गणपतीचे वैदिक शुध्द स्वरूप

    27-Sep-2023
Total Views |
Article On Anant Chaturdashi Ganeshotsav

आज अनंत चतुर्दशी. गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणून निरोप देण्याचा भावनिक क्षण... असा हा बाप्पा सर्वदेशी व्यापला आणि सर्वांच्याच अंतःकरणी इतका रुजला व रमला आहे, की त्याच्या विना आम्हाला सर्व काही सुनेसुने वाटते. पण, दुर्दैवाने ज्या विशुद्ध भावनेने या उत्सवाची सुरुवात केली गेली, तो मूळ उद्देशच बाजूला पडल्याचे दिसते. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीत श्री गणेश अथवा गणपती या इष्टदेवतेचे मूळ शुद्ध स्वरूप आहे तरी कसे, हे जाणून घेणे अगत्याचे ठरते.

ज्ञानेश्वर माऊलींनी ‘वेद प्रतिपाद्या’ असा उल्लेख केल्याने सर्व प्रकारच्या विद्यांचे आध्यात्मिक व भौतिक ज्ञानाचे आद्य वेध हेच आहेत, असे सिद्ध होते, तर दुसर्‍याच चरणात त्यांनी त्या महान ईश्वराला ’गणेश’ या नावाने संबोधले आणि म्हटले की, ‘देवा तूंचि गणेश। सकळार्थ मतिप्रकाश॥’ अर्थात हे देवा, तू वैदिक वाङ्मयातील संपूर्ण अर्थांच्या ज्ञानाचा प्रकाशक आहेस. तुझे नाव गणेश होय. पण, हा गणेश म्हणजे सार्‍या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता असून, प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंतःकरणाला जागृत करणारा आणि सर्वांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा एकमेव ईश्वर होय. हा सर्वव्यापी, सर्वांतर्यामी आणि सर्वशक्तिमान आहे. त्याची सत्ता सर्वत्र विद्यमान आहे. पुढे १६व्या अध्यायात शेवटी माऊली म्हणतात की, ‘याकारणे पैं-बापा। जया आथी आपली

कृपा। तेणें वेदांचिया निरोपा ।आन न कीजे॥’
वेदांत यत्र तत्र गणेश किंवा गणपतीचे वर्णन आढळते. पण, यातील श्रीगणेशाचे स्वरूप अतिशय शुद्ध स्वरूपात रेखाटले आहे. गणपतीविषयीचा वेदांचा दृष्टिकोन पाहता, नंतरच्या व्यवस्थेने व तत्त्वचिंतकांनी श्रीगणेशाला कोणकोणत्या स्वरुपात अभिव्यक्त केले, हेदेखील जाणून घेणे गरजेचे ठरते. सध्या आपण जे गणेशोत्सवाचे स्वरूप पाहत आहोत, ते पुराण ग्रंथातील! याच पुराण वाङ्मयात आपणास श्रीगणेशाचे दर्शन वेगवेगळ्या कथांमधून घडते.

बहुतांशी काल्पनिक घटनाप्रसंगदेखील या पुराणात जोडल्याचे निदर्शनास येते. १८ पुराणातील ब्रह्मवैवर्त पुराण, मत्स्यपुराण, शिवपुराण, वराहपुराण, गणेशपुराण, स्कंदपुराण यांमध्ये थोड्याफार फरकाने गणेश, गणपती किंवा गजाननाविषयी कथानके आढळतात. व्यापक विचार केला तर महाभारताच्या आदिपर्वात श्रीगणेशाचा उल्लेख आढळतो. म्हणूनच तो ऐतिहासिक पुरूष असावा. यात वर्णिल्याप्रमाणे हा गणेश मालती नदीच्या किनार्‍यावर राहणारा होता. त्याकाळी महादेव किंवा शिव हे तपस्वी व योगी पुरूष ओळखले जात, तर त्यांची पत्नी पार्वती हेदेखील खूपच महान विदुषी व योगिनी होती. याच तपस्वी साधक दाम्पत्याच्या पोटी श्रीगणेश जन्माला आले. ’यथा माता-पिता तथा पुत्र’ याप्रमाणे गणेश हादेखील विद्वान व तपस्वी होता, हे सांगणे नको! त्याचबरोबर ‘गणेशगीता’ नावाचे राजयोगावरील पुस्तक आजदेखील उपलब्ध आहे. यामुळे याच ज्ञानयोगी गणेशाने हेदेखील पुस्तक लिहिले असावे, असा तर्क मांडण्यात येतो. याच गणेशाकडे लघुलेखनाचे कौशल्य होते.

म्हणूनच महाभारताचे रचनाकार महर्षी व्यासांनी आपल्या ’जय’ (नंतर ’भारत’ व शेवटचे ’महाभारत’हे नामाभिधान) या महाकाव्य ग्रंथासाठी लिपीबद्ध करण्यास या आशुलेखकाची नियुक्ती केली होती. तसेच याच गणेशाने नंतर ’श्रीमद्भगवतगीता’ या सर्वश्रेष्ठ ज्ञानग्रंथाचेदेखील लेखन केले, असे समजते. कदाचित पुढे या शिव(शंकर)- पार्वती पुत्र श्रीगणेशाचे कथानक पुराणवाङ्मयात वापरले असावे. पुराण ग्रंथात कल्पनाविलास अधिकच! त्यामुळे विविध देवी- देवतांची वर्णने काव्यात्मक असल्याने ती अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष इत्यादी अलंकारांनी सुशोभित झाल्याची दृष्टीस पडतात. त्या कारणाने कल्पनासौंदर्य व अलंकारिक शैली यांमुळे मूलभूत पात्रदेखील वेगळ्या पद्धतीनेच जगासमोर मांडली गेली. या कारणाने वेदातील एकेश्वरवाद व विशुद्ध आध्यात्मिक तत्त्वज्ञान मागेच पडले. गणपती किंवा गणेशाबाबत देखील असेच झाले. जो गणेश वेदाने प्रतिपादित केला, तो पुराण वाङ्मयाने स्वीकारला नाही. म्हणूनच वेदमंत्रात प्रतिपादित गणेश वेगळा आणि प्रचलित पुराण वाङ्मयीन गणेश किंवा गणपती वेगळा!

वेदप्रामाण्य गणेश किंवा गणपती हा याहून अगदी वेगळा आहे. वैदिक गणेश किंवा गणपती हे त्या निराकार परमेश्वराचेच गौणिक नाव! ‘गण्’ संख्याने या धातूपासून या शब्दांची उत्पत्ती होते. संधीविग्रह केला तर ‘गण + पती’ किंवा ‘गण + ईश’ असे वेगळे शब्द तयार होतात. ‘गण’ म्हणजेच या सृष्टीतील जड किंवा चेतन तत्त्वसमूह! ब्रह्मांडात जितक्या वस्तू किंवा पदार्थ आहेत, त्यांची गणना, मोजणी केली जाते, अशा या सर्वांचा पती म्हणजेच पालन करणारा गणपती होय. त्याचबरोबर सृष्टीतील या सर्व प्राणी समूहांचा ईश म्हणजेच ऐश्वर्यशाली गणेश! तो एकदेशी नसून सर्वदेशी, एककाली नसून सर्वकालिक आहे.

प्रामुख्याने गणपतीविषयी दोन मंत्र प्रसिद्ध आहेत. पहिला म्हणजे ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडळातील २३व्या सुक्तातील पहिला मंत्र! यात गणपती ईश्वराचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे की,

गणानां त्वां गणपतिं हवामहे,
कविं कवीनामुपम श्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत,
आ न: श्रृण्वन् नूतिभि: सीद सादनम्॥
या मंत्राचा देवता किंवा प्रतिपाद्य विषय हा ब्रह्मणस्पती आहे. ब्रह्म म्हणजेच तो एक ब्रह्मांडनायक परमेश्वर! सूर्य, चंद्र, धन, अन्न, मन, प्राण, वाक्, वेद, यज्ञ, ब्राह्मण या सर्वांच्या स्वामी अधिपतीला ‘ब्रह्मणस्पती’ म्हणतात. हाच वाढीचा अधिपतीदेखील आहे. या मंत्रात परमेश्वरासाठी गणांचा स्वामी गणपती, कवींचा ही कवी, ज्येष्ठराज आदी विशेषणे आली आहेत. प्रजा, समूह, सेना यांना गण म्हणतात. यावरून गणपतीचा अर्थ या सर्व गणांचा प्रजापती म्हणजेच ब्रह्मांडाचा स्वामी होय. कवींचाही कवी म्हणजेच क्रांतदर्शी! या अनुषंगाने वरील मंत्राचा अन्वयार्थ अशा प्रकारे होतो-

हे (ब्रह्मणाम्) मोठमोठ्या धनांचे स्वामी असलेल्या (ब्रह्मणस्पते) समग्र ब्रह्मांडाच्या अधिपती देवा! आम्ही भक्तगण, लोक (गणानाम् ) गणनीय मुख्य पदार्थांमध्ये (गणपतिम्) प्रमुख पदार्थांचा स्वामी असलेल्या तुला (कवीनाम्) उत्तम दूरदृष्टी, प्रभावी बुद्धी आणि क्रांतदर्शित्व असलेल्या सर्वांमध्ये (कविम्) सर्वज्ञ कवी असलेल्या तुला आणि (उपमश्रवस्तमम्) ज्याला उपमा दिली जाते, अशा अत्यंत श्रवणरूप (ज्येष्ठराजम्) ज्येष्ठ म्हणजेच अत्यंत प्रशंसनीय पदार्थांमध्ये प्रकाशमान असलेल्या (त्वा) तुझ परमेश्वराला (आ हवामहे) आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे स्वीकार करतो. तुझे स्तुतिगान करतो. कृपा करून तू आपल्या (ऊतिभिः) रक्षणसाधनांनी (श्रृण्वन्) ऐकत (नः) आम्हां सर्वांच्या (सादनम्) ज्यांच्यात आम्ही स्थिरपणे राहतो, अशा विविध ठिकाणांमध्ये, सार्‍या विश्वामध्ये तू (सीद) स्थिर हो!

या मंत्रात प्रतिपादित केलेला गणपती देव खर्‍या अर्थाने सकल जगातील जड-चेतन पदार्थांचा स्वामी असून, तोच सर्वांना सांभाळणारा आहे. याच गणपतीला ‘कवी’देखील म्हटले आहे. कवी हा सर्वदृष्टीने सर्वांचा कल्याण करणारा आणि हित साधणारा असतो. त्याच्याकडे बुद्धीची प्रगल्भता असते. तो गणपती कवी हा सार्‍या जगाची नवनिर्मिती करतो. तोही आपल्या बुद्धीप्रभावाने! इतकेच काय तर सारे जग हेच त्याचे काव्य आहे.

गणपतीचे वर्णन करणारा आणखी एक मंत्र आला आहे, तो यजुर्वेदामध्ये. इथेही गणपतीला सर्वव्यापक आणि सर्वांचे पालन करणारा पती म्हणून संबोधले आहे.

गणानां त्वा गणपतिं हवामहे,
प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे,
निधीनां त्वा निधिपतिं हवामहे। वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्॥
(यजुर्वेद -२३/१९)
याचा शब्दशः अर्थ होतो-हे जगदीश्वरा! आम्ही भक्तजन, (गणानाम्) गणनीय अशा जड व चेतन पदार्थांचा व (गणपतीं) गणांचा अधिपती म्हणजेच पालनकर्ता असलेल्या (त्वा) तुला ग्रहण करतो, स्वीकारतो. (प्रियाणाम् ) या जगात अतिशय प्रिय व सुंदर असलेल्या (प्रियपतिम्) प्रियजनांच्या अधिपती असलेल्या देवा! (त्वा) तुझी आम्ही (हवामहे) प्रशंसा करतो. (निधीनाम्) विद्या आणि सुख इत्यादी निधींचा म्हणजेच आमच्या सर्व प्रकारच्या खजान्यांचा (निधिपतिम्) निधीपती असलेल्या (त्वा) तुला आम्ही ग्रहण करतो, स्वीकारतो.

(वसो!) सारे जग ज्यामध्ये वसते, अशा व्यापक स्वरुपाच्या परमेश्वरा! तू (गर्भधम्) गर्भासमान सार्‍या जगाला धारण करणारा (त्वम्) तू (आ, अज असि) जन्म, मृत्यू आदी दोषांनी रहित आहेस. अशा त्या (गर्भधम्) विश्वरूप गर्भाला अथवा प्रकृतीला धारण करणार्‍या देवा! आपणांस (अहम्) मी (आ+अजानि) चांगल्या प्रकारे जाणू शकतो.

ऋग्वेदीय मंत्राप्रमाणेच या यजुर्वेदीय मंत्राचादेखील भावार्थ आहे. परमेश्वराच्या या व्यवस्थेत आणि सार्‍या ब्रह्मांडात त्याने अनेक पदार्थसमूहांना निर्मिले आहे. अगदी लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या अशा जड-चेतन वस्तू समूहांची नेहमीच गणना केली जाते. अशा सर्व गणनीय चेतन-अचेतन समूहांचा गणपती म्हणजेच पालक किंवा स्वामी महान आहे. किती व कोणत्या वस्तूंचा म्हणून आपण विचार करावा? अनादी काळापासून ही सृष्टी कार्यरत आहे. या सृष्टीतील अनेक वस्तू एका विशिष्ट गतीमध्ये कार्यरत आहेत. यात कुठेही कमतरता नाही की अपूर्णता! अगदी व्यवस्थितपणे ही सृष्टी वाटचाल करीत आहे. या सृष्टीला निर्मिणारा निर्माता तो भगवंत किती महान असेल? याची कल्पना करवत नाही. तो ईश्वर सर्वज्ञ, सर्वव्यापक, निराकार आणि सर्वांतर्यामी आहे. गणपतीच्या विशेषणांचे वर्णन करणारा फारच प्रसिद्ध आहे, तो असा की,

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय,
लंबोदराय सकलाय जगद्धिताय।
नागनाथाय श्रुति यज्ञ विभूषिताय,
गौरीसुताय गणनाथाय नमो नमस्ते॥
या श्लोकाचे रहस्य जाणून घेतले, तर आपणांस हे लक्षात येते की, निश्चितच हा श्लोक वेदप्रतिपादित सर्वव्यापक गणपतीचे शुद्ध स्वरूप कथन करणारा आहे. सदरील श्लोकात जी विशेषणे आली आहेत, ती निराकार अशाच प्रजापती देवाला लागू पडतात. म्हणजेच गणपती हा एका मूर्ती वा प्रतिमेपर्यंत मर्यादित न राहता तो सर्वव्यापक, निर्विकार व सर्वदेशी असे रूप धारण करणारा ठरतो. या श्लोकात आलेल्या एकेका विशेषणाचा वेदात प्रतिपादित केलेले विशाल परमेश्वराशी समन्वय स्थापन केला, तर आपणास वैदिक विशुद्ध गणपतीचे दर्शन घडते.

गणपतीचे हात हे राज्य शक्तीचे प्रतीक आहेत. त्याच्या हातात पाश, अंकुश, गदा इत्यादी आयुधे दाखविली आहेत. ती विधिविधान नियम व अधिकारांचे द्योतक आहेत. राजाने आपल्या देशात प्रजेला सुरक्षित ठेवण्याचे कार्य करावे, म्हणूनच राजाच्या हातात ही शस्त्रे दर्शविली आहेत. अशा विशुद्ध स्वरुपाच्या वेदादी शास्त्रार्थ प्रतिपादित केलेल्या गणाधिपती, गणेशाचे म्हणजेच त्या एकेश्वराचे पवित्र अंतःकरणाने ध्यान, चिंतन, मनन व त्याच्या अनुकूल सदाचरण, सद्व्यवहार करणे, हे गणेश भक्तांचे परम कर्तव्य आहे. सध्या सार्‍या जगात अविचारांचे, अनैतिकतेचे आणि स्वैराचाराचे वादळ सुटले आहे. माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. देवाधर्माच्या नावावर बाजार मांडलेला आहे.

मानवनिर्मित मत-पंथांच्या व जातीभेदाच्या संकीर्ण व्यवस्थेत माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि आधुनिक विज्ञानाची बेसुमार बाह्य प्रवृत्तींमुळे विश्वातील मानव समूह इतका आकंठ बुडत चालला आहे की, कोणाला कशाचाच पत्ता नाही, अशा या अस्ताव्यस्त व्यवस्थेत वेदप्रतिपादित श्रीगणेश गणपतीचे तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ व बुद्धिसंगत प्रामाणिक सत्य स्वरूप जगासमोर आले पाहिजे. सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी हाच वैदिक गणपती खर्‍या अर्थाने तारू शकतो. तो विश्वव्यापक, विनायक, मंगलमय श्रीगणेश आपल्या सर्व भक्तगणांमध्ये सद्बुद्धीचा प्रकाश निर्माण करो व सर्वांना सर्वदृष्टीने सुखी ठेवो, हीच कामना!

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.