आमच्या घरातील पाळीव किंवा आजूबाजूला फिरणार्या भटक्या मांजरींमुळे काही प्रदेशनिष्ठ प्रजाती नामशेष झाल्या आहेत, असे तुम्हाला कोणी सांगितले, तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण, असं खरंच घडलं आहे. ऑस्ट्रेलियातील सरकारने नुकतेच याविषयी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानिमित्ताने भटक्या किंवा फिरसत्या मांजरींचा प्रदेशनिष्ठ प्रजातींना कसा धोका निर्माण होतो, होऊ शकतो त्याचा आढावा घेऊया.
मांजर मुख्यत्वे मांसाहारी असलेली सस्तन प्राण्याची प्रजात. त्यामुळेच भटक्या मांजरी विविध स्वदेशी प्रजातींची शिकार करतात. गुरूवार, दि. ७ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण मंत्रालयाने फिरस्ती मांजरींमुळे प्रदेशनिष्ठ प्रजातींचे होणारे नुकसान पाहता, या मांजरींविरोधात युद्धच पुकारले आहे. प्रतिष्ठित मूळ प्रजातींना विलुप्त होण्यापासून संरक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जलमंत्री तान्या पिल्बरसेक यांनी ही घोषणा केली. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी (ANU) यांनी २०१९ मध्ये प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये दोन अब्जांहून अधिक सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी मांजरांचे बळी ठरतात.
गेल्या २०० वर्षांमध्ये विलुप्त झालेल्या ऑस्ट्रेलियन प्रजातींमध्ये दोन तृतीयांश इतका मोठा वाटा मांजरींचा आहे, असा दावा ही त्यांनी केला आहे. म्हणजेच मांजरींनी या पक्षी आणि प्राण्यांची शिकार करुन त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आणले. प्रदेशनिष्ठ प्रजातींची अशाप्रकारे शिकार झाल्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. मांजरींचे प्रमाण वाढून या शिकारीच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून, अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत, तर काही संकटग्रस्त असण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. ऑस्ट्रेलियातील ४८ अशाच प्रदेशनिष्ठ प्रजातींचा समावेश आता धोक्यात असणार्या तसेच नामशेष झालेल्या प्रजातींच्या यादीत झाला आहे. यामध्ये काही जमिनीवर राहणारे पक्षी आणि लहान ते मध्यम आकाराच्या सस्तन प्राण्यांचा देखील समावेश आहे. बिल्बी, बंडीकूट, बेटॉन्ग आणि नुंबट यांसारख्या अनेक भूपृष्ठवंशीय धोक्यात असलेले प्राणी कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ही भटकी मांजरं.
अमेरिकेचीही गोष्ट काहीशी अशीच. तेथील एका अहवालात जगभरातून किमान ३३ प्रजाती नामशेष होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत, असे सांगितले आहे. स्टीफन्स आयलॅण्ड रेन, क्रेसेंट नेलटेल वॉलबी आणि डेसर्ट बॅण्डिकूट यांसह डझनभर प्रजातींसह इतर अनेक प्रजाती वाचवण्यास आपल्याला आधीच खूप उशीर झाला आहे. सरपटणारे प्राणी जसे की सरडे, छोटे साप, कमी उंचीवर उडणारे पक्षी आणि खारीसारखे सस्तन प्राणी मारून खाण्यावर भटक्या मांजरींचा डोळा असतो. यामध्येच आजतागायत अनेक प्रजातींचा बळी गेलाय.
यामुळे प्रदेशनिष्ठ प्रजातींचा अधिवास आणि संख्येवर परिणाम तर होतोच आहे; पण त्याचबरोबर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिसंस्थेतील इतर घटकांनाही त्याचा धक्का पोहोचत आहे. परस्परावलंबी असलेली परिसंस्था टिकवण्यासाठी भटक्या मांजरींवर लगाम घालणे गरजेचं झालं. पण, मांजर मोठ्या संख्येने प्रजनन करणारी प्रजात असल्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे कठीण झाले आहे.
ऑस्ट्रेलिया हे भटक्या मांजरींमुळे नामशेष होणार्या प्रजातींचे मोठे केंद्रच बनलेले दिसते. भटक्या मांजरींपासून मुक्त असलेली ऑस्ट्रेलिया मला बघायचीय, त्यामुळे आपण त्यावर काम करायला, हवं असं आवाहन ऑस्ट्रेलियाच्या तान्या पिल्बरसेक यांनी केले आहे. आता काम केलं नाही, तर आणखी प्रजातींना आपल्याला मुकावं लागेल, असं म्हणत त्यांनी याविषयीचा कृती आराखडा, ही सांगितला आहे. मांजरांविषयी प्रेम असणं साहजिक असलं तरी अज्ञानी भूतदयेतून इतर जीवांवर त्याचे परिणाम होणार नाहीत ना, यावर लक्ष ठेवायला हवे. थोडक्यात काय, प्राण्यांप्रती असलेलं प्रेम वास्तव आणि विज्ञानाच्या स्तरावर जोखलेलं असावं इतकचं, तरच परिसंस्थेतील इतर घटकांचं स्थान अबाधित राहील, हे निश्चित!