मुंबई (विशेष प्रतिनिधी): बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटातुन पुन्हा एकदा नव्या चतुराच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. ‘ऍर्मागॅडॉन रीडटेल’ असे या चतुराचे नाव असुन डॉ. पंकज कोपर्डे, अराजुश पायरा, रेजी चंद्रन आणि अमेय देशपांडे या चार संशोधकांनी मिळुन केरळमध्ये ही प्रजात शोधली आहे.
ओडोनाटोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा शोधप्रबंध छापुन आला आहे. "इकोलॉजिकल ऍर्मागॅडॉन" या संकल्पनेचा संदर्भ घेऊन ‘ऍर्मागॅडॉन रीडटेल’ हे या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. हा शब्द जगभरातील कीटकांच्या संख्येच्या लक्षणीय आणि विनाशकारी ठरत असलेल्या घटीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. "इन्सेक्ट एपोकॅलिप्स" असे याला संबोधले जाते. परिसंस्थेत परागण प्रक्रियेत, तसेच इतर काही प्राण्यांचे भक्ष्य म्हणुन किटकांना महत्त्व आहे. असे असताना त्यांच्या संख्येत सातत्याने होणारी घट दुर्लक्षित केली जातेय. म्हणुनच, या प्रजातीचे नाव ‘ऍर्मागॅडॉन रीडटेल’ असे ठेवण्यात आले आहे.
उंचावर उडणारी ही चतुराची प्रजात असुन त्याला मराठीत महाकाली असंही म्हणता येईल असं संशोधकांनी सांगितले. अशा प्रकारे पश्चिम घाटातुन आढळणाऱ्या या या समृद्ध अधिवासाचे संवर्धन करण्याची गरजच या संशोधनामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. दोन वर्ष सुरू असलेल्या अभ्यासातुन या नव्या प्रजातीच्या शोधाबरोबरच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी संशोधकांच्या हाती आल्या आहेत.