'मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ वगैरे सौंदर्य स्पर्धा जगाच्या कानाकोपर्यात म्हणा सुरूच असतात. त्यात गैर वाटावे, असे काही नाही. ललनांच्या, लावण्यवतींच्या सौंदर्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा सोहळा म्हणून या कार्यक्रमांकडे बघितले जाते. त्यातच मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या तरुणींसाठी, तर या स्पर्धा म्हणजे भविष्यातील संधीचे द्वारच. त्यामुळे काही तरुणींनाही या स्पर्धांचे, त्यातून मिळणार्या झगमगाट आणि प्रसिद्धीचे एक सुप्त आकर्षण असते. पण, बरेचदा अशा सौंदर्य स्पर्धा वादाच्या भोवर्यात सापडतात. मग ते निवडप्रक्रियेतील वर्णभेदाचे आरोप असो किंवा परीक्षकांनी निकाल देताना केलेला भेदभाव. अशा वादांमुळे या सौंदर्य स्पर्धांना वेळोवेळी गालबोटही लागते. असाच एक विचित्र प्रसंग नुकताच इंडोनेशियातील सौंदर्य स्पर्धेदरम्यान घडल्याने, अशा स्पर्धांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इंडोनेशियामध्ये दि. २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान ‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील विजेतीला जागतिक ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत इंडोनेशियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळेल. त्यादृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची. परंतु, या सौंदर्य स्पर्धेदरम्यान सहा मॉडेल्सने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. या मॉडेल्सने याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली असून, आता चौकशीलाही सुरुवात झाल्याचे समजते. या मॉडेल्सने केलेल्या दाव्यानुसार, त्यांना शारीरिक तपासणीच्या नावाखाली एका खोलीत नेण्यात आले. त्या खोलीत एक-दोन नव्हे, तर तब्बल २० जण उपस्थित होते. त्यातील बहुतांशी पुरूष. खोलीचा दरवाजाही पूर्णपणे बंद नव्हता. यावेळी या मॉडेल्सना त्यांच्या अंगावरील सर्व वस्त्रे काढायला लावून निर्वस्त्र केले गेले. हात-पाय फाकवून विचित्र पद्धतीने ‘पोस’ द्यायलाही भाग पाडण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांची तशीच नग्नावस्थेतील छायाचित्रे टिपली गेली. व्हिडिओही काढले.
तेही आता इंडोनेशियामध्ये व्हायरल झाले आहेत. तसेच, तेथील प्रसारमाध्यमांनीही संबंधित मॉडेल्सचा चेहरा आणि काही शरीराचे भाग अंधूक करुन ते व्हिडिओ चक्क प्रसारितही केले. “मी गोंधळलेली आणि पूर्णपणे अवघडलेल्या अवस्थेत होते. मला वाटले, कोणी तरी माझ्या शरीराकडे अगदी टक लावून बघतयं.” त्या मॉडेल्सपैकी एकीची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी ठरावी. खरं तर या प्रकरणामुळे इंडोनेशियासह जगभरातील फॅशन क्षेत्रात एकच खळबळ उडाली. इंडोनेशियामध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आयोजकांविरोधात कारवाईचीही मागणी केली. त्यात इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल आणि जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश. त्याच देशात ही घटना घडल्याने आधीच अशा स्पर्धांना विरोध असलेल्या कट्टरतावाद्यांच्या विरोधाची धार आणखीनच वाढली. असे प्रकार देशामध्ये कदापि खपवून घेणार नाही, म्हणत त्यांनीही आयोजकांना गजाआड करण्याची मागणी केली. त्यामुळे ‘मिस युनिव्हर्स’सारख्या सौंदर्य स्पर्धांआड लपलेली ही कुरूप मानसिकताच यानिमित्ताने समोर आली आहे.
फॅशन, मॉडेलिंग ही इंडस्ट्रीच खरं तर केवळ भारतात नाही, तर जगभरातच तशी बदनाम. लैंगिक छळ, अत्याचार, वर्णभेद, व्यसनाधीनता आणि अशा बर्याच कारणांनी या सौंदर्य स्पर्धांना गालबोट लागलेले दिसते. तसेच, या स्पर्धेत सहभागी होणार्या किंवा या इंडस्ट्रीतील तरुणींचे चारित्र्याशी काही देणेघेणेच नाही, असे सरसकट मानून त्यांच्याकडे केवळ शोभेच्या वस्तूंप्रमाणे बघण्याची एक कुप्रथा रूढ झालेली. त्यामुळे ही वासनांध मानसिकता कशी बदलता येईल, हाच खरा प्रश्न. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अशा घटना सौंदर्य स्पर्धांसारख्या व्यासपीठावर आणि पडद्यामागेही घडत असतात. पण, त्याविरोधात तरुणी अब्रूच्या, करिअरच्या भीतीने मुकाट्याने हे अत्याचार सहन करतात. पण, इंडोनेशियाच्या याप्रकरणात या तरुणींनी या प्रकरणाला वाचा फोडली; ते बरे केले. त्यामुळे आपण सौंदर्य स्पर्धेत सहभागी होतोय, म्हणजे आपल्या शरीरावर, सौंदर्यावर आयोजकांचा तीळमात्रही अधिकार नाही, हा संदेश यानिमित्ताने जगभर पोहोचायला हवा. शिवाय, महिलांचे अधिकार, स्त्रीमुक्ती चळवळीतील मंडळींनीही या प्रश्नाकडे तितक्याच गांभीर्याने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. तसे झाले तरच या स्पर्धांमधील निखळ सौंदर्य उजळून वासनांधता लोप पावेल.