सांगली : संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आज विसर्जनादरम्यान सांगलीतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणटामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या दोन स्वतंत्र घटना असून दोन्ही घटना सांगली जिल्ह्यात घडल्या आहेत.
यात तासगाव तालुक्यातील शेखर पावशे आणि वाळवा तालुक्यातील प्रविण शिरतोडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघेही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, डीजेच्या दणदणटामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
यातील शेखर पावशेची १० दिवसांपुर्वीच एंजिओप्लास्टी झाली होती. तर प्रविण शिरतोडे मिरवणूकीतच चक्कर येऊन पडला. दरम्यान, या घटनेमुळे डीजे तयार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच मृत्यू झालेल्या युवकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
डिजेचा दणदणाटामुळे मृत्यू होतो का?
ज्या लोकांना पुर्वीपासूनच हृदयाचा आजार आहे अशा लोकांचे ध्वनी प्रदुषणामुळे ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी जोरात आवाज असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे, असे तज्ञांकडून सांगण्यात येते.