मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज (४ ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, यावेळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आमचं सरकार २४ तास काम करणार आहे. फेसबूक LIVE किंवा वर्क फ्रॉम होम करणार नाहीय. आपल्या पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. असा टोला शिंदेंनी यावेळी ठाकरेंना लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, "आधीचं शासन आपल्या घरी होतं, आताचं शासन आपल्या दारी आहे. विरोधकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. विरोधकांमध्ये आत्मविश्वास डगमगलेला दिसतो. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी शेवटी निवड झाली. निवड आधी झाली असती तर आणखी धार आली असती. विरोधकांनी चहापानावर बहिष्काराची परंपरा पाळली आहे. अधिवेशनात सभागृह एकदाही तहकूब झालेलं नाही."
"गेल्या २ वर्षात बऱ्याच विचारांचा आर्थिक गुंतवणुकीचा दर्जा घसरला, आणि टोमण्यांचा दर्जा आला. आम्ही विरोधकांना दोष न देता ठोस काम करत राहणार. २ महिन्यात तीस हजार शिक्षकांची भरती केली आहे. उदय सामंतांनी श्वेतपत्रिका काढण्याचं धाडस केलं. गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. वडेट्टीवारांना हिवाळी अधिवेशनापर्यंत वेळ आहे. कोरोना काळात काही जण मरत होते, तर काही जण पैसे कमवत होते. कोरोना काळातल्या घोटाळ्याची चौकशी आम्ही नाही ईडी करत आहे. कोरोनात मृत्यु झालेल्या मृतदेहांच्या पिशव्यांवरील पैसे खाल्ले."
"ग्रीन एनर्जीसाठी १६ हजार करार केले. शेतीसाठी सौरऊर्जा तयार करणार आहे. साडेबारा कोटी जनतेला ५ कोटींचा विमा मिळणार. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गरिब, गरजूंना मोफत उपचार मिळणार. जनमताशी गद्दारी कोणी केली? महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हे पाहायला हवं. संयम बाळगतो, बोलता येत नाही असं समजू नका. ५० खोके आम्हाला बोलता, खरे खोकेबाज, खरे धोकेबाज कोण आहे?" असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.