तुझ्या गळा, माझ्या गळा!

17 Sep 2023 20:06:20
The Vladimir Putin-Kim Jong-un meet


उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. याकरिता उन यांनी रशियापर्यंत त्यांच्या वैयक्तिक रेल्वेने दोन दिवसांचा प्रवास केला. या भेटीमुळे रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियादेखील सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उन आणि पुतीन यांची ही बैठक सामान्य गोष्ट नसून या भेटीला अनेक पैलू आहेत. कोरोना काळानंतर उन याचा हा पहिलाच परदेश दौरा होता. उन २०११ साली सत्तेत आला आणि त्यानंतर त्याने २०१८ साली म्हणजेच तब्बल सात वर्षांनंतर पहिला परदेश दौरा केला. उन अन्य देशांच्या प्रमुखांइतका दौरे करीत नाहीत. त्यामुळे त्याला एकांतप्रिय नेता म्हणूनही ओळखले जाते. रशिया-उत्तर कोरियाचे संबंध मागील काही वर्षांपासून फार चांगले नाहीत. त्यात कायम चढउतार होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. २०००च्या अंतिम दशकात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी रशियाने या प्रस्तावाला समर्थन दिले होते. मात्र, आता उन आणि पुतीन यांच्या बैठकीने दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची शक्यता आहे.

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धासाठी रशियाला उत्तर कोरियाकडून दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे खरेदी करायची आहेत. याआधी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. त्यामुळे युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात घटलेला शस्त्रसाठा रशिया पूर्ववत करण्याच्या तयारीत आहे. कारण, युक्रेनने युद्धात निकराने लढा देत हार मानली नाही. त्यामुळे युद्ध लांबत गेले. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार, कोणताही देश उत्तर कोरियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करू शकत नाही. मात्र, रशियाने उत्तर कोरियाकडून शस्त्र आणि दारूगोळा खरेदी केल्यास ते संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन ठरेल. विशेष म्हणजे, हे प्रस्ताव जेव्हा संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आले, तेव्हा रशियाने सर्व प्रस्तावांचे समर्थन केले होते. त्यामुळे रशिया स्वतःचीच भूमिका बदलणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. रशियाला उत्तर कोरियाकडून युक्रेनविरोधात लढण्यासाठी मदत हवी आहे. पण, उत्तर कोरियाला रशियाकडून काय अपेक्षा आहे, हेदेखील जाणून घेणे आवश्यक आहे.
 
आधीच संयुक्त राष्ट्राकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे उत्तर कोरिया बेहाल आहे. त्यात कोरोनाकाळात देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. त्यामुळे स्वतःची अर्थव्यवस्था जीवंत ठेवायची असेल, तर त्यासाठी रशिया मदत करू शकतो. खाद्यपदार्थ, ऊर्जा यांसारख्या अनेक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी उत्तर कोरिया रशियाची मदत मागू शकतो. त्याचबरोबरीने अनेक निर्बंधांमुळे हुकूमशाह किम जोंग उन सध्या एकटा पडला आहे. उत्तर कोरियाला जागतिक स्तरावरदेखील एका मजबूत सहकार्‍याची गरज आहे. ती गरज रशियाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. नुकताच जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत एक त्रिपक्षीय करार झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरिया रशियापुढे मैत्रीचा हात पुढे करीत आहे. अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांसाठी तसेच आण्विक पाणबुड्यांसाठी उत्तर कोरिया आग्रही असून, रशियाकडून याविषयीचे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. तिकडे मित्र असलेल्या चीनलासुद्धा रशियाने हे तंत्रज्ञान अद्याप दिलेले नाही, तेव्हा ते उत्तर कोरियाला मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. पुढील काळात रशिया आणि उत्तर कोरियामध्ये सैन्य अभ्यास होणार आहे.

उत्तर कोरियाने अद्याप कोणत्याही देशासोबत सैन्य अभ्यास केलेला नाही. त्यामुळे हा त्यांचा पहिला सैन्य अभ्यास असेल. यानंतर उत्तर कोरिया, रशिया आणि चीन असा त्रिपक्षीय सैन्य अभ्यासदेखील पाहायला मिळू शकतो.एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया, चीन अशा दोन गटांमुळे जागतिक शांततेला आव्हान निर्माण केले जाऊ शकते. भारताचा स्वतःचा असा गट नाही, ना भारत एखाद्या गटाचा सदस्य आहे. दोन्ही गटांमध्ये समन्वय साधणे. हे एक आव्हान ठरणार असून, भारताची ही खर्‍या अर्थाने अग्निपरिक्षा असेल. तूर्तास तरी रशिया आणि उत्तर कोरियाला एकमेकांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही देश ‘तुझ्या गळा, माझ्या गळा... गुंफू मैत्रीच्या माळा‘ या उक्तीप्रमाणेच कुणाच्या विरोधाला न जुमानता व निर्बंधांची चिंता न करता उन आणि पुतीन एकत्र आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0