स्मरणीय मदनदासजी...

    07-Aug-2023
Total Views |
Article On Madandas Devi Written By Shekhar Dhuri

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबईतील रौप्य महोत्सवी अधिवनेशनानिमित्त वसईत आम्ही विद्यार्थी मेळावा आयोज्ति केला होता. त्या मेळाव्यास राष्ट्रीय संघटनमंत्री मदनदास देवी व प्रदेश सरचिटणीस माधव ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. तेजस्वी चेहरा व ओजस्वी भाषणाने त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.

त्याकाळच्या वसईसारख्या खेडेगाव वजा शहरात राष्ट्रीय संघटनमंत्री येऊन विद्यार्थी कार्यक्रम घेतात, त्याचे आज खरोखरीच आश्चर्य वाटते. त्यानंतर ते वसईत आले होते. माझे आजोबा महोदव नारायण धुरी यांच्या निधनानिमित्त ते वसईत आले होते. त्यांच्याबरोबर मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रा. अशोक मोडक होते. अर्धा तास ते दोघेही वसईत थांबले. दु:खातील दिवसांत माझे वडील व काका यांचे त्यांनी सांत्वन केले. लोकल ट्रेनने ते आले आणि गेले.

मी वर्तक महाविद्यालयावर मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलो. तेव्हा त्यांनी मुंबई कार्यालयात पेढे मागवून माझे अभिनंदन केले. तेव्हा अभाविप मुंबई विद्यापीठ विद्यार्थी निवडणुका लढवत नव्हती. मुंबईत मी अभाविपचा पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो. तेव्हा, गोरेगाव येथील पांडुरंगवाडीतील सदनिकेत आम्ही काहीजण राहत होते. अधूनमधून मदनदासजी एखादी रात्र काढण्यासाठी तेथे येत असत. महाडचे गणेश जोशी यांच्या पायाच्या अपघातामुळे ते तेथेच प्लास्टर बांधून आमच्यासोबत राहत असत. आणीबाणी काळात ‘मिसा’मध्ये त्यांचेही नाव होते. म्हणून ते उपचार घेत मुंबईत राहत होते.

एके सकाळी पहाटे मदनदासजी आले होते. ते नित्यनियमाप्रमाणे मासिके व वर्तमानपत्रे चाळत असताना त्यांना दत्ताजी भाले यांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. ते वाचत असताना ते ओकसाबोक्शी रडायला लागले. त्यांना फार वाईट वाटत होते. गणेश जोशींनी त्यांचे सांत्वन करत त्यांना शांत केले. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून माझे काम संपले तेव्हा मी वसईत आलो. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नंतर नवघर ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी अभाविपच्या मुंबई कार्यालयात त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला पाहताच ‘व्हिलेज लिडर’ म्हणून मला हाक मारली.

मदनदासजी एकदा मुंबईत अभाविपच्या कार्यक्रमात म्हणाले होते, “आपण स्वत:च्या संघटनेला ‘अखिल भारतीय’ म्हणतो, पण ईशान्य भारतातील कित्येक राज्यांत आपण पोहोचलेलो नाही आहोत. अफू, गांजा आणि गर्दच्या नादात तेथील तरुण पिढी वाया जात आहे. भारताला आपला देश मानायला कित्येक नागरिक तयार नाहीत.” नंतर योजनाबद्ध रीतीने देशभरातील अनेक पूर्ण वेळ कार्यकर्ते अभाविपचे माजी अध्यक्ष पद्मनाभ आचार्य यांच्या मार्गदशनाखाली संपूर्ण ईशान्य भारत व आसाममध्ये जाऊन विद्यार्थी संघटनेचे काम करू लागले. माझ्या विवाहाससुद्धा आम्हाला आर्शीवाद देण्यासाठी ते आवर्जून आले होते.

नंतर ३५ वर्षांनी मी माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका त्यांना देण्यास मुंबईत यशवंत भवनमध्ये गेलो. तेव्हा ते म्हणाले, “अरे, मी तुझ्या लग्नाला आलो होतो.” आम्हा सर्व पूर्णवेळ कार्यकर्त्यांपक्षा ते १०-१२ वर्षे वयाने मोठे होते. पण, ते आमच्यासारखे सतरंजीवरच झोपायचे. मात्र, पहाटे उठून ते सर्व खोली झाडून आवरुन प्रवासाला निघायचे. रात्री उशिरा यायचे ते नेहमी ताजेतवाने दिसायचे. पुढे कित्येक वर्षाने रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह असताना पुणे येथील एका विवाह समारंभात त्यांचे दर्शन झाले. मी वाकून त्यांना चरणस्पर्श केला. तेव्हा म्हणाले, “अरे आता तुम्हीसुद्धा मोठे झालेे आहात.”

अनेक पदव्या घेऊन विद्याविभूषित असणारे मदनदासजी साधी राहणी, मृदू भाषा, तीव्र स्मरणशक्ती, प्रखर देशभक्ती, प्रभावी कार्यक्षमतेमुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात अमर राहतील.

शेखर धुरी
९७६४०१२३३३