‘जी २०’ घोषणापत्र आणि अल्बर्ट आईन्स्टाईन

14 Sep 2023 22:18:11
Article On G20 Declaration And Albert Einstein

‘जी २०’चे संमेलन चालू असताना योगायोगाने अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे (The World As I see It) हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, २०२३च्या ‘जी २०’ संमेलनाची अनुकूल पृष्ठभूमी ज्या थोर पुरुषांनी केली, त्यात आईन्स्टाईन यांचे नाव घ्यावे लागेल.

नवी दिल्ली येथे दि. ९ आणि १० सप्टेंबर रोजी ‘जी २०’ जागतिक परिषद संपन्न झाली. या बैठकीला १९ देश व ‘युरोपियन युनियन’मधले आणि ‘आफ्रिकन युनियन’मधले देश सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या परिषदेचे फलित म्हणजे दिल्ली घोषणापत्र एकमताने संमत करण्यात आले. हे घोषणापत्र भारत सरकारने प्रकाशित केलेले आहे आणि शीर्षक आहे- ‘वसुधैव कुटुम्बकम्.’ या घोषणापत्राची सात मुख्य कलमे आहेत. त्यांना ए, बी, सी, डी प्रमाणे क्रमांक टाकलेले आहेत आणि घोषणापत्राची उद्देशिका आहे. उद्देशिकेत कलमातील सर्व विषय आलेले असल्यामुळे उद्देशिकेच्या पाच कलमांत आलेले विषय बघायचे आहेत.

पहिलं कलम म्हणतं की, आमची सर्वांची एक पृथ्वी आहे, आम्ही एक परिवार आहोत आणि आमच्या सर्वांचे भवितव्य एक आहे. दुसरं कलम म्हणतं की, आम्ही ‘जी २०’चे नेते दि. ९ आणि १० सप्टेंबर रोजी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भावनेने एकत्र आलो. इतिहासाच्या अशा वळणावर आम्ही एकत्र आलो की, यावेळी आम्ही जे निर्णय घेऊ तेे निर्णय मनुष्य जातीचे आणि सृष्टीचे भविष्य निश्चित करतील. आमच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी सैद्धांतिकदृष्ट्या संतुलन साधून आम्हाला जगायचे आहे आणि म्हणून जागतिक आव्हानांना सामोरे जाणारी निश्चित स्वरुपाच्या कृतीशी आम्ही बांधले जाणार आहोत.

कलम तीन म्हणतं की, ‘जी २०’ समूहातील परस्पर सहकार्य जगाचा मार्ग ठरविण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. जागतिक आर्थिक विकास आणि स्थैर्य महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ टिकणारा आणि संतुलित विकास हे आमचे लक्ष्य राहील. जागतिक हरितगृह वायू (ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसचे) उत्सर्जन वाढत चालल्यामुळे वातावरणात बदल होत चालले आहेत. जैवविविधतेचा र्‍हास होत चालला आहे. तसेच प्रदूषण, अवर्षण, जमिनीची धूप, वाळवंटांचा विस्तार यांमुळे जीवन धोक्यात येत चालले आहे. अन्नधान्य आणि ऊर्जा यांच्या किमती वाढत गेल्यामुळे राहणीमानाचा खर्च वाढत चालला आहे. दारिद्य्र, असमानता, संसर्गजन्य रोगराई यांचा सर्वाधिक प्रभाव महिला आणि मुलांवर पडतो.

उद्देशिकेचे कलम चार म्हणतं की, चांगले भविष्य घडविण्याची संधी आपल्या हातात आहे. उर्जेचा नीट विनियोग झाला, तर रोजगार वाढतील आणि जीवनमान सुधारेल. आर्थिक स्थिती सशक्त होईल. केवळ एका देशापुरते मर्यादित हे प्रश्न नसून, आपल्या सर्वांना स्थिर आणि प्रगतिशील, सर्वसमावेशक आणि जागतिक न्याय देणारे विकासाचे मॉडेल विकसित करावे लागेल, ज्यात कुठलाही देश मागे राहाणार नाही.

उद्देशिकेचे शेवटचे कलम म्हणतं की, ‘जी २०’च्या नेत्यांचे हे संमेलन हे जागतिक संमेलन आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहयोग आणि भागीदारी सोपी करण्याचा आम्ही निश्चय करीत आहोत. खालील गोष्टींसाठी आम्ही स्वतः बांधून घेत आहोत.

* सर्वसमावेशक, संतुलित, विकासाला गती.

* निरंतर आणि पर्यावरणपूरक विकासासाठी २०३० हे लक्ष्य.

* कमीतकमी कार्बन उत्सर्जन. वातावरणाचे संतुलन, पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग.

* वैद्यकीय प्रतिबंधात्मक विकासास प्राधान्य. त्यांचा नियमित आणि जलद पुरवठा. विकसनशील देशांना, यासाठी साहाय्य करणे आणि भविष्यकालीन आरोग्य संकटांशी मुकाबला करण्यास सिद्ध होणे.

* विकसनशील देश कर्जाच्या सापळ्यात सापडणार नाहीत, यासाठी तत्काळ लक्ष देणे. निरंतर आणि पर्यावरणपूरक विकासासाठी सर्व बाजूंनी आर्थिक प्रवाह उप्तन्न करणे.

हे या उद्देशिकेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. बाकीच्या उपकलमांमध्ये जग हे युद्धमुक्त असावे, ‘युनो’चे जे ठराव आहेत, त्याचे सर्वांनी पालन करावे. कुठल्याही देशाने कुठल्याही देशाची भूमी लष्करी शक्तीच्या जोरावर बळकावू नये. कोणत्याही देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर, सार्वभौम विकासावर तसेच राजकीय स्वातंत्र्यावर घाला घालू नये. ‘जी २०’ संमेलन हे आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रयोगासाठी निर्माण झाले आहे. भूराजनीतिक आणि सुरक्षेचे विषय हे ‘जी २०’ संमेलनाचे विषय नसतील. विस्ताराने मोठ्या असलेल्या उद्देशिकेचा हा सारांश आणि भावानुवाद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घोषणापत्राचे श्रेय दिले जाते आणि ते खरेही आहे. दुसर्‍या महायुद्ध समाप्तीनंतर वेगवेगळ्या कारणांसाठी जगातील देश काही संघटना उभ्या करतात. दुसर्‍या महायुद्धाचा एक चांगला परिणाम म्हणजे, मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यांच्यासाठी आजतरी इथल्या ब्रह्मांडात एकच पृथ्वी आहे. या पृथ्वीला ‘सुजलाम् सुफलाम्’ करायचे की, वैराण करायचे? हा लाख नव्हे, तर कोटी मोलाचा प्रश्न दुसर्‍या महायुद्धाच्या विध्वंसाने जगापुढे आला. युद्ध कोणालाच नको असते. प्रत्येक देशाला शांतता हवी असते. देशादेशांत संघर्ष होऊ नये, अशी मानसिकतादेखील असते. त्या दिशेने जगाचा प्रवास हळूहळू चालू आहे. दिल्लीचे घोषणापत्र हा त्यातील मैलाचा दगड ठरले आहे. या घोषणापत्रात व्यक्त झालेले सर्व विचार ज्या तत्त्वज्ञानातून पुढे आलेले आहे. ते १०० टक्के भारतीय तत्त्वज्ञान आहे.

स्वातंत्र्य आंदोलनात हे तत्त्वज्ञान लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपापल्या भाषेत मांडले आहे. आपल्या घटना समितीमध्ये भारताचे विश्वव्यापी लक्ष्य कोणते? यावरदेखील अनेक विद्वान सभासदांनी मौलिक विचार मांडलेले आहेत. त्यानंतर जे राज्यकर्ते आले त्यांना त्याचं विस्मरण झालं, असं म्हणणं म्हणजे, पक्षीय राजकीय वक्तव्य करण्यासारखे होईल. प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे यासंदर्भात प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झाले असल्याने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ सर्व मानव जातीचा विचार हे त्यांच्या ‘डीएनए’मध्येच आहे. सर्व मानव सुखी, समृद्ध, निरोगी व्हावेत. हे संघाच्या हिंदू राष्ट्र संघटनेचे जागतिक लक्ष्य आहे. नरेंद्र मोदींनी जागतिक मानवतेचा विचार सर्व नेत्यांना उत्तम पटवून दिला. तो त्यांनी पचवून घेतला. याचे कारण आजचे राजनीतिक वातावरण त्याला अनुकूल आहे.

‘जी २०’चे संमेलन चालू असताना योगायोगाने अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे (The World As I see It) हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, २०२३च्या ‘जी २०’ संमेलनाची अनुकूल पृष्ठभूमी ज्या थोर पुरुषांनी केली, त्यात आईन्स्टाईन यांचे नाव घ्यावे लागेल. या पुस्तकात आईन्स्टाईन म्हणतात की, ‘या अवनीतलावर आपण मर्त्य लोक फार अल्पकाळासाठी असतो. पण, आपण येथे कशासाठी आहोत, याचे आकलन माणसाला होत नाही. परंतु, थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला, तर असे आढळेल की, आम्ही सहयोगी मानवासाठी येथे असतो. त्यांच्या हास्यावर आणि चांगल्या परिस्थितीवर आमचा आनंद अवलंबून असतो.’

असं सांगून आईन्स्टाईन पुढे म्हणतात की, ‘दिवसातून १०० वेळा मी मला आठवण करून देतो की, माझे बर्हिगत आणि अंतर्गत जीवन, जीवित वा मृत माणसांवर अवलंबून आहे आणि म्हणून माझे हे कर्तव्य बनते की, त्याची समप्रमाणात परतफेड मी केली पाहिजे. मी स्वतः होईल तेवढे साधे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तरीसुद्धा मला असे वाटत राहते की, माझ्या अवतीभोवतीच्या माणसांच्या कष्टाचा मी अनावश्यक लाभ घेत आहे. मला असं वाटतं की, प्रत्येकाला साधी राहाणी ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या उत्तम आहे.’

आईन्स्टाईनने ही भावना १९३० ते ३२ सालापासून व्यक्त केली आहे. आपल्या भाषणातून त्यांनी पुढील विषय अतिशय आग्रहाने मांडले.

* प्रश्न सोडविण्यासाठी शक्तीचा वापर करू नये. सक्तीची सैन्यभरती अजिबात करू नये.

* विध्वंसक शस्त्रांचा नाश करावा. शस्त्रोत्पादन करणार्‍या कारखान्यांवर नियंत्रण घालावे. तसेच, एका तंत्रीय राजवटींचा निषेध करावा.

* माझ्या दृष्टीने राज्यसंस्थेपेक्षा मनुष्य जीवन अतिशय महत्त्वाचे आहे. निर्मितीक्षम, भावनाप्रधान व्यक्ती आणि अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे गुणवान आणि सर्वश्रेष्ठ असते. अनुग्रह देणारा आणि शासन देणारा परमेश्वर यावर माझा विश्वास नाही. तसेच, मृत्यूनंतर कोणता माणूस जीवंत राहील, पुन्हा येईल याच्यावरही माझा विश्वास नाही. माझ्यादृष्टीने शाश्वत जीवनाची गूढता ही महत्त्वाची आहे. तसेच, जी वास्तविकता आहे, ती साध्या मनाने जाणून घेणे, हेदेखील महत्त्वाचे आहे.

* जेव्हा आपण आपल्या जीवनाचा आणि क्रियाकलापांचा आढावा घेतो, तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की, आमच्या सर्व भावभावना, आमच्या सर्व कृती या अन्य मानवाच्या अस्तित्वाशी निगडित आहेत.

आईन्स्टाईन यांना सांगायचे आहे की, आपण परस्पर संलग्न आहोत, एकमेकांवर अवलंबून आहोत. हे विश्व एक आहे. मानवता एक आहे. एका मानवसमूहाचे प्रश्न त्याच्यापुरते मर्यादित नसतात, ते सर्व मानवसमूहाचे प्रश्न आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या या विचारांना दिल्ली घोषणापत्राने कृती आराखड्याच्या रुपात मांडले. हे खरोखरच अतिशय उत्तम झाले.

९८६९२०६१०१


Powered By Sangraha 9.0