मध्य प्रदेशातील चित्त्यांच्या मृत्यूमुळे या स्थानांतरण प्रकल्पाविषयी भारतीय समाज निराशावादी वाटतो किंवा तो या प्रकल्पाबाबत निराशावादी व्हावा, असा प्रचार केलेला तरी दिसतो. हा प्रसार आणि त्याच्या प्रचार सांगोवांगीच्या गोष्टींवरून केल्याने हा प्रकल्प म्हणजे ‘सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी’, असा समज समाजमनात निर्माण झालेला दिसतो. त्याविषयीच उहापोह करणारा हा लेख...
दि. 24 ऑगस्ट, 2023. स्थळ होते दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग. ‘ब्रिक्स’ शिखर संमेलनात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा बोलत होते, त्यांच्या समोर आसन ग्रहण करून होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपल्या भाषणावेळी रामाफोसा म्हणाले, “भारताला चित्ते देऊन दक्षिण आफ्रिका संतुष्ट आहे. तुम्ही (नरेंद्र मोदी यांनी) मला सांगितले की, चित्ता हे सुखरुपपणे भारतात दाखल झाले आणि ते भारतात जीवंत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही तुम्हाला अजून चित्ते देण्यास सक्षम आणि तयार आहोत. कारण, तुम्ही असा देश आहात जे मार्जार कुळातील मोठ्या वन्यजीवांची काळजी घेता. त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत.”तुम्हाला जर अजून चित्ते हवेे असतील, तर आमच्याकडे नक्की या. रामाफोसा यांच्या या विश्वासदर्शक विधानांनी सभागृहात एकच आनंदाचा हशा पिकला आणि टाळ्याचा कडकडाट झाला. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील नामिबीया येथून भारतात दाखल झालेले चित्त्यांमधील काही चित्ते हे मृत्यूपंथाला गेले आहेत. असं असताना दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर दाखवलेला हा विश्वास सगळ्यांनाच चकित करणारा होता. मात्र, त्याला पाश्वभूर्मी होती वन्यजीव संवर्धन आणि संशोधन क्षेत्रात भारत स्वीकारत असणार्या नव्या आव्हानांची आणि थोडीबहुत का होईना पण या क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीची. देशातील वन्यजीव संवर्धनाच्या धोरणांमध्ये त्रुटी आहेत का? तर हो त्या आहेत. यामध्ये सुधारणांना वाव आहे का ? तर नक्कीच आहे. आपण भारतात चित्ते जगवू शकतो का ? तर हो जगवू शकतो. मात्र, नेहमी आशावादी असणारा भारतीय समाज भारतातील या चित्ता स्थानांतरण प्रकल्पाबाबत निराशावादी वाटतो. किंवा तो या प्रकल्पाबाबत निराशावादी व्हावा,असा प्रचार केलेला तरी दिसतोय.
झालं असे की, गेल्यावर्षी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात चित्त्यांच्या आफ्रिकन उपप्रजातीमधील (एसिनोनिक्स जुबाटस जुबाटस) 20 चित्त्यांचे भारतात स्थानांतरण करण्यात आले. मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्यांना ठेवण्यात आले. मधल्या काळात त्यामधील एका जोडीला चार पिल्ले झाली. अशातच काही चित्त्यांचा मृत्यू झाला. ही संख्या एक दोन नव्हे, तर नऊवर जाऊन पोहोचली. त्यामध्ये पिल्लांचादेखील समावेश होता. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी अजून चित्ते देण्यासाठी दाखवलेली विश्वासहार्यता या प्रकल्पाबाबत भारतीय समाजात निराशावादी असलेल्या एका चमूला अचंबित करणारी ठरली. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेने नवीन चित्ते देण्यास दाखवलेली समर्थता लक्षात घेता आपण अजून चित्ते भारतात स्थानांतरित करावेत का ? असा प्रश्न पडतो. तर त्याचे उत्तर हो, असे आहे. परंतु, नवे चित्ते दाखल करण्यापूर्वी आपल्या हातून घडलेल्या चुका सुधारूनच या नव्या चित्त्यांचे स्वागत करणे अपेक्षित आहे.
सर्वप्रथम आपण जागा निवडीबाबत विचार करणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी भारतात चित्त्यांचे स्थानांतरण करण्यापूर्वी काही जागांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील दहा संभाव्य अधिवासांची पाहणी करण्यात आली होती. सरतेशेवटी कुनो-पालपूर अभयारण्य, नौरादेही अभयारण्य, गंगासागर अभयारण्य, राज्यस्थानमधील शाहगड गवताळ प्रदेश व मुकुंदरा व्याघ्र प्रकल्प या जागांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला. मात्र, यात कुनोला झुकते माप देण्यात आले. कारण, गुजरातमधील आशियाई सिंहांचे स्थानांतरण करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून कुनो-पालपूरमध्ये नियोजन सुरू होते. त्यामुळे सरतेशेवटी कुनो-पालपूरला प्राधान्य देऊन त्याठिकाणी 20 चित्त्यांना स्थानांतरित करण्यात आले. जागानिवडीबाबत एक विचार असा आहे की , ही संधी केवळ मध्य प्रदेशमधील कुनो-पालपूरला का देण्यात आली ? भविष्यात जर आपल्याला चित्त्यांचे स्थानांतरण इतर राज्यांमधील सुयोग्य गवताळ प्रदेशांमध्ये करायचे होते, तर सुरुवातीपासून हे स्थानांतरण किमान दोन राज्यांमध्ये करणे गरजेचे होते. यासाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या किमान दोन जागांचा विचार करणे अपेक्षित होते. जेणेकरून त्या दोन राज्यांची चित्ता स्थानांतरणासाठी आवश्यक असणारी क्षमता बांधणी एकाच वेळी झाली असती. शिवाय दोन राज्यांमधील वातावरण, हवामान याचा अंदाज घेऊन, त्याची तुलना करून कोणत्या राज्यात चित्त्यांसाठी अनुकूल अधिवास आहे याचा भविष्याच्या अनुषंगाने मापदंड निवडता आला असता. थोडक्यात भविष्यात दक्षिण आफ्रिकेमधून येणारे चित्ते हे पूर्वीच्या चित्त्यांना अनुकूल ठरलेल्या अधिवासामध्ये सोडता आले असते. आता दक्षिण आफ्रिकेने नवीन चित्ते देण्यासंदर्भात दाखवलेली समर्थता लक्षात घेता, एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये त्यांचे स्थानांतरण कसे करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यापद्धतीने आपले प्रयत्न असणे अपेक्षित आहेत.
दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे कुनोमधील चित्त्यांच्या मृत्यूचा. या मृत्यूप्रकरणावरून चांगलेच वादळ उठलेले पाहायला मिळते. सर्वप्रथम म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी एखाद्या वन्यजीव प्रजातीचे स्थानांतरण केले जाते, त्यावेळेस सुरुवातीच्या काळात त्यामध्ये होणारा मृत्यूदर समजून घेऊन तो मान्य करणे अपेक्षित असते. या मृत्यूदराला अनेक बाबी कारणीभूत असतात. मात्र, भारतीय समाजमनात एकूणच प्राण्यांप्रती असलेला भूतदयेचा अतिरेक आणि संवर्धनासंबंधी नसलेली तर्कशुद्धता चित्त्त्यांच्या मृत्यूला अपयशाच्या तराजूमध्ये तोलते. पिल्लांच्या मृत्यूंची कारणमीमांसा जाणून घेतल्यास जागानिवडीमध्ये एकाहून अधिक पर्याय का असावेत, याचाही तर्क लावता येतो. कुनोमध्ये झालेले चित्त्यांच्या पिल्लांचे मृत्यू हे अतिउष्णता आणि डीहायड्रेशनमुळे झालेले दिसतात. मध्य भारतातील उन्हाळी हंगामाची दाहकता लक्षात घेता, पुढच्या काळात त्यावर विचार करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणाच्या हवामान आणि तापमानाचा अंदाज घेऊन कोणत्या ठिकाणचे तापमान आणि हवामान पिल्लांना मानवणारे असेल, याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. कारण, या प्रकल्पातून जन्माला येणारी पिल्लेच या प्रकल्पाचे भविष्य ठरवणार आहेत. चित्त्यांसाठी आवश्यक असणार्या भक्षाचादेखील आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. कारण, ज्या भागातून हे चित्ते आले आहेत त्या भागात चितळ, काळवीट, चिंकारा यांसारखे तृणभक्षी प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे पिंजराबंद अधिवासात चित्त्यांना या प्राण्यांची शिकार करण्यासाठी अधिकाअधिक वेळ देऊन त्यांना यामध्ये सराईत होण्याकडे आपल्याला अधिकाधिक भर देता येईल का, यावरदेखील विचार करणे गरजेचे आहे. भविष्याचा अंदाज घेता भक्षाची संख्या वाढवण्यासाठी ’बोमा’ पद्धतीचा अवलंब करत काळवीट, चिंकारा आणि चितळ या प्राण्यांचे प्रजनन करणेदेखील गरजेचे आहे. आज देशात वन्यजीव संवर्धनाच्या अनुषंगाने आव्हानात्मक असणारे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये माळढोक आणि गिधाडांसारख्या नष्टप्रायः श्रेणीतील पक्ष्यांचे प्रजनन आपण करीत आहोत. माळढोकसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या पक्ष्याचे कृत्रिमरित्या प्रजनन करण्यामध्ये भारतीय वन्यजीव संस्थानला यश मिळाले आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात भारत नवीन आव्हाने स्वीकारत आहे आणि ती पुढेदेखील स्वीकारणार आहे. चित्ता स्थानांतरणाचा हा प्रकल्पदेखील विकसनशील भारताला यश देणाराच ठरणार आहे. मात्र, त्यासाठी भारतीय समाज म्हणून आपण या प्रकल्पाकडे व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
घटनाक्रम
1) 1947 साली छत्त्तीसगढमधील म्हणजेच तेव्हाच्या सरगुजा प्रातांचे महाराजा रामानुज प्रतापसिंह यांनी चित्त्यांची शिकार केली.
2) महाराजा प्रतापसिंह यांनी शिकार केलेले हे चित्ते देशातील शेवटचे तीन चित्ते होते.
3) शिकारीमुळे भारतामधून आशियाई चित्त्याची उपप्रजाती (एसिनोनिक्स जुबाटस वेनाटिकस) संपुष्टात आली.
4) भारतामधून आशियाई चित्ता नामशेष झाल्याचे 1952साली जाहीर करण्यात आले.
5) पुढच्या काळात आखाती प्रदेश, मध्य आशिया आणि भारतातील आशियाई चित्ते हे शिकारीमुळे केवळ अन् केवळ इराणपुरते सीमित झाले.
6) भारतात शिकारीवर रोख लागलेली नसतानाही 1970 साली भारतामध्ये पुन्हा चित्ते आणण्याबाबत चर्चा सुरू झाली. यासाठी इराणला विनवणी करण्यात आली.
7) देशात लागलेल्या आणीबाणीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
8) 2009 साली केंद्र सरकारने विचारणा केल्यानंतर इराणकडून नकार मिळाला.
9) दक्षिण आफ्रिकेसोबत चर्चा झाल्यानंतर चित्त्यांसाठी भारतामधील जागांचा शोध घेण्यात आला.
10) 2012 साली सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर तात्पुरती बंदी आणली.
11) 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत सरकारला भारतात चित्ते स्थानांतरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.
12) 2022 साली भारतात 20 चित्ते नामिबियामधून दाखल झाले.