जालना : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात मागील २ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी काही आंदोलक उपोषण करत होते. शुक्रवारी उपोषण सोडवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांवर जमावाने दगडफेक केली असून त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांनंतर जमावावर लाठीमार करण्यात आला. दरम्यान दि. २ सप्टेंबर रोजी रस्त्यावर दगड टाकून आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग बंद केलेले आहे. त्यामुळे तिथे राज्य राखीव दलाच्या ६ ते ७ गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि राज्य राखीव दलाने रस्त्यावरील दगड उचलून रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे.
मात्र आंदोलक अजूनही रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी थांबून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वाहतुक अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता पोलीसांचा फौजफाटा धुळे- सोलापूर मार्गावर तैनात करण्यात आलेला आहे. तसेच पोलीस दगडफेकीचा संभाव्य अंदाज घेऊन सुरक्षेच्या सर्व साहित्यासह तैनात आहे.