शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करणार 'शौर्य जागरण यात्रा'

16 Sep 2023 18:13:51

vhp


मुंबई :
विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) षष्ठपूर्ती वर्षानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विहिंपने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विहिंपचा युवा संगठन कार्यविभाग व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करण्याच्या उद्देशाने आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त 'श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ही यात्रा दिनांक ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध स्थानांवर होईल. याबाबत सविस्तर माहिती विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी शनिवार, दि. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुळकर्णी, विहिंपचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर उपस्थित होते.

हिंदू समाज हा शौर्यवान आहेच व अनेक शतके हिंदुस्थानावर होत असलेल्या आक्रमणांना विजयी उत्तर हिंदूंनी दिले आहे. याच शौर्याचे हिंदू समाजात पुनर्जागरण व्हावे आणि वैभव संपन्न, उद्यमी, शौर्य युक्त, समरस विजयी हिंदू समाज निर्माण व्हावा हा या शौर्य यात्रेचा उद्देश आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा विस्तार व्हावा व बजरंगदलाच्या कार्याशी हिंदू युवकांना जोडावे यासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ही यात्रा जवळपास १०,४०० कि. मी. अंतराचा प्रवास करेल. शासकीय ३८ जिल्ह्यांतील ३१२ तालुक्यांमधून ही यात्रा जाईल. युवा संत, खेळाडू, हिंदू युवक, शिवकालात असणाऱ्या सरदार घराण्यांचे वंशज, हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय असे सर्व या यात्रेते सहभागी होणार आहेत. हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला रथ याचे विशेष आकर्षण ठरेल.

विहिंप, बजरंग दल यांनी कार्यरचनेच्या दृष्टीने महाराष्ट्र व गोवा यांचे ४ प्रांत रचनेत नियोजन केले आहे. कोकण प्रांत (मुंबई कोकण व गोवा), प. महाराष्ट्र, देवगिरी, विदर्भ हे ४ प्रांत विहिंपच्या रचनेचा भाग आहेत. या सर्व प्रांतांतून एकुण २८ मुख्य यात्रा, यांना जोडून १०० उपयात्रा निघतील. विदर्भात ७, देवगिरी १४, प. महाराष्ट्र ५, कोकण २ अश्या प्रमुख यात्रा निघणार असून ५७ मोठ्या सभा होणार आहेत. या सर्व यात्रांसाठी २२ कार्यकर्ते पूर्णकालिक निघाले आहेत. 'या धर्मकार्यात सहभागी होऊन बजरंग दलाचे व विश्व हिंदू परिषदेचे कार्य वाढवावे', असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मुंबईत १५ ऑक्टोबरला विहिंपची भव्य सभा

'श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा दौंड, रायगड, कुलाबा, भाईंदर या मार्गाने मुंबईत येईल. रविवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क येथे भव्य सभा होईल. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतील.', अशी माहिती विहिंपचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0