मुंबई महापालिकेत १३२ कोटींचा खिचडी घोटाळा; गुन्हा दाखल!

02 Sep 2023 14:20:57

Khichdi scam 
 
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेन भादवि कलम 406, 409, 420 आणि 120 ब तसेच 34 प्रमाणे हा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे.
 
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
 
सह्याद्री रिफ्रेशमेंटला कोटींचं खिचडीचं टेंडर देण्यात आलं होत. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांचाही आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला होता. संगीता हसनाळे यांचासह हेड क्लर्क प्रदीप लोंढे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. संगीत हसनाळे नियोजन विभागाच्या इन्चार्ज असल्यानं खिचडीच्या टेंडरच्या फाईल्स त्यांनी हाताळल्या होत्या.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0