जो बायडन पुन्हा भारत दौऱ्यावर! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आमंत्रित

20 Sep 2023 18:26:29
narendra modi 
 
नवी दिल्ली : भारताने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली आहे. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित केले होते.
 
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनासाठी पंतप्रधान मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना दिलेले हे निमंत्रण देखील विशेष ठरणार आहे. भारतात याआधी फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीच आपल्या कार्यकाळात भारताचा दोनवेळा दौरा केला होता. जो बायडन सुद्धा आपल्या कार्यकाळात एकाच वर्षात दोनदा दौरा करणार असल्याने भारत आणि अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचतील.
 
२०१५ मध्ये, बराक ओबामा हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले होते. बराक ओबामा यांच्यानंतर २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारताने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मात्र, काही कारणांमुळे ते येऊ शकले नाही. पण आता जो बायडन भारतात येणार हे जवळपास निश्चित आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0