पाकिस्तानमध्ये जानेवारी महिन्यात निवडणुकांची घोेषणा करण्यात आली आहे. त्यातच इमरान खानमुळे अमेरिका आणि आखाती अरब देशांनी पाकिस्तानला वार्यावर सोडले असून हे बदलायचे असेल, तर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी बसवण्याला पर्याय नाही, हे तेथील लष्कराच्या लक्षात आले आहे. नवाझ शरीफ यांचे परत येणे भारतासाठी चांगली गोष्ट असली, तरी आज भारत पाकिस्तानवर विश्वास टाकू इच्छित नाही.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दि. २१ ऑक्टोबरला ते पाकिस्तानमध्ये परततील. त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असलेले पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश उमर आटा बंदियाल गेल्या आठवड्यात निवृत्त झाले. त्यांच्या जागी काझी फैझ इसा यांची नेमणूक करण्यात आली. २०१८ साली घटनेच्या ‘कलम ६२’चा आधार घेऊन नवाझ शरीफ सादिक आणि अमिन म्हणजेच सश्रद्ध स्वभाव आणि सचोटी नसल्यामुळे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या खंडपीठाने नवाझ शरीफ यांना पक्षाचे नेतृत्त्व करण्यास अपात्र ठरवले, त्यात न्यायमूर्ती बंदियाल यांचाही समावेश होता. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश झाल्यावर बंदियाल यांनी इमरान खानना मदत केल्याचे आरोपही त्यांच्याविरुद्ध झाले. गेल्या महिन्यात इमरान खान यांना तोशाखाना प्रकरणात सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. इमरान यांची जामिनावर सुटका होण्यापूर्वीच त्यांना गुप्त राजनयिक दस्तावेज फोडल्याबद्दल अटक करण्यात आली. दि. २६ सप्टेंबरपर्यंत इमरान खान न्यायालयीन कोठडीत राहाणार आहेत.
पाकिस्तानमध्ये या वर्षीच्या मे महिन्यात निवडणुका होणे अपेक्षित होते. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणारी पाकिस्तानची अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे शाहबाझ शरीफ सरकारचा विजय अवघड दिसत होता. एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने याच मुद्द्यांवर कोंडीत सापडलेल्या इमरान खानचे सरकार पाडले होते. पण, शाहबाज शरीफ यांच्या काळात पाकिस्तानची परिस्थिती आणखी घसरली आणि इमरान खान यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अवघ्या वर्षभरात आपली लोकप्रियता परत मिळवली. मे महिन्यात निवडणुका झाल्या असत्या, तर इमरानच्या नेतृत्वाखाली ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असते. दि. ९ मे रोजी इमरान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून एखाद्या चित्रपटात शोभेल, अशा पद्धतीने अटक करण्यात आली. तेव्हा त्यांची सुटका करण्यात बंदियाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानच्या लष्कराला इमरान खान कोणत्याही परिस्थितीत नको असल्यामुळे त्यांना तोशाखाना प्रकरणात अटक करण्यात आली. निवडणुका होऊ न शकल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेचे विसर्जन झाले. अन्वर उल हक काकर यांनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. इमरान खान तुरुंगात असले, तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यामुळे देश सोडून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या नवाझ शरीफ यांना परत आणण्याची योजना बनवण्यात आली. आता नवाझ शरीफ यांची अपात्रता कमी करण्यात येईल किंवा रद्दही करण्यात येईल.
शाहबाज शरीफ यांनी नवाझ शरीफ परतणार असल्याची घोषणा घोषणा केली. नवाझ शरीफ लंडनहून सौदी अरेबियाला प्रस्थान करतील. तेथे उमरा यात्रा पूर्ण करून ते पाकिस्तानला परततील. यापूर्वी नवाझ शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. पण, त्यांना एकदाही पंतप्रधानपदाची पाच वर्षांची टर्म पूर्ण करता आली नाही. नवाझ शरीफ यांचा राजकीय उत्कर्ष तत्कालीन लष्करशहा जनरल झिया उल हक यांच्याशी जुळवून घेतल्यामुळेच झाला. झियांच्या अपघाती मृत्यूनंतर बेनझीर भुत्तो पंतप्रधान झाल्या. पण, त्यांचे सरकार दोन वर्षंही टिकले नाही. १९९० ते १९९३ या कालावधीत नवाझ शरीफ पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. १९९७ साली नवाझ शरीफ दुसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. पण, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसोबत शांतता वाटाघाटी करण्याचे त्यांचे प्रयत्न लष्कराला न आवडल्याने लष्कराने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तिथे पराभव झाल्यावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून टाकून स्वतःच्या हातात सत्ता घेतली.
२०१३ साली झालेल्या निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ तिसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. २०१४ साली भारतात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींनी आपल्या शपथविधीला ‘सार्क’ गटातील देशांच्या नेत्यांना बोलावले. नवाझ शरीफ यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधीला उपस्थिती लावली. नोव्हेंबर २०१४ मध्ये काठमांडूमध्ये ‘सार्क’ संमेलनाची सांगता होत असताना पुढील संमेलनाचे यजमान म्हणून नवाझ शरीफ यांनी मोदींना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले आणि मोदींनीही त्याचा स्वीकार केला. पण, पाकिस्तानचा औपचारिक दौरा न करता त्यांनी दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी अफगाणिस्तानहून भारतात परतत असताना नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाकिस्तानला अनियोजित नियोजित भेट दिली. नवाझ शरीफ यांचे नरेंद्र मोदींशी शांततेच्या वाटाघाटी करण्याचे प्रयत्न पाकिस्तानी लष्कराला आवडले नाहीत. त्यांनी जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट आणि सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ले घडवून आणले. तेव्हा भारताने पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले. तेव्हापासून पाकिस्तान लष्कराला नवाझ शरीफ सलू लागले.
एप्रिल २०१६ मध्ये जगातील अनेक देशांतील राजकीय नेते, अभिनेते तसेच उद्योगपतींनी पनामा देशात शेल कंपन्या उघडून त्या माध्यमातून अब्जावधींचा काळा पैसा गुंतवल्याचे ’पनामा पेपर्स’ घोटाळ्यामुळे समोर आले. नवाझ शरीफ यांच्या तीन मुलांनी ‘ऑफशोअर’ कंपन्यांच्या माध्यमातून लंडनमध्ये आलिशान घरं घेतल्याचे उघड झाले. नवाझ शरीफ यांना हटवण्यासाठी या घटनेचे निमित्त करण्यात आले. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्यावरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती नेमली. ‘इसिस’चे प्रतिनिधी असलेल्या या समितीने शरीफ यांच्यावर ठपका ठेवला. दि. २८ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपदी राहण्यासाठी आवश्यक असलेले सश्रद्ध स्वभाव आणि सचोटी हे गुण नसल्यामुळे, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. लष्कराशी झालेल्या कराराचा भाग म्हणून नवाझ शरीफ यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये आपल्या कुटुंबीयांसह सौदी अरेबियाला प्रयाण केले. निवडणुका तोंडावर असताना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्त्व विभागाने नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी दहा वर्षांची, त्यांची मुलगी मरियम हिला सात वर्षांची, तर जावई सफदर यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावली. नवाझ शरीफ यांचे सौदी अरेबिया आणि आखाती अरब देशांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या दबावाचा वापर करून त्यांनी पाकिस्तान सोडला आणि शिक्षेतून स्वतःची सुटका करून घेतली.
पाकिस्तान लष्कराने २०१८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये इमरान खान यांच्यापाठी स्वतःची ताकद उभी करून त्यांना पंतप्रधान होण्यास मदत केली. पण, अल्पावधीतच लष्कराचे इमरानशी पटेनासे झाले. इमरानचा अमेरिका विरोध, रशिया आणि चीनला असलेला पाठिंबा आणि आखाती अरब देशांशी स्पर्धा करणारी मुस्लीम देशांची आघाडी करण्याचे प्रयत्न लष्कराला मान्य नव्हते. इमरानमुळे अमेरिका, भारत आणि इस्रायल आणखी जवळ येत असून, भारत आणि पाकिस्तानमधील दरी न भरण्याइतकी वाढली आहे, असे त्यांना वाटते. इमरानमुळेच अमेरिका आणि आखाती अरब देशांनी पाकिस्तानला वार्यावर सोडले असून हे बदलायचे असेल, तर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी बसवण्याला पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. नवाझ शरीफ यांचे परत येणे भारतासाठी चांगली गोष्ट असली, तरी आज भारत पाकिस्तानवर विश्वास टाकू इच्छित नाही. नवाझ यांना परत आणून अमेरिका तसेच आखाती देशांची मदत मिळावी, असा पाकिस्तान लष्कराचा प्रयत्न आहे, असेच म्हणता येईल.