नेहरू सेंटर कलादालनात छायाचित्रांचे प्रदर्शन

29 Sep 2023 16:58:25

nehru art gallery 
 
मुंबई : नांदेड येथील प्रसिद्ध डॉ. अनिल साखरे व डॉ. सुशील राठी यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर कलादालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांना दि. २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२३ हया दरम्यान रोज सकाळी ११ ते ७ हया वेळेत पाहायला मिळणार आहे. डॉ. अनिल साखरे हे स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि डॉ. सुशील राठी हे युरोलॉजिस्ट आहेत. दोघेही नांदेडचे रहिवाशी आहेत. दोघेही हौशी छायाचित्रकार असून आपला व्यवसाय सांभाळून छंद म्हणून केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले आहे. सदर प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळांची, गौंड व नथुरा या आदिवासी जमातींची पारंपारिक वेशातील तसेच वन्यजीव व पक्षी यांची विविध व विलोभनीय छायाचित्रे रसिकांना पहायला मिळणार आहेत.
 
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा नांदेड जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. नांदेडला नंदीग्राम म्हणूनही नाव देण्यात आले आहे. जगभरातील पर्यटकांना नांदेड जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा आणि वन्यजीवांची माहिती व्हावी या हेतूने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली माहुरची रेणुकामातेचे मंदिर, माहुरचा किल्ला, शिखांचे शेवटचे गुरु व शिख पिलिग्रामांचे सर्वात मोठे ठिकाण गुरु गोविंदसिंहजी यांचा गुरुद्वारा, ३०० वर्षाचा इतिहास असलेली मालेगाव यात्रा, कंधार येथील प्राचीन भुईकोट किल्ला, ११०० वर्ष जुने देगलूर (होट्टल) येथील सिद्धेश्वर मंदिर अशी अनेक नांदेडची प्रेक्षणीय स्थळे तसेच गौंड आणि नथुरा या आदिवासी जमातींची पारंपारिक वेशातील छायाचित्रांचाही समावेश आहे. तसेच नांदेडला काही जंगल व गवताळ प्रदेश असून त्यात टिपलेली वन्यजीव व पक्षी यांची विलोभनीय छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन रसिकांना दि. २ ऑक्टोबरपर्यन्त ११ ते ७ या वेळेत विनामूल्य पाहायला मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0