मुंबई (समृद्धी ढमाले): ‘दयाळ’ या गाणाऱ्या पक्ष्याला आता सांगलीच्या शहरपक्ष्याचा मान देण्यात आला आहे. ओरियंटल मॅगपी रॉबिन असे शास्त्रीय नाव असलेल्या या पक्ष्याची सांगलीकरांनीच आपला शहरपक्षी म्हणुन निवड केली आहे. महाराष्ट्राच्या ३६व्या पक्षीमित्र संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दयाळची निवड करण्यात आली आहे.
बर्ड साँग एजुकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या पुढाकारातुन शहरपक्षी निवडण्यासाठी निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत तांबट, हळदी कुंकू बदक, शिक्रा, दयाळ, राखी धनेश अशा पाट पक्ष्यांना उमेदवार करण्यात आलं होतं. सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पक्ष्याला शहरपक्ष्याचा मान देण्यात येईल असे ठरले. केवळ चित्रांच्या आधारे मतदान न घेता स्थानिक भागांमध्ये फिरवुन पक्षी प्रत्यक्ष दाखवत त्याबद्दल माहिती सांगुन त्यानंतर हे मतदान घेतले गेले. विशेष म्हणजे, या मतदानाच्या प्रक्रियेत दोन हजारांहुन अधिक जणांनी भाग घेतला असुन त्यात काही अंध विद्यार्थ्यांचा ही समावेश होता.
मतदानानंतर सर्वाधिक ५६१ मते मिळवणारा गाणाऱ्या दयाळ पक्ष्याने सांगलीच्या शहरपक्ष्याचा मान मिळवला आहे. पुढील दहा वर्षं दयाळ सांगलीचा शहरपक्षी राहणार असुन त्यानंतर परिस्थितीनुसार तो बदलता येईल अशी तरतूद करुन ठेवण्यात आली आहे. जर कोणीही हा पक्षी बदलला नाही किंवा प्रक्रिया केली नाही तर त्यापुढेही दयाळ हाच सांगलीचा शहरपक्षी ठेवण्यात येणार आहे. सांगलीमध्ये प्रथमच अशा प्रकारची निवडणुक करण्यात आली आहे.
“दयाळ हा सर्वांचा प्रतिनिधी असलेला पक्षी आहे. जसा राष्ट्रीय पक्षी मोर, महाराष्ट्राचा हरियाल तसा आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला दयाळ हा शहर पक्षी मिळालाय. सर्व जनमानसात पक्षांविषयी प्रेम निर्माण व्हावे व त्यांच्या संवर्धनासाठी योग्य पावले टाकली जावीत या दृष्टीने शहरपक्ष्याची निवड करण्यात आली आहे.”
- डॉ. नंदिनी पाटील,
सभासद, बर्डसाँग क्लब
पक्षीमित्रसंमेलन आयोजन कमिटी उपाध्यक्ष