल्या उत्तम कथानक, अतिशय वेगवान आणि चांगल्या प्रतीचे दिग्दर्शन ह्यामुळे आपल्याला खूप आवडेल. संगीताचा बाज सुद्धा फार चांगला सांभाळला गेलाय. त्यातलं शेवटचं जे गाणं आहे "दुनिया गेली तेल लावत", ते सुद्धा अतिशय छान जमलेलं आहे एका अर्थाने हा सिनेमा म्हणजे आजच्या भारताचा तारुण्याचा अविष्कार आहे असंच म्हणता येईल असाच म्हणता येईल.
" तीन अडकून सिताराम" हा सिनेमा आजच्या उसळत्या तरुणाईच चित्रण आहे त्यामुळे भारताच्या पुढील शक्तिमान आणि उत्साही भवितव्याचा एक प्रतीक म्हणून सुद्धा हा सिनेमा बघायला हरकत नाही. मी तर नक्कीच सांगेन की आपण सर्वांनी, शरीराने आणि मनाने तरुण असलेल्यांनी, हा सिनेमा नक्कीच पाहिला पाहिजे एकदम 'पैसा वसूल, पिक्चर!
- चंद्रशेखर नेने