मुंबई (विशेष प्रतिनिधी): पुण्यातील वाघोलीजवळ गुरूवार दि. २१ सप्टेंबरच्या सकाळी विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याचे आढळून आले. पुणे वनविभाग आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने अवघ्या चार तासांत बिबट्याचे बचावकार्य तसेच मादी बिबटबरोबर यशस्वी पुनर्भेट घडवुन आणण्यात आली.
गुरूवारी सकाळी विहिरीत बिबट्याचे पिल्लू असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभाग आणि पुणे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पिंजरा टाकून या पिल्लाच्या बचावकार्याला सुरूवात झाली. पिल्लू पिंजऱ्यात आले आणि त्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर डॉ. पुर्वा यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. पिल्लू सुखरूप आणि चांगल्या स्थितीत असल्यामुळे पुनर्भेट करण्याचे निश्चित करून लगेचच त्याची तयारी सुरू झाली. पुनर्भेटीसाठी पिल्लू असलेला पिंजरा वनक्षेत्रात लावून ठेवण्यात आला. अवघ्या काही वेळातच म्हणजे साधारण ७:४५ च्या सुमारास मादी बिबट पिंजऱ्याजवळ येताच या पिल्लाला पिंजऱ्यातुन मुक्त करण्यात आले. आणि मादी बिबट आणि ३ महिन्यांच्या पिल्लाचे पुनर्भेट घडवुन आणण्यात पुणे वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यशस्वी ठरले.
विशेष म्हणजे पाऊस असल्यामुळे पुनर्भेटीची शक्यता कमी होती कारण वन्य प्राणी फारसे बाहेर पडत नाही. परंतू अशी स्थिती असतानाही मादी बिबट पिंजऱ्याजवळ येऊन आपल्या पिल्लाला घेऊन गेली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे बचावकार्य आणि पुनर्भेटची क्रिया अवघ्या चारच तासांत यशस्वीपणे पुर्ण झाली.