मुंबई : 'दादर अभिमान गीता'च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून समाज माध्यमावरुन लोकप्रियता मिळवणारी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वानी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे. आयुष्यात आपण नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार अधिक करतो त्यामुळे साहजिकच सकारात्मक दृष्टिकोन काहीसा डावलला जातो. ह्याच धर्तीवर एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो अशी या गाण्याची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर यांनी सांगितले. प्रणिल आर्ट्स या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर यांनी एक हाती बजावली आहे.