मुंबई : भारताने चांद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली असून आता चांद्रयान-४ चे वेध लागले आहेत. परंतू, या मोहिमेमध्ये भारत आपल्या मित्र देशाची मदत घेणार आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरोशन एजन्सी (JAXA) च्या सोबतीने चांद्रयान-४ मोहिम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताच्या चांद्रयान-३ ने २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील वेगवेगळी माहिती गोळा केली. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे फोटो पाठवण्यासोबतच चंद्रावरील तापमानाचीही माहिती दिली.
या संपूर्ण यशानंतर आता भारत चांद्रयान-४ मोहिम राबवणार आहे. २०२४ मध्ये ही मोहिम राबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ल्युनर पोलर एक्सप्लोरेशन (LUPEx) मिशन म्हणून ही मोहिम ओळखली जाणार आहे. याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत आणि जपान हे दोन देश मिळून ही मोहिम राबवणार आहेत. या मोहिमेद्वारे चंद्रावर असलेल्या पाण्याचे वास्तविक प्रमाण आणि गुणवत्ता निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे अभियान सहा महिने चालणार असून विशेषत: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लक्ष केंद्रित करणार आहे.