आपल्या देशात एखाद्या साध्या नेत्याकडून त्याच्या खात्याचा पदभार काढून घेतला, तरी राजकीय तर्कवितर्कांना उधाण येते. त्यातच तो मंत्री कुणी दिग्गज असेल तर मग विचारायलाच नको म्हणा. राजकारणातील बदलते वारे पाहता, अशाप्रकारे होणारे खांदेपालट ही खरं तर राजकीय पक्षांसाठी तशी ‘रुटीन प्रॅक्टिस.’ पण, चीनमध्ये शी जिनपिंग यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झाल्यापासून अशाप्रकारे उच्चपदस्थ अधिकार्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत हकालपट्टीचा नवीन पायंडाच पडलेला दिसतो. काही महिन्यांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग एकाएकी गायब झाले होते.
काही आठवडे चीनमधील कुठल्याही कार्यक्रमांत किंवा परदेशी दौर्यांमध्ये गँग यांचे दर्शन झाले नाही. यावरून देशात आणि जागतिक पातळीवर चर्चा रंगू लागताच, चीनने परराष्ट्र मंत्रीच बदलल्याची घोषणा झाली आणि गँग यांना नेमके का हटविले, हे गुलदस्त्यातच राहिले. म्हणा, गँग यांच्या गच्छंतीच्या कहाण्या माध्यमांत झळकल्याही. पण, ही नामुष्की कमी म्हणून की काय आता चीनच्या संरक्षणाचीच जबाबदारी खांद्यावर असलेले संरक्षणमंत्री ली शांगफू एकाएकी दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे आधी परराष्ट्र मंत्री आणि काही महिन्यांनी आता देशाचे थेट संरक्षणमंत्री गायब झाल्याने, पडद्यामागे नेमके काय घडले असेल, याच्या खमंग कयासांना उधाण आलेले दिसते.
आता कुठल्याही देशाचा संरक्षणमंत्री म्हटला की, साहजिकच तो राजकारणातला तितकाच अनुभवी आणि विश्वासू नेता. ली शांगफू ही त्यापैकीच एक. त्यांनी गेली कित्येक वर्षे चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये उच्चपदस्थ म्हणून भूमिका बजावली. म्हणजे साहजिकच ली हे जिनपिंग यांच्या मर्जीतलेच. या वर्षाच्या मार्च महिन्यातच त्यांचा सैन्य व्यवस्थापन, युद्ध साम्रगी व्यवहार या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती. पण, आता अवघ्या काही महिन्यांनंतर नेमकी माशी कुठे शिंकली, याबाबतही उलटसुलट चर्चांना चीनमध्ये ऊत आलेला दिसतो. काही माध्यमांतील बातम्यांनुसार, ली शांगफू आजारी असल्यामुळे ते सार्वजनिक व्यासपीठांवर दिसलेले नाही.
चीनमधील आफ्रिकन देशांच्या प्रतिनिधींबरोबर त्यांची दोन आठवड्यांपूर्वी बीजिंगमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर ली यांना कोणीही बघितलेले नाही. परंतु, ली हे स्वतःहून पडद्याआड न जाता, त्यांना मुद्दाम गृहकैदेत डांबण्यात आल्याच्या बातम्याही जागतिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे कारण म्हणजे, ली यांनी युद्धसामग्री खरेदी व्यवहारात केलेला मोठा भ्रष्टाचार. त्यांच्या या कथित भ्रष्टाचाराची शिक्षा म्हणून त्यांना पदच्युत करण्यात आले असून, आगामी काळात त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते, अशाही शक्यता वरकरणी वर्तविल्या जात आहेत. पण, नेमके सत्य अन् तथ्य काय, याबाबत अजूनही तशी अस्पष्टताच.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि तत्सम आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मात्र ली शांगफू हे युद्धसामग्री व्यवहारातील घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळेच त्यांच्यावर संक्रात आल्याचे अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु, अद्याप चीनकडून ली यांच्या राजीनाम्याची किंवा नवीन संरक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.भ्रष्टाचार्यांवर कडक कारवाईची ही जिनपिंग यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही सैन्यातील उच्चपदस्थांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत जिनपिंग यांनी कित्येकांचा बंदोबस्त केला. दोन महिन्यांपूर्वीच ‘पीएलए’च्या रॉकेट फोर्समधील दोन जनरलनाही जिनपिंग यांनी असाच बाहेरचा रस्ता दाखवला. ली शांगफू यांच्याबरोबरही असेच घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यातच जिनपिंग यांची हुकूमशाही प्रवृत्ती अजिबात लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयांना विरोध करणार्यांना, संभाव्य प्रतिस्पर्धींचा काटा काढण्याची पद्धतशीर मोहीमच जिनपिंग यांनी राबविल्याचे म्हटले जाते. तसेच सध्या जिनपिंग यांच्या अंतर्गत वर्तुळात केवळ त्यांच्यासमोर माना तुकवणार्यांचीच संख्या अधिक. त्यामुळे ‘आले जिनपिंगच्या मना’ हीच कार्यपद्धती. ही परिस्थिती बघता, चीनमध्ये आणि एकूणच ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’मध्ये काहीही आलबेल नाही, हेच खरे. त्यातच जिनपिंग यांच्या कचखाऊ धोरणांमुळे चीनची अर्थव्यवस्था ही गटांगळ्या खात असल्यामुळे, जिनपिंग यांच्यासमोरची आव्हाने संपण्याची चिन्हे नाहीत.