'एखाद्या राज्यासाठी शेजारील राज्य स्वाभाविकरित्या शत्रू असते,’ असे चाणक्यने म्हटले होते. चीनसाठी त्याचे शेजारील राष्ट्रही असाच विचार करतात. चीनच्या कुरातपतींमुळे चीनचे जगभरात अनेक शत्रू निर्माण झाले. चीनने नुकताच आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला. यात तैवानसह व्हिएतनामच्या पॅरासिल बेटांचा समूह, फिलिपाईन्सच्या स्कारबोरोशोल आणि कोरस ट्रॅटली बेटांचा समावेश आहे. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, बोल्शोई उस्सुरीस्की बेटांचाही या नकाशात समावेश आहे, ज्यावर रशिया आपला हक्क सांगत आला आहे.
चीनने नकाशा प्रसिद्ध करणे, ही नवी गोष्ट नाही. परंतु, यावेळी चीनने रशियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘जी २०’ शिखर परिषद पार पडल्यानंतर चीनने नकाशा प्रसिद्ध केला. तैवान आणि फिलिपाईन्सने चीनच्या चिंतेने अमेरिकेसोबत अनेक संरक्षणविषयक करार करण्याचा धडाका लावला आहे. मित्र असूनही रशियाला चीन नाराज का करतोय, रशियाला दिलेला हा इशारा समजायचा का आणि चीन वारंवार असे नकाशे प्रसिद्ध करून वादंग का निर्माण करतो, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे आवश्यक आहे.
१९४७ साली सामरिक शेजारी देशांसोबत चीनचे वाद सुरू झाले. चीनच्या कुओमितांग सरकारने एका नकाशात ११ डॅश लाईन आखून दक्षिण चीन सागरातील बहुतांश क्षेत्रांवर दावा केला होता. १९४९ साली टोनकिंग खाडीला ११ डॅश लाईनमधून बाहेर करण्यात आले. त्यामुळे ११ डॅश लाईनला ‘९ डॅश लाईन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. चीन याच नकाशाच्या आधारे दक्षिण चीन सागर क्षेत्राला आपला भाग म्हणून सांगतो. ही ‘९ डॅश रेखा’ फिलिपाईन्स, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या समुद्री क्षेत्राला लागून आहे. ही रेखा अजूनही वादातीत आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नकाशात ही रेखा ‘९ डॅश’मध्ये नव्हे, तर ‘१० डॅश’मध्ये रेखण्यात आली आहे.
नव्या नकाशात ही ’यु’ आकाराची रेखा चीनच्या हैनान बेटाच्या दक्षिणेला १५०० किमी फिरून व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक क्षेत्राजवळून जाते. २००९ साली संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या नकाशापेक्षा सध्याचा नकाशा एकदम वेगळा आहे. २०१३ सालीही ‘१० डॅशलाईन’सोबत एक नकाशा प्रसिद्ध केला गेला होता. चीनने ज्या बोल्शोई उस्सुरीस्की बेटाला आपल्या नव्या नकाशात समाविष्ट केले आहे, ते बेट उससुरी आणि अमूर नद्यांच्या संगमावर आहे, जो रशिया आणि चीनला वेगळे करतो. १८६० साली या क्षेत्रावरून पहिला वाद झाला. त्यानंतर २००५ साली या बेटावरील वाद मिटविण्यासाठी दोन्ही देशांत करार झाला. २००८ साली बेटाची विभागणी पार पडली, ज्यानुसार चीनला बेटाचा १७० वर्ग किमी हिस्सा देण्यात आला आणि उर्वरित भागावर रशियाने आपला दावा कायम केला.
एका अहवालानुसार, जवळपास १५ देशांसोबत चीनचे सीमेवरून वाद आहेत. यामध्ये नेपाळ, जपान, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांचाही समावेश आहे. जाणकारांच्या मते, भारताचा जागतिक स्तरावर वाढणारा प्रभाव, आशिया खंडात अमेरिकेचे वाढणारे प्रस्थ आणि विविध देशांना सोबत आणण्याच्या प्रयत्नांमुळे चीन अशा कुरापती काढत आहे. अमेरिकेकडून जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात पुन्हा मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न, तैवानला संरक्षण साहित्य व शस्त्र विक्री करणे, भारताला मिळालेले ’जी २०’चे अध्यक्षपद यामुळे चीन चहुबाजूंनी घेरला गेला आहे. देशांतर्गत होणारा विरोध लपविण्यासाठी चीन काश्मीरमधील विरोधाला अधोरेखित करीत असतो.
युक्रेनसोबतचे युद्ध आणि अनेक प्रतिबंधांचा सामना करीत असलेल्या रशियाच्या काही भागांना चीनने आपला भाग म्हणून जाहीर केले. त्यामुळे एकप्रकारे रशियाला आम्ही घाबरत नाही, असा इशाराच चीनने दिला आहे. मात्र, रशियाने एक चूक म्हणून दुर्लक्षित केले आहे. असे नकाशे प्रसिद्ध करून फक्त गोंधळ निर्माण करायचा, हाच उद्देश चीनचा आहे. अमेरिकेसारखे आंतरराष्ट्रीय कायदे आम्हीदेखील मोडू शकतो, असे चीन दाखवू पाहतोय. या नकाशाने फारसा फरक पडणार नाही; परंतु चीनने आपल्यासाठी नवा शत्रू तयार करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. हे नक्की.