पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट; आठ लोक जखमी!
11 Sep 2023 16:17:12
इस्लामाबाद : पाकिस्तानातील पेशावर शहरात सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटात एका सुरक्षा जवानाचा मृत्यू झाला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी एका वाहनाला लक्ष्य करून झालेल्या बॉम्बस्फोटात निमलष्करी दलाचे चार कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या राजधानीत वारसाक रोडवरील प्राइम हॉस्पिटलसमोर फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीच्या (एफसी) जवानांवर हा हल्ला झाला. वारसाकचे पोलिस अधीक्षक (एसपी) मोहम्मद अर्शद खान यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार पाच एफसी अधिकारी आणि तीन नागरिक या स्फोटात जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट एक सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) हल्ला होता. खान म्हणाले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून स्फोटाच्या सखोल तपासासाठी बॉम्ब डिस्पोजल युनिटचा अहवाल तयार करण्यात येत असून, त्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल.
अलीकडे पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी तालिबानी अतिरेक्यांनी वायव्य खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील दोन सीमा चौक्यांवर हल्ला केला, ज्यात चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि सात जण जखमी झाले.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ची स्थापना २००७ मध्ये अनेक दहशतवादी संघटनांच्या समूहाप्रमाणे झाली होती. हा गट अल-कायदाच्या अगदी जवळचा मानला जातो आणि आतापर्यंत त्याने पाकिस्तानमध्ये अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत.