भारतीय जनता पक्षाच्या रुपाने तामिळनाडूच्या जनतेला बिगर द्रविड राजकीय पक्षाचा पर्याय उपलब्ध होत आहे. तेथील जनता द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांच्या तामिळी अस्मितेच्या राजकारणाला विटली आहे. त्या राज्यातही हिंदुत्वाचा विचार पसरत असून, स्टॅलिनपुत्र उदयनिधीच्या सनातनविरोधी वक्तव्यांनी या हिंदुत्वाच्या विचाराला नवे बळ प्राप्त झाले आहे. आता भाजपचा हिंदुत्त्वाचा विचार तेथे पाय रोवत असून, त्याचा अनुकूल परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.
तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाची असलेली युती सध्या तरी संपुष्टात आली आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांच्याबरोबरच माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी भाजपबरोबर असलेली युती मोडली. नुकत्याच या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपशी असलेली निवडणूक युती संपुष्टात आणण्याचा आणि भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले असून, त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. तामिळनाडूतील भाजपचा एकमेव मित्रपक्ष त्याच्यापासून दुरावला गेल्याचे पाहून विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या, तरी ही युती मोडल्याचा भाजपला खरोखरच फटका बसणार आहे का, याचा थोडा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.
अण्णादुराई हे हिंदुत्वविरोधी होते आणि पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयात सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती, अशी वक्तव्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी अलीकडेच केली होती. पक्षाच्या नेत्यांविरोधातील ही वक्तव्ये ऐकून अण्णाद्रमुकचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी नेतृत्वावर दबाव आणून ही युती मोडली. निवडणुकीपूर्वी नवे मित्रपक्ष जोडले जाणे आणि क्वचितप्रसंगी विद्यमान मित्रपक्षांची साथ सुटणे, या गोष्टी निवडणूक प्रक्रियेचा भाग आहेत. ज्याप्रमाणे निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने पक्षाचे नेते आणि आमदार-खासदार हे दुसर्या पक्षात जातात, त्याचप्रमाणे आपल्या हितसंबंधांना धोका उत्पन्न होत असल्याचे पाहून पक्षही नव्या आघाड्या शोधतात. तामिळनाडूतील राजकारणात बिगर तामिळ पक्षांना कोणतेही स्थानच उरलेले नाही. इतकेच नव्हे, तर तामिळनाडूत विविध समाजांचेही (म्हणजे जातींचे) छोटे-छोटे पक्ष स्थापन झाले आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या द्रविडी पक्षांच्या, तामिळ अस्मितेच्या राजकारणाला जनता विटली आहे.
पण, त्यांना अन्य पर्यायच उपलब्ध नव्हता. आता भाजपच्या रुपाने तिथे एक पर्याय उभा राहू पाहत आहे. भाजपला आपला हिंदुत्वाचा विचार तामिळ भूमीत रुजविण्यासाठी एका समर्थ स्थानिक नेत्याची गरज होती. स्थानिक नेतृत्वाखेरीज कोणत्याही राज्यात एखादा पक्ष उभा राहू शकत नाही. उत्तम वक्तृत्व, हिंदुत्ववादी विचारांवर विश्वास, जनमानसात पाया आणि लोकप्रियतेचे वलय लाभलेल्या एका नेत्याच्या शोधात भाजप होता. के. अण्णामलाई यांच्या रुपाने भाजपला तेथील आपला प्रतिनिधी मिळाला आहे. भाजपचे विचार आणि धोरणांना अस्खलित तामिळ भाषेत समजावून सांगण्याच्या अण्णामलाई यांच्या धोरणामुळे सामान्य जनतेला भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारांची ओळख होत चालली आहे. तामिळनाडूत हिंदुत्वाबद्दल आस्था असलेला मोठा वर्ग आहे, त्याला आता भाजप हा नवा आधार सापडला आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून तामिळ संस्कृतीला उत्तर भारतात, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर ठळक स्थान आणि प्रसिद्धी देण्याचा हेतूतः प्रयत्न चालविला आहे. नव्या संसदेत सेंगॉलची स्थापना करणे आणि काही महिन्यांपूर्वी वाराणसीच्या काशीविश्वनाथ मंदिरात ‘तामिळ संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करणे, ही त्याची दोन ठळक उदाहरणे. त्यामागे तामिळनाडूतील हिंदुत्ववादी मतदारांना आपल्या पक्षामागे एकवटण्याचा हेतू होता. भाजपला आतापर्यंत त्या राज्यात एकही जागा (एकदा अपवाद) जिंकता आलेली नाही. तामिळनाडूत हिंदुत्ववादी विचारांना असलेला आधार एकवटण्यासाठी कर्नाटक सोडल्यास विंध्याचलाच्या दक्षिणेकडे भाजपला आजवर राजकीय यशाने हुलकावणीच दिली. केरळ विधानसभेत तीन-चार जागा मिळाल्या, तरी लोकसभेत भाजपला नेहमीच पराभव स्वीकारावा लागला.
तेलंगणमध्ये भाजपला बर्यापैकी जनाधार असला, तरी विधानसभेत म्हणण्यासारख्या जागा निवडून येत नव्हत्या. आंध्र प्रदेशातही तीच स्थिती होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपचा जनाधार हळूहळू वाढत असला, तरी त्याचे रुपांतर विधानसभा किंवा लोकसभेच्या जागांमध्ये होत नव्हते. तामिळनाडू हे तर जणू भाजपच्या परिघाबाहेरील राज्य ठरले होते. पण, गेल्या पाच-सहा वर्षांपासून तामिळनाडूत हिंदुत्ववादी विचारसरणीला असलेल्या पाठिंब्यात वाढ होत असल्याचे दिसून येत होते. काही दिवसांपूर्वी स्टॅलिनपुत्र उदयनिधी याने सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संकल्पनेच्या बाजूने मोठी लाट आली. अडचणीत सापडल्यावर सर्वप्रथम हिंदुत्व आणि सनातन धर्माविरोधात टीका करण्याचे द्रमुक नेत्यांचे तसे जुनेच धोरण. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी काही महिन्यांपूर्वी द्रमुकच्या आर्थिक भ्रष्टाचार दाखविणार्या टेप प्रस्तुत केल्या होत्या; तसेच द्रमुकविरोधात राज्यव्यापी पदयात्राही काढली होती.
त्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. राज्यात आपल्याला आव्हान देणारा नवा पक्ष उभा राहत असल्याचे पाहून द्रमुकचे नेते बिथरले. म्हणूनच त्यांनी सनातनविरोधी वक्तव्य केले होते. उलट त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांना बळ प्राप्त झाले असून, येत्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत भाजपला ‘बोनस’ मिळेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपबद्दल सामान्य हिंदुत्ववादी मतदारांमध्ये आकर्षण वाढत असल्याची लक्षणे दिसत असली, तरी त्यामुळे भाजपची लाट येणार नाही. पण, मतदारांचा पाया अधिक विस्तृत आणि भक्कम होऊ शकतो. किंबहुना, राज्याच्या राजकारणात भाजपची दखल घ्यावी लागेल, इतपत त्याचा दबदबा निर्माण होईल, अशी चिन्हे आहेत.
अण्णामलाई यांना आपल्या या वक्तव्यांमुळे अण्णाद्रमुक एनडीएतून बाहेर पडेल, याची कल्पना नव्हती असे म्हणणे, हा त्यांच्या राजकीय समजशक्तीचा अपमान करणे ठरेल. तरीदेखील त्यांनी हेतूतः अशी वक्तव्ये केली आहेत. त्यामागे मतदारांमध्ये भाजपची आणि बिगर द्रविड विचारसरणी रुजविण्याचा हेतू आहे. या हिंदुत्ववादी मतदारांमध्ये भाजप हा आपला पक्ष आहे, अशी भावना निर्माण करणे हाही त्यांचा हेतू होता. दुसरे असे की, अण्णाद्रमुककडे सध्या करिष्मा असलेल्या नेत्यांचा अभाव आहे आणि पक्ष अंतर्गत दुफळीने कमकुवत झाला आहे. आता त्याने भलेही भाजपची साथ सोडली असली, तरी द्रमुकशी एकट्याच्या बळावर लढण्याची त्याच्यात ताकद उरलेली नाही, हे सत्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तो पुन्हा एनडीएमध्ये दाखल होऊ शकतो.
राहुल बोरगांवकर