जगात नवी सत्ताकेंद्रे उदयास येत आहेत : रशियन परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह

10 Sep 2023 16:34:53
Russian Foreign Minister Sergey Lavrov In G20 Summit

भारत मंडपम, नवी दिल्ली : भारताच्या ‘जी२०’ अध्यक्षपदाच्या सक्रिय भूमिकेद्वारे इतिहासात प्रथमच ग्लोबल साऊथमधील देशांना एकत्रित करण्यात आले आहे. याद्वारे नवी सत्ताकेंद्रे उदयास येत असल्याचे रशियास दिसून येत आहे. हितसंबंधांच्या स्पष्ट व न्याय्य समतोलासाठीसाठी प्रयत्न करण्याच्या मुद्द्याच्या समावेशामुळे नवी दिल्ली घोषणापत्र हे ‘माईलस्टोन’ ठरले आहे, असे प्रतिपादन रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी केले.

हितसंबंधांच्या स्पष्ट आणि न्याय्य संतुलनासाठी प्रयत्न करण्याच्या गरजेबाबत घोषणापत्रामध्ये एक निरोगी उपाय सापडला आहे. हा एक चांगला उद्देश असून आगामी ब्राझील आणि त्यानंतर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाच्या काळातही याच भूमिकांचा पुनरुच्चार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवी दिल्ली शिखर परिषदेत मांडलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये भारताच्या जी२ अध्यक्षपदाच्या अखेरीस व्हर्च्युअल ‘जी२०’ सत्र आयोजित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावाचेही लावरोव्ह यांनी स्वागत केले आहे.

सेर्गेई यांनी पाश्चिमात्य देशांवर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशांनी यापूर्वी वेळोवेळी हवामान बदलाच्या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी दरवर्षी १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यावर काहीही झाले नाही. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत हितसंबंध राखण्यासाठी दीर्घकालीन आश्वासनांनुसार करणे आवश्यक असलेल्या कार्यांचाही नवी दिल्ली घोषणापत्रात करण्यात आलेला उल्लेख अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

युक्रेनविषयी भारताची भूमिका महत्त्वाची – लावरोव्ह

युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर पाश्चात्य देशांना आपली भूमिका मांडण्यापासून रोखण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. शिखर घोषणेने स्पष्टपणे संदेश दिला की जगातील लष्करी संघर्ष संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार सोडवले जाणे आवश्यक आहे. जग आता पाश्चात्य शक्तींच्या संकल्पनांवर पुढे जाऊ शकणार नसल्याचाही संदेश दिला आहे. नवी दिल्ली शिखर परिषदेने जागतिक प्रशासन आणि जागतिक अर्थव्यवस्थेत निष्पक्षतेची दिशाही दिली आहे. त्याचप्रमाणे जगात नवी सत्ताकेंद्रे उदयास येत असून यापुढे पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व कायम राहणार नसल्याचेही स्पष्टपणे दिसून येत असल्याचे लावरोव्ह यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0