मुंबई : गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र आनंदाचे आणि उल्हसित वातावरण असून, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावटीचे सामान आणि गणेशमूर्तींना प्राधान्य मिळताना दिसत आहे. त्यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी वाढली असून, बाजारपेठेत त्याचा तुटवडाही जाणवू लागला आहे.
पर्यावरणाबाबत सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे ‘इको फ्रेंडली’ बाप्पांचे प्रस्थ सर्वत्र वाढत आहे. दरम्यान, प्लास्टिक आणि थर्मोकॉलयुक्त सामान खरेदी न करता कागदी तसेच पुठ्ठ्याच्या वस्तूंना प्राधान्य मिळत आहे. प्लास्टिकच्या फुलांची जागा ताज्या फुलांना मिळत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी लगद्याच्या मूर्त्या आणि आरासींनाही भक्तांची पसंती मिळत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा शाडूच्या मूर्त्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवात स्वच्छतेसाठी पालिका रस्त्यावर
श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मुंबई महानगरात सार्वजनिक गणेश मंडप परिसरात, मिरवणूक मुख्य मार्गांवर स्वच्छता कामे वेगाने सुरू आहेत. मूर्ती विसर्जन स्थळांवरही स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यंदादेखील गणेशोत्सवादरम्यान स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अविरत कार्यरत राहणार असून, प्रत्येक गणेश मंडपाच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन कचरा संकलन पेटी (डस्टबीन) ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, केंद्र शासनाच्या वतीने आयोजित ’आंतर शहर स्वच्छता स्पर्धा’ अर्थात ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’चा भाग म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लहान-मोठे सर्व सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्ली, झोपडपट्टी व तत्सम वस्ती, समुद्रकिनारे अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेशी निगडित सर्व कामे योग्यरित्या व वेळेवर पूर्ण करण्याच्या, तसेच मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत, तर “निर्माल्य व्यवस्थापनामध्ये सुसूत्रता आणण्याकामी नागरिकांनी, गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे,” असे आवाहन उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी केले आहे.
- विसर्जनासाठी 191 कृत्रिम तलाव, 69 नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी निर्माल्याची व्यवस्था
- रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, झाडांच्या फांद्या छाटणी आदी कामेही पूर्ण
- निर्माल्य चमू, वैद्यकीय चमू, जीवरक्षक यांची नेमणूकही निश्चित
“महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दशकभरापासून जनजागृती करीत आहे. त्याचेच हे फलित आहे. विद्यार्थ्यांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणात जागरुकता आहे. त्यामुळे लोकांचा कल पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वाढला आहे. पर्यावरणपूरक गणपती बनवणार्या पेण येथील कारखान्यांत यंदा 40 टक्क्यांनी अधिक मूर्तीची निर्मिती झाली.”
- संजय भुस्कुटे,
जनसंपर्क अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ