मदनदासजी : समर्पणाचा मूर्तिमंत आदर्श

07 Aug 2023 17:25:36
Article On Madandas Devi written By Shashikant Ghasakadbi

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनी मदनदासजींची एका प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भेट झाली. जुजबी ओळख झाली. पण, त्यावेळी पहिल्याच भेटीत मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलो. ‘कार्यकर्ता कसा असावा?’ या सत्रात अनेकदा एक सुभाषित सांगितले जात असे - ‘वज्रादपि कठोराणि मृदूणी कुसमादपि।’ म्हणजे कार्यकर्ता स्वतःच्या बाबतीत कठोर, तर दुसर्‍याच्या बाबतीत फुलाप्रमाणे मृदू असला पाहिजे. मदनदासजी या उक्तीचे तंतोतंत पालन कार्यकर्ता म्हणून आपल्या व्यवहारात ते करीत होते.
 
अमळनेरला अभाविपचा पश्चिम क्षेत्राच्या पूर्णकालिक कार्यकर्ता वर्गाच्या निमित्ताने मदनदासजी आलेले होते. त्यापूर्वी अनेक सत्रांतून त्यांचं भाषण ऐकले होते. त्यामुळे अमळनेरात मराठी वाङ्मय मंडळातर्फे त्यांचे व्याख्यान आयोजित करावे, असे आम्ही मंडळाच्या पदाधिकार्‍यांना सुचवले व त्यांनी ते मान्यही केले. मदनदासजी तसे खूप फर्डे वक्ते नव्हते. पण, त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेला समर्पण भाव, प्रदीर्घ अनुभव आणि विषय मांडणीतली मृदूता मनाला सहज भिडून जात असे. त्यावेळी परिषद संघ वर्तुळाच्या बाहेरील अनेकांनी त्यांचे भाषण ऐकले आणि ते प्रभावित झाले.
 
’एकदा मन मोठं केलं की त्यात सारं काही सामावून घेता येतं’ अशा आशयाचा एक विषय मदनदासजींनी ’मनाची व्यापकता’ या सत्रांतर्गत मांडल्याचे आजही आठवते. त्याची सुरुवात त्यांनी एका साधारण उदाहरणातून केली होती. ते म्हणाले, ‘’सकाळी मी बाथरूममध्ये स्नानाला गेलो. माझा टॉवेल, साबण इ. बाथरूममध्ये ठेवले व काही कारणासाठी मी बाहेर आलो तेवढ्यात कुणीतरी दुसरा कार्यकर्ता आंत गेला त्याने माझा टॉवेल, साबण सर्व काही वापरल्याचे पाहून मला क्षणभर प्रचंड राग आला. पण दुसर्‍याच क्षणी माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की माझा टॉवेल? माझा साबण? मी तर संघटनेला समर्पित कार्यकर्ता आहे. मग तेवढं माझं मन व्यापक नको का? हा विषय ३० ते ४० मिनिटे मांडून त्यांनी सर्वांनाच अंतर्मुख केले. या मनाच्या व्यापकतेचा अनुभव त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने घेतला आहे.

१९८८/८९ च्या सुमारास म़ुंबईत परिषदेचं अखिल भारतीय अधिवेशन होतं. त्यावेळी वनवासी कल्याण आश्रमाच्या कामासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बाहेर पडायचं असा विचार सुरू होता. चंद्रकांतदादाशी तसं बोलूनही झालं होतं. पण मनात अनेक प्रश्न होते आणि अमळनेरच्या कामात दीर्घकाळ कार्यरत असल्याने त्याविषयी काही चिंता होत्या. चंद्रकांतदादाने त्यांची भेट घालून दिली. जवळपास एक ते दीड तास झालेल्या गप्पांमधून त्यांनी सर्व विषय अत्यंत सकारात्मक पद्धतीने दूर केले आणि माझा पूर्णवेळ निघण्याचा विचार पक्का झाला.

जवळपास १० ते १२ वर्ष कल्याण आश्रमात काम केल्यानंतर थांबण्याचा विचार नव्हताच पण घरी काही अचानक घडलेल्या दु:खद घटनांमुळे थांबणे अनिवार्य होते. बिहारला कल्याण आश्रमाच्या एका अखिल भारतीय बैठकीच्या वेळी अ.भा.संघटनमंत्री भास्करराव कळंबी यांच्याशी याबाबत चर्चा करत असताना योगायोगाने मदनदासजी त्यावेळी सहसरकार्यवाह म्हणून बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते ते ही चर्चेच्या वेळी उपस्थित होते. भास्कररावांची इच्छा मी काम सुरू ठेवावे अशी होती. पण पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करताना संपूर्ण परिवाराचा भार संघटनेवर टाकणे मला योग्य वाटत नव्हते. आमच्या या चर्चेत मदनदासजींनी सहभागी होऊन शशिकांत म्हणतोय ते बरोबर आहे त्याला तुम्ही मुक्त करा, असे सांगितले. भास्करराव मिश्किल हसत म्हणाले, आता सहसरकार्यवाहांनीच सांगितले म्हटल्यावर प्रश्नच उरत नाही. त्यानंतर थांबण्याचा निर्णय झाला.
 
थांबल्यावर नंदुरबारात स्थायिक झालो त्यावेळी मदनदासजी नागपूरला हावडा एक्सप्रेसने जाणार होते. मी आणि सध्याचे प्रांत प्रचारक रामानंदजी काळे त्यांना नाश्ता घेऊन भेटायला गेलो. त्यावेळी मदनदासजी म्हणाले, “शशिकांत आमचा जुना मित्र आहे.” मदनदासजींचं एकूण सर्वच बाबतीत असलेलं मोठेपण पाहता त्यांनी इतक्या सहजपणे असं म्हटल्याने मला अवघडल्यासारखे झाले. पण, मनात विचार आला की मदनदासजींनी संघ आणि परिषदेत तीन ते चार पिढ्या घडवल्या, त्या याच मित्रत्वाच्या नात्यातून ते सर्वांचेच सन्मित्र होते.

त्यांची शेवटची भेट गेल्यावर्षी ठाणे येथे प्रा. मिलिंद मराठे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमाच्या वेळी झाली. ते आल्याचे समजताच कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना नमस्कार करण्यासाठी गेलो. व्हीलचेअरमध्ये बसलेले मदनदासजीं पाहून मन गदगद झाले. पदस्पर्श करून मी नाव सांगितले तेव्हा “तू आधी बारीक होतास. लठ्ठ झाल्यावर कसं ओळखणार?” ही त्यांची भेट शेवटची ठरेल, असे वाटले नव्हते.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या पंक्ती यावेळी आवर्जून आठवतात की,

घेतले न व्रत आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास माने
जे दिव्य दाहक असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले
करी हे सतीचे॥
मदनदासजी आयुष्यभर याच विचाराने जगले आणि शांतपणे आपल्या आहुती या मातृभूमीच्या सेवा यज्ञकुंडात समर्पित केल्या. त्यांच्या पावन स्मृतींना शत शत नमन!

शशिकांत घासकडबी
९५२७१५३९२५



 
Powered By Sangraha 9.0