वाद नको, संवाद हवा!

13 Sep 2023 22:09:36
Naam is the essence of spiritual instruments

रामनाम हा समर्थांच्या आवडीचा विषय असल्याने यापूर्वीच्या सुमारे २० श्लोकांतून स्वामींनी अनेक प्रकारांनी रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. स्वामी म्हणतात की, “परमार्थातील सर्व साधनांचे सार रामनाम आहे.” “आपल्या विधानाच्या समर्थनार्थ सतत रामनाम घेणार्‍या महादेवाचे ते उदाहरण देतात. स्वतःला अष्टसिद्धी वश असूनही भगवान शंकर सतत रामनाम घेत असतात आणि पार्वतीमातेलाही रामनामाचा उपदेश करतात,” असे स्वामींनी म्हटले आहे.

पुढे स्वामींनी असेही सांगितले आहे की, “अत्यंत आदरपूर्वक नाम घेतल्याने सर्व दोष नाहीसे होऊन माणूस उद्धरून जातो.” नाम हे आध्यात्मिक साधनांचे सार तर आहेच; पण त्याचबरोबर विवेक आणि सदाचरण हेही तितकेच महत्त्वाचे आहेत, हे स्वामींनी या पूर्वीच्या सहा श्लोकांतून स्पष्ट केले आहे. मानवी जीवनात विवेकाचे महत्त्व आणणारा समर्थांसारखा दुसरा तत्त्ववेता, संत नाही. यापूर्वीच्या श्लोक क्रमांक १०७ मध्ये सत्संगतीने क्रोध आवरता येतो, असे स्वामींनी सांगितले आहे. “म्हणून सत्संगतीचा आश्रय करावा आणि वाईटसंगतीचा त्याग करावा. असे केले; तर तुम्ही मोक्षाचे अधिकारी व्हाल,“ असे स्वामी म्हणाले.

कारण, वाईट संगतीत दुर्गुणाबरोबर अहंकार, द्वेष, मत्सर हेही वाढीस लागतात. त्यामुळे अशांतता निर्माण होते. असे अहंकारी, अशांत मन, माझे म्हणणे हेच खरे असे पक्के समजून प्रत्येक बाबतीत वाद घालीत बसते. अकारण वाद वाढवणे, हे साधकाच्या दृष्टीने अहितकारी असते. समर्थ सांगतात की,

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥
सज्जन माणसांच्या संगतीत राहिल्याने साधकाला, भक्ताला पारमार्थिकदृष्ट्या अनेक लाभ होतात. स्वामींनी सत्संगतीचे महत्त्व या श्लोकात सांगितले आहे. सत्संगतीचा पहिला लाभ म्हणजे, आपल्या स्वभावात बदल घडून येतो. आपली क्रिया पालटते. हा बदल अनुकूल असतो. आपल्या क्रिया भक्तिभावाने होऊ लागतात. आपला व्यवहार चांगला होऊ लागतो.

अर्थात, आपली असत क्रिया पालटते, सत्संगतीने आपल्या आचरणात आमूलाग्र बदल घडून येतो. सदाचरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागते. सदाचरण हे परमार्थाप्रमाणे प्रपंचातही आपल्या मनःस्वास्थ्यासाठी आवश्यक असते. भ्रष्ट आचाराने प्रपंचात सकृतदर्शनी पैशाचा लाभ दिसत असतो. आज भौतिक बाजारपेठा अनेक वस्तूंनी भरलेल्या आहेत. पैशाने या वस्तू म्हणजे सुखसोयी विकत घेता येतात, असा बहुतेकांचा गैरसमज आहे. त्यामुळे जो तो पैशाच्या मागे धावत आहे. सभोवार पाहिले तर असे दिसून येते की, स्वतः कष्ट न करिता पैसा सहजगत्या कसा मिळेल, याचा लोक विचार करीत असतात. भ्रष्ट मार्गांनी पैसा मिळवण्यात काही गैर नाही, असे लोकांना वाटत असते. कारण, सगळेच त्या मार्गाने जात आहेत, तर मी कशाला मागे राहू? असा समज असला तरी भ्रष्ट मार्गाने मिळणारी धनदौलत चिंता वाढवते, असा आजवरचा अनुभव आहे.

कोणत्याही मार्गाने कितीही पैसा मिळवला, तरी जीवनाचे खरे तत्त्वज्ञान समजले नाही; तर त्या पैशाचा आनंद उपभोगता येत नाही. जगातील अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की, आयुष्य कसं जगायचं, याचं तत्त्वज्ञान न समजल्याने अफाट पैसा मिळवूनही आयुष्याच्या अखेरीस नैराश्य त्यांच्या पदरी पडले. जगातील अनेक धनाढ्यांच्या आयुष्याचा शेवट वाईट झाला आहे. त्यात आत्महत्या, वेड लागणे, तुरुंगवास अशीही उदाहरणे आहेत. याचा अर्थ पैसा वाईट आहे, असा नाही. त्याचा हव्यास केल्याने आणि सदाचाराचे महत्त्व न समजल्याने असे घातक दुष्परिणाम दिसून येतात. सज्जनांची संगत केल्यानंतर सदाचाराचे, निःस्पृहतेचे महत्त्व समजते. आपली मानसिक स्थिती पालटते आणि बुद्धी सदाचरणाकडे वळते. हा बदल प्रपंचातील धोक्यांपासून वाचवणारा ठरतो. मन शांत होऊन ते भगवंतांच्या भक्तीबद्दल विचार करू लागते. त्याची भौतिक गोष्टींकडील आवड, त्याचा ओढा कमी होऊ लागतो. भगवंताचा विचार करू लागल्याने परमार्थातील भक्तिभावार्थ ध्यानात येऊ लागतो.

सत्संगतीचा आणखी फायदा म्हणजे, भगवंत हा सर्वश्रेष्ठ असून सर्व शक्तिमान आहे, याची जाणीव होऊ लागते. ही जाणीव झाल्यावर आपला अहंकार, बढाईखोर वागणूक यात बदल होऊ लागतो. एरवी आपला अहंभाव प्रखर असल्याने अहंकार निर्मिती क्षणाक्षणाला होऊन ‘मी श्रेष्ठ’, ‘माझेच मत बरोबर असून इतरांनी ते केले पाहिजे’ असे वाटू लागते. त्याचाच आग्रह धरल्याने इतरांना काही समजत नाही, असा ग्रह निर्माण होतो. त्यामुळे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी माणूस स्वतःच्या बढाया मारू लागतो. असे झाल्यावर माणसाला वायफळ बडबड करण्याची सवय लागते. तथापि, सज्जनांच्या संगतीत राहिल्यावर परमेश्वराच्या अफाट सामर्थ्याची, दयाक्षमा यांची कल्पना येऊ लागते. त्यामुळे आपण बाळगीत असलेला गर्व, अहंभाव किती व्यर्थ आहे, याची जाणीव होऊ लागते. वायफळ बडबडीची, प्रौढी मिरवण्याची सवय कमी होऊन नाहीशी होते.

सज्जनांच्या संगतीत सदाचाराचे महत्त्व समजल्याने माणसे नीतिन्यायाने, निःस्वार्थपणे वागू लागतात. प्रत्यक्ष कृती केल्यावरच माणूस त्यासंबंधी बोलू लागतो. क्रियेवीण असणारी त्यांची वाचाळता दूर सारली जाते. (क्रियेवीण वाचाळता ते निवारी). या सर्वांचा परिणाम असा होतो की, सत्संगतीने निरर्थक वाद घालण्याची सवय कमी होते. मतभिन्नता असेल तर संवाद साधून निष्कर्षाप्रत येते येतो. ’मीपणा‘चा हट्ट सोडला, तर वाद होत नाहीत. ‘आपलेच म्हणणे खरे व दुसरा चुकीचा’ असा समज करून घेणार्‍या दोन पक्षात समन्वय साधला जात नाही. दोन्ही पक्षांना आपापले म्हणणे मांडण्याची संधी देणे याला ‘नॅचरल जस्टिस’ म्हणतात. त्यातून आत्मोन्नतीचा निष्कर्ष दिसेल तेथे वाद संपुष्टात येतात. तत्त्वज्ञान सिद्धांत शोधताना साधकबाधक चर्चा होऊ शकते. त्यातून येणारा निष्कर्ष दोन्ही गटांनी मान्य करणे, याला ‘संवाद’ म्हटले जाते. म्हणून स्वामी सांगतात की, ’तुटे वाद, संवाद तो हितकारी.’ शुष्कवादाच्या आहारी न जाता, अहंभाव सोडून देऊन आत्मोद्धारक संवाद साधणे, सर्वांसाठी हितकारक असते.

७७३८७७८३२२

Powered By Sangraha 9.0