कलातीर्थाचा सेवेकरी

21 Sep 2023 21:23:17
Article On Rishikesh Santosh Dambale

चित्रकलेचे कुठलेही शिक्षण न घेताही त्याने हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत चित्रकला क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया ऋषिकेश संतोष डंबाळे याच्याविषयी...

ऋषिकेशचे वडील संतोष डंबाळे अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी करीत. अवघा सहा हजार पगार आणि त्यात भाड्याचे घर, अशा हलाखीच्या परिस्थितीतही ऋषिकेश संतोष डंबाळे याने सध्या अकोला जिल्ह्यात एक उमदा चित्रकार म्हणून नाव कमावले आहे.

१९९९ साली जन्मलेल्या ऋषिकेशचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पारस येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण झाले. शाळेत सुराडकर गुरूजींना कला, संगीत, पियानो अशा अनेक गोष्टींचे ज्ञान होते. त्यावेळी ऋषिकेशला चित्रकलेची आवड आणि जाण आहे, हे ओळखून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. इयत्ता आठवीपर्यंत सुराडकर गुरूजींनी ऋषिकेशला मार्गदर्शन केले. सुरुवातीला कुटुंबीयांकडून म्हणावे तसे प्रोत्साहन मिळाले नसले, तरीही ऋषिकेशच्या प्रयत्नांमुळे कुटुंबाचेही त्याला कालांतराने सहकार्य मिळत गेले.

घरी एक रुपया मागितला, तर तो किती कष्टाने वडील कमावतात, हे ऋषिकेश जाणून होता. तेव्हा शालेय वयात तो श्रावण महिन्यातील सोमवारी बेलाची पाने विकायचा. चवळीच्या शेंगाही तो विकत असे. पण, वडील घरात असल्यावर तो कधीही चित्र काढत नसे. वडिलांच्या नकळत त्याने आपली चित्रकलेची आवड जोपासायला सुरुवात केली. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉवर प्लाँटमध्येही दोन महिने नोकरी केली. त्यानंतर ‘व्होकेशनल सायन्स’साठी प्रवेश घेतला. यादरम्यान त्याने काढलेल्या आकृत्यांचे कौतुक होत असे. विशेष दिवसासाठीचे फलकलेखन असो किंवा रांगोळी, ती जबाबदारी ऋषिकेशच अगदी नेटाने आणि उत्साहाने सांभाळायचा.

पुढे ऋषिकेशने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला; परंतु परिस्थितीअभावी ते काही शक्य झाले नाही. इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने ‘आयटीआय’साठी प्रवेश घेतला. यानंतर त्याने स्केचिंग करण्यास प्राधान्य दिले. ‘आयटीआय’मध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला. पुढे ‘अप्रेंटीसशिप’ही केली. पॉवर प्लाँटमधील (टेक्निशियन ३) पदासाठी तो इच्छुक होता. त्याकरिता त्याने यासंदर्भातील परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निश्चय केला. नोकरीची गरज ओळखून त्याने पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. ‘टाटा मोटर्स’मध्ये त्याने प्रशिक्षणार्थी म्हणून आठ महिने नोकरीही केली. यातून त्याने ७० हजार रुपयांची बचत केली आणि त्यासह तोे घरी परतला. तत्काळ कुठेतरी नोकरी मिळेल, यासाठी त्याने सैन्यात भरती होण्यासाठी सराव सुरू केला. निमलष्करी सैन्यदलात भरतीसाठी गेल्यानंतर अवघी एक सेंटीमीटर उंची कमी पडल्याने ऋषिकेशला अपयशाचा सामना करावा लागला. यात वेळ गमावण्यापेक्षा त्याने ‘महाजनको’मधील नोकरीसाठी प्रयत्न केले.

दुसरीकडे स्केचिंगचा सराव सुरू होता. कुठलेही महाविद्यालयीन शिक्षण न घेता त्याने वेळ पडल्यास युट्यूबची मदत घेतली. आपले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने सोशल मीडियाचादेखील आधार घेतला. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधूनही त्याला स्केचिंगची कामे मिळू लागली. यानंतर त्याने ‘एचडी आर्ट्स’ नावाने चित्रकलेचे क्लासेस सुरू केले. सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास नंतर २६ विद्यार्थ्यांवर जाऊन पोहोचला. अशातच पुढे घरमालकाने क्लासेस घेण्यास विरोध केला. क्लासेस बंद करण्याचा विचार ऋषिकेशने केला. परंतु, क्लासमधील एका विद्यार्थ्याच्या पालकाने ऋषिकेशला क्लाससाठी जागा उपलब्ध करून दिली. हॅचिंग, ग्राफिक, चारकोल स्केचिंग असे अनेक प्रकार ऋषिकेशला आजही आवर्जून विद्यार्थ्यांना शिकवतो. आतापर्यंत त्याने दोन हजारांहून अधिक व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.

अवघ्या १५ मिनिटांत समोरील व्यक्तीचा चेहरा रेखाटण्याचे कसब ऋषिकेशकडे आहे. एकादशीला शेगावी जात असताना त्याने एकदा पेन्सिल आणि स्केचबुक सोबत नेली. दर्शनरांगेत चार तास लागणार होते. त्यावेळी त्याने मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीचे चित्र रेखाटले. यावेळी तेथील उपस्थित भक्तांकडून त्याचे प्रचंड कौतुक झाले. याचा व्हिडिओदेखील नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर ऋषिकेशने रस्त्यात त्याला भावणार्‍या व्यक्तींचे चेहरे रेखाटण्यासही सुरुवात केली. गुपचूप व्यक्तीचा फोटो काढायचा, तो पाहून स्केच रेखाटायचे आणि तेच सदर व्यक्तीला भेट द्यायचे, असा हा लाईव्ह स्केचिंग प्रकार. अशाप्रकारे आतापर्यंत ऋषिकेशने ५० हजांराहून अधिक व्यक्तींची चित्रं रेखाटली आहेत. हलाखीच्या परिस्थितीने जेजेमध्ये प्रवेश घेण्याचे ऋषिकेशचे स्वप्नही स्वप्नच राहिले.

मुक्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी त्याने मिळवली. आई संगीता यांच्यासह ऋषिकेशला ऋषिकेश उमाळे, ऋषिकेश राजणकर यांचेही सहकार्य लाभते. आजही ऋषिकेशमधील विद्यार्थी जीवंत असून, तो सध्या परदेशातील चित्रकलेच्या विविध पद्धतीही आत्मसात करतो आहे. “लोकं डोक्यावर हात ठेवतात, प्रेम देतात. चित्रकलेने मला भरभरून दिले. मनाला जी शांतता लाभते, ती शब्दांत सांगता येत नाही. चित्रकलेसाठीचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने सध्या पेन्सिल स्केचला प्राधान्य देतो,” असे ऋषिकेश सांगतो. स्वतःचा मोठा चित्रकलेचा क्लास सुरू करण्याचे त्याचे स्वप्न आहे. कलेचे कुठलेही शिक्षण न घेता चित्रकला क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या ऋषिकेशला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

७०५८५८९७६७

Powered By Sangraha 9.0