दीड दिवसाच्या घरगुती श्री गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यामध्ये यंदा २३ टक्के वाढ

23 Sep 2023 18:11:41


ganpati

मुंबई :
मुंबईतला गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना मुंबईकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यंदा महानगरपालिकेने तयार केलेल्या १९४ कृत्रिम तलावांचा एकत्रित विचार करता, दीड दिवसांच्या एकूण २७ हजार ५६४ घरगुती गणेश मूतींचे कृत्रिम तलावांमध्‍ये विसर्जन करण्‍यात आले आहे. मागील वर्षी (२०२२) दीड दिवसांच्‍या २२ हजार ४१० घरगुती गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आले होते, म्हणजेच गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा ही संख्‍या ५ हजार १५४ ने अर्थात २२.९८ टक्क्यांनी वाढली आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने भाविकांना, नागरिकांना विविध सेवा- सुविधा पुरवल्या आहेत. समस्त मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व अत्याधुनिक, दर्जेदार सेवा-सुविधांनी पूर्ण असावा, यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी केलेली सुविधा होय.

गणेश मूर्तींचे विसर्जन करण्‍यासाठी मुंबईत ७३ नैसर्गिक स्थळी विविध स्तरिय सुव्यवस्था केली आहे. तसेच, १९४ ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती केली आहे. या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती मिळत आहे. कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून सातत्‍याने होणा-या जनजागृतीमुळे सन २०१८ पासून कृत्रिम विसर्जन तलावांमध्‍ये गणेश मूर्तींचे विसर्जन संख्या वाढते आहे.

गतवर्षी (२०२२) दीड दिवसांच्‍या २२ हजार ४१० घरगुती मूर्तींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आले होते. तर या वर्षी दीड दिवसांच्‍या २७ हजार ५६४ मूतींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आले आहे. गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा ही संख्‍या ५ हजार १५४ ने वाढली आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टिने ही वाढलेली संख्या अतिशय सकारात्‍मक बाब ठरली आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी चोवीस प्रशासकीय विभागांमध्‍ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍यात येते. या कृत्रिम तलावांमध्‍ये गणेश मूर्तींचे प्राधान्‍याने विसर्जन करावे, अशी विनंती भाविकांना केली जाते. सन २०१८ पासून त्‍यास सकारात्‍मक प्रतिसाद मिळत आहे. सन २०१८ मध्‍ये दीड दिवसांच्‍या १६ हजार ८२५ घरगुती मूर्ती, सन २०१९ मध्‍ये १४ हजार ४४२ मूर्ती, सन २०२० मध्‍ये २२ हजार १७८ मूर्ती, सन २०२१ मध्‍ये २४ हजार २७३ मूर्ती तर सन २०२२ मध्‍ये २२ हजार ४१० घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले.

यंदा दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी (दिनांक २० सप्‍टेंबर २०२३) भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. एकूण ६६ हजार ७८५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्‍यातील २७ हजार ५६४ घरगुती गणेश मूर्ती तर १७२ सार्वजनिक अशा एकूण २७ हजार ७३६ मूर्ती ह्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.

एकूणच, कृत्रिम विसर्जन स्‍थळांना दरवर्षी भाविकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी यापुढील विसर्जन दिवसांमध्ये कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लावावा, असे विनम्र आवाहन उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Powered By Sangraha 9.0