उत्तर प्रदेशात पावसाचा कहर! २४ तासांत १९ मृत्यूंची नोंद

12 Sep 2023 19:11:08

Lucknow Rain


लखनऊ :
उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी जोरदार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लखनऊमध्ये सतत १८ तास पाऊस पडला असून शहरातील काही भागांमध्ये २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याठिकाणी गेल्या १२ तासांत ९३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांतील शाळा दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या.
 
याव्यतिरिक्त कानपूर, बाराबंकी, मुरादाबाद आणि हरदोई याठिकाणीही जोरदार पाऊस कोसळला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यातील २२ जिल्हे मुरादाबाद, संभल, कन्नौज, रामपूर, हाथरस, बाराबंकी, कासगंज, बिजनौर, अमरोहा, बहराइच, लखनौ, बदाऊन, मैनपुरी, हरदोई, फिरोजाबाद, बरेली, शाहजहांपूर, कानपूर, सीतापूर, लखीमपूर खेरी आणि फतेहपूर येथे ४० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
 
राज्याच्या आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाऊस आणि वीज पडून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आयुक्त कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, गेल्या २४ तासांत हरदोईमध्ये चार, कन्नौजमध्ये दोन आणि देवरिया, कानपूर शहर, रामपूर, संभल आणि उन्नावमध्ये प्रत्येकी एकाचा मुसळधार पाऊस आणि बुडण्याशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पावसाचे प्रमाण लक्षात घेत संबंधित जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांना पूर्ण तत्परतेने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासंबंधी सोमवारी एक सरकारी निवेदनही जारी करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0