नवी दिल्ली : उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरोधी वक्तव्यास अभिनेते कमल हासन यांनी पाठिंबा दिला आहे. मक्कल नीधी मैयम (एमएनएम) प्रमुख कमल हसन यांनी शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सांगितले की द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आणि तामिळनाडूचे युवा कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टिप्पण्यांबद्दल त्यांना कोंडीत पकडले जात आहे. कोईम्बतूर येथील पक्षाच्या बैठकीत आपल्या भाषणात हासन यांनी उदयनिधी, भारतीय जनता पक्ष (भाजप) किंवा इतर कोणत्याही संघटनेचे नाव न घेता म्हटले की, सनातन धर्माबद्दल बोलल्यामुळे आज एका लहान मुलाला लक्ष्य केले जात आहे.
सनातन धर्मावरील मंत्र्यांच्या विधानात नवीन काहीही नसल्याचा दावा हासन यांनी केला. उदयनिधींचे आजोबा आणि द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांसारख्या द्रविड चळवळीतील अनेक नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्ये केली होती. त्याचप्रमाणे सत्ताधारी द्रमुक किंवा इतर कोणताही पक्ष असा दावा करू शकत नाही की पेरियार हे त्यांच्या एकट्याचे आहेत, तर संपूर्ण तामिळनाडूला त्यांचा नेता म्हणून अभिमान वाटला पाहिजे असेही ते म्हणाले.