जंगल, समुद्र आणि इतर परिसंस्थेतील जैवविविधतेविषयी अनेक माध्यमांमार्फत आपल्याला माहिती मिळते. पण, पठारांची नेहमीच पडीक जमीन म्हणून गणना केली गेली असली तरी तेथील जैवविविधतेला एक वेगळं महत्त्व आहे. या परिसंस्थेच्या अनेक आयामांबद्दल चर्चा करणारा हा विस्तृत लेख...
जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी असलेल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. समृद्ध जैवविविधतेने नटलेला असल्यामुळेच की काय याला जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा ही प्राप्त झालेला आहे. आपण अनेकदा जंगलांमधील जैवविधिता, समुद्रातील, प्राण्यांची, पक्ष्यांची जैवविविधता पाहतो-ऐकतो, आज त्यामुळेच आपल्याला तिचं महत्त्व ही माहीत आहे. पण, पठारांवर ही बरीच मोठी आणि वैविध्यपूर्ण जैवविविधता आढळते हे दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांना माहीतच नाही. याच मोकळी माळराने किंवा पठारांना ग्रामीण भाषेत सडा असा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो.
जगाच्या नकाशावर वेस्टलँड म्हणून दिसणार्या या सड्यांवरची परिसंस्था जाणून घेण्याआधी त्यांची निर्मिती कशी झाली हे पाहूया. पृथ्वीवर असणार्या अनेक वेगवेगळ्या भुरूपांपैकी एक म्हणजे पठार. समुद्रसपाटीपासून काही उंचीवर काहीसा सपाट पसरलेला एक प्रदेश असे पठाराचे वर्णन करता येईल. अशा प्रकारच्या पठाराची निर्मिती काही एक दिवसात किंवा काही क्षणात झालेली नसून ती एक सावकाश चालणारी भौगोलिक प्रक्रिया आहे. कित्येक वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून बाहेर पडलेले खडक, त्यांची झीज होऊन निर्माण झालेले छोटे दगड किंवा माती, खंडांची एकमेकांना धडक होऊन निर्माण झालेली घडीची पर्वतरांग आणि या सर्व परिस्थितीतून आकाराला आलेली ही परिसंस्था म्हणजे निसर्गाची किमयाच नाही का!?
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही अनेक सडे आहेत. कोकणात प्रामुख्याने लॅटराईट म्हणजेच जांभा खडक आढळतो. महाराष्ट्रात मुख्यतः काळ्या खडकांपासूनच जांभा खडक तयार होतो. उन्हाळ्यात अगदी निर्जन आणि ओसाड दिसणारे सडे सुरुवातीच्या पावसात मात्र हिरवाईने नटतात. आधी पाहिलेल्या सड्यावर विश्वासही बसू नये, इतके आमूलाग्र आणि वेगाने त्याच्यात बदल होतात. उन्हाळ्याच्या किंवा पाऊस नसतानाच्या कालावधीत ही अनेक प्रकारचे कीटक, सर्प यांचे हे मुख्य अधिवास केंद्र असते, तर पावसाळ्यात काही विशिष्ट कालावधीमध्ये हा सडा विविध रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून जातो. यामध्ये कापरे कमळ, नतेशी, दिपकाडी यांबरोबरच अनेक छोट्या वनस्पती ही वाढतात. यात असलेल्या अनेक प्रजाती महाराष्ट्र तसेच कोकणासाठी प्रदेशनिष्ठ असतात. काही कालावधीसाठी हा बहर राहिला की फूलं आपोआप सुकून जायला सुरुवात करतात. यानंतर काही इतर प्राणी किंवा कीटक सड्यांवर यायला सुरुवात करतात.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये सड्यांवर अधिवास असलेल्या काही नव्या प्रजातींची नोंदही करण्यात आली आहे. यातील काही वनस्पती किंवा कीटक हे ‘आययुसीएन’च्या यादीत ही समाविष्ट आहेत. त्यामुळेच संशोधकांच्या अभ्यासामुळे सड्यांवरील मुक अधिवासाला एक प्रकारे वाचाच फुटते आहे असं म्हणावं लागेल.
छोट्या झुडुपवर्गीय प्रजातींबरोबरच सड्यांवर अनेक छोटी डबकी, ओहळ आढळतात. यापैकी काही मानवनिर्मित असतात तर अनेक निसर्गनिर्मित ही आढळतात. यावर ही एक वेगळी परिसंस्था अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच या जलस्रोतांच्या आधारे सड्यांवर हंगामी शेती करण्याची पद्धत ही पुर्वापार चालत आलेली आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक विस्तीर्ण सडे आहेत. यातील अनेक सड्यांवर कातळशिल्पे ही आढळतात. कातळशिल्पांना किंवा कातळ सड्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणलं जातं. कातळशिल्पे म्हणजे सड्यांवर कोरलेली काही विशिष्ट चित्रे आहेत ज्यामध्ये विविध आकार असलेले पाहायला मिळतात. या चित्रांच्या आधारे कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे अद्याप सापडले नसले तरी त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. प्राचीन संस्कृतीबद्दल यातून माहिती होईल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
‘आययुसीएन’च्या लाल यादीमध्ये अधिवास नामशेष होण्याच्या जवळ असलेल्या प्रजातींची वर्गवारी केली जाते. सड्यांवर आत्ता आढळलेल्या संशोधनांच्या आधारे नतेशी ही केवळ कोकणातील रत्नागिरीच्या सड्यावर आढळणारी एक प्रदेशनिष्ठ प्रजात आहे. ढोकाचे फुल, आंबोली टोड (बेडकाची प्रजात), डोरले पाल या प्राण्यांचा ही लाल यादीत समावेश आहे, तर यात काही संकटग्रस्त प्रजाती ही आहेत. शेवाळे, लायकेन, बुरशी, मॉस, नेचे तसेच सपुष्प वनस्पतींची जैवविविधता सड्यांवर दिसते. अशा प्रकारची समृद्ध जैवविविधता या सड्यांवर असताना ही एक ना अनेक कारणांमुळे ही परिसंस्था आता र्हासाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
सडे किंवा पठारांवर याआधी ही गुरे चराई होत होती. मात्र, आता तिचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अतिगुरे चराईमुळे येथील अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. लॅटेराईट म्हणजेच जांभा खडक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे चिरे खाणींच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. भूसंपादनामुळे या सडा अधिवासांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा सड्यावरची जागा बागायती क्षेत्र किंवा अतिप्रमाणावर शेतीसाठी तिचा वापर करणे हे ही तेथील परिसंस्थेला धक्का पोहोचवणारं आहे.
जगाच्या नकाशावर वेस्टलँड्स म्हणून गणल्या जाणार्या या परिसंस्थेचे महत्त्व आणि विपुल जैवविविधतेचे महत्त्व तुमच्या लक्षात आले असेलच. सड्यात नेमकं दडलंय काय हे जाणून घेतल्याशिवाय इथे कोणताही मानवी हस्तक्षेप करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतल्यासारखे होणार आहे. हजारो जीवांचे घर असणारा हा सडा असा पडीक जमीन म्हणून गणना थांबवून त्यावर अधिकाधिक संशोधन होणं नितांत गरजेचं आहे. पठारावरील खडकापासून, माती, फुले, वनस्पती, प्राणी, विविध जीव, कातळशिल्पे अशा बहुरंगी गोष्टींनी नटलेली ही सडा परिसंस्था वेस्टलँड नसून खर्या अर्थाने बेस्टलँडच आहे...!!
“ सड्यांवरील दुर्मीळ, प्रदेशनिषठ प्रजती नाहिशा होऊ घातल्या आहेत. यासाठी त्यांची गणना, त्यांना जगण्यासाठी आवश्यक घटक, त्यांचे परस्परसंबंध यावर संशोधन गरजेचे आहे. त्यातूनच संरक्षण योजना बनवता येईल."
- डॉ. अपर्णा वाटवे, समन्वयक, रॉक आऊटक्रॉप्स नेटवर्क
“फार पूर्वीपासूनच स्थानिक हे सड्यांशी जोडलेले आहेत..पूर्वी प्रामुख्याने गुरेचराई, खर शेती, सरपण अशा कारणांसाठी वापरात येणार्या सड्यांवर आता काळानुरूप बदल झाले आहेत. परंतु ही स्थित्यंतरे स्थानिकांच्या उत्कर्षासोबतच सड्यांचं नैसर्गिक अस्तित्व अबाधित ठेवून व्हायला हवीत. स्थानिकांमध्ये सड्यांबाबत जनजागृती आणि सड्यांवर शाश्वत विकास यातूनच हे साध्य होऊ शकतं."
- सोनाली मेस्त्री, सरपंच, कशेळी गाव
“कोकणातील किनारी प्रदेशात सड्यांभोवती इथल्या सगळ्या लोकांचं जीवन बांधलेलं आहे. इथला लँडस्केपच मुळात सड्यांनी नियंत्रित केलेला आहे. यामुळे गुरांना चारा, भुजलाचे पुनर्भरण, चरण्यासाठी मुबलक जागा, वन्यप्राण्यांना आसरा अशा अनेक सेवा सड्यांकडून मिळत असतात आणि त्यामुळे ग्रामीण जीवन सड्याभोवती बांधलेलं आपल्याला दिसतं."
- डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई,
भूगोल विभागप्रमुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय,
रत्नागिरी
“स्थानिक किंवा आपल्याच लोकांमध्ये सड्यांवर असलेल्या जैवविविधतेविषयी माहीत नसतं ही शोकांतिका आहे. आपल्या परिसरात काय आहे हे पाहण्यासाठी त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला हवं, यासाठी त्या प्रजातींच्या रीतसर नोंदी करणं ही बाब अत्यंत गरजेची वाटते."
- हर्षद तुळपुळे, पर्यावरण अभ्यासक
“लॅटरिटिक पठारांमध्ये अनन्यसाधारण जैविक विविधता आहे. उभयचर, सरपटणारे प्राणी आणि इतर खडकात राहणार्या प्राण्यांसह अनेक प्राणी या पठारांमध्ये सैल खडक, खडकांवरील डबके आणि इतर तत्सम अधिवासांचा वापर करतात. यापैकी काही प्राणी फक्त या पठारांमध्ये आढळतात (प्रदेशनिष्ठ) आणि जमिनीच्या वापरातील बदलांमुळे धोक्यात आले आहे. योग्य संवर्धन योजना विकसित करण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे."
- जिथीन विजयन, संशोधक