हॉटेल व्यवसाय, धावणे आणि सायकलिंग असा तिहेरी संगम साधत त्यांनी नैराश्यावर मात करण्यासह आजारांपासून सुटका मिळवली. जाणून घेऊया नाशिकच्या दिगंबर लांडे यांच्याविषयी...
नगर जिल्ह्यातील शिराळा गावी जन्मलेल्या दिगंबर उद्धवराव लांडे यांचे बालपण तसे गेले. बिटको हायस्कूलमधूून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांचा पावभाजी विकण्याचा स्टॉल नाशिकमध्ये बर्यापैकी प्रसिद्ध होता. त्यावेळी दिगंबरदेखील वडिलांना मदत करत असे. पुढे इयत्ता आठवीत असताना उद्धवराव यांनी ‘मामाज पावभाजी’ नावाने कॉलेजरोड या ठिकाणी प्रशस्त हॉटेल सुरू केले. नाशिकमध्ये पावभाजी सुरू करण्याचा मान हा दिगंबर यांच्या वडिलांनाच जातो. हॉटेलकामात दिगंबर मदत करत असताना पुढे शाळेत जाणेही सुटले. मनुष्यबळाची आवश्यकता आणि कर्ज यामुळे दिगंबर यांची हॉटेलकामात मदत होत होती. यादरम्यान, कधी शाळा सुटली, हे त्यांनाही समजले नाही. कामाची जबाबदारी वाढत गेली आणि कालांतराने दिगंबर स्वतः हॉटेलमध्ये लक्ष घालू लागले. यावेळी त्यांना त्यांचे बंधू गणेश यांचीही मदत होत असे.
१९९४-९५च्या सुमारास हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत दिगंबर अडकले, तेव्हा लोकांनी त्यांना अक्षरशः आगीतून बाहेर ओढून काढले आणि दिगंबर यांना पुनर्जन्म मिळाला. व्यवसायातून वडील निवृत्त झाले आणि त्यानंतर दिगंबर हॉटेल व्यवसायात स्थिरस्थावर झाले. जवळच कॉलेज असल्याने हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण मुलांची ये-जा असे. तेव्हा शाळा सोडल्याचं दुःख त्यांना तीव्रतेने जाणवू लागलं. ‘तू शाळा सोडली. परंतु, तरीही वडिलांचा व्यवसाय मात्र अनेकपटीने वाढवला,’ ही कौतुकाची बाब असल्याचे सांगत नातेवाईकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मिळून नवीन घरही घेतले.
लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच म्हणजेच २००८ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यावेळी दिगंबर यांना नैराश्याने घेरले. स्वत्व हरवल्याची भावना त्यांना जाणवू लागली. पुढे संपूर्ण अंधार होता. काही काळानंतर या दुःखातून सावरत त्यांनी पुनर्विवाह केला. परंतु, यानंतर त्यांना अस्थमा, पोटदुखी यांसारख्या असंख्य आजारांनी ग्रासले. ना आनंद साजरा करता येत होता, ना दुःख! एकही मित्र नसल्याने त्यांचा एकटेपणा अधिक वाढला. पुढे ‘नाशिक सायकलिस्ट संस्थे’च्या एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. पुढे त्यांनी त्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शारीरिक त्रास झाला. परंतु, काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने त्यांनी दररोज सायकलिंग करण्यास सुरूवात केली. ‘जो जिता वही सिकंदर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर न शिकल्याची त्यांना खंत वाटली. त्यातील सायकल स्पर्धेचा प्रसंग पाहिल्यानंतर त्यांनी सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निश्चय केला.
‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमामुळेही दिगंबर प्रेरित झाले. नाशिक ते शेगाव सायकल रॅलीत त्यांनी सहभाग घेतला. यादरम्यान, त्यांना अनेक मित्र मिळाले. यानिमित्ताने ते प्रथमच नाशिक जिल्ह्याबाहेर मित्रांसमवेत गेले होते. या रॅलीसाठी जसपाल सिंग वर्दी यांनी स्वतःची सायकल दिगंबर यांना दिली होती. यानंतर त्यांनी ‘ट्रेक ८.३’ सायकल विकत घेतली. दिगंबर यांचा आत्मविश्वास वाढला होता. २०० किमीच्या नाशिक ते मालेगाव, नाशिक ते वाशिंद, नाशिक ते सापुतारा, नाशिक ते मालेगाव अशा चार ‘बीआरएम’ सायकल स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या. ३०० किमीच्या नाशिक-धुळे-नाशिक, नाशिक-वाशिंद-नाशिक आणि नाशिक-धुळे-नाशिक अशा तीन ‘बीआरएम’ स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या. ४०० किमीची नाशिक-शिरपूर-नाशिक ही ‘बीआरएम’ स्पर्धाही त्यांनी पूर्ण केली. ६०० किमीची ’बीआरएम’ स्पर्धेत मात्र त्यांना अपयश आले. नाशिक, शिर्डी, पंढरपूर आणि वणीपर्यंतच्या सायकल रॅलीतही त्यांनी सहभाग घेतला.
घर-संसाराची जबाबदारी, वडिलांचे आजारपण यामुळे त्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेणे थांबवले, परंतु, सराव मात्र कायम होता. सायकलिंगमुळे बर्यापैकी तब्येतीत सुधारणा झाली. व्यायाम केला नाही, तर पुढे अनेक व्याधी त्रासदायक ठरू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सायकलिंग सोबत दिगंबर यांनी धावण्यास सुरुवात केली. सुला वाईनपर्यंतची मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली. आतापर्यंत त्यांनी २० ते २५ हाफ मॅरेथॉन आणि ४२ किमीच्या चार फुल मॅरेथॉनही यशस्वीरित्या पूर्ण केल्या. लोणावळा अल्ट्रा, जैसलमेर येथील ५० किमीची मॅरेथॉनदेखील त्यांनी पूर्ण केली. मुंबईत १२ तासांत सात भागांत ७० किमीची ‘टाटा रन’ स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. दिगंबर यांना ट्रेकिंगचीही आवड असून, नाशिकच्या अनेक गड-किल्ल्यांना त्यांनी भेट दिली आहे. दिगंबर यांचा आजारपण ते तंदुरुस्तपणापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. जीवनात गोडी आली, मित्र मिळाले. तब्येतीत सुधारणा झाली. तंदुरुस्ती, सायकलिंग आणि धावणे यातील आनंद अवर्णनीय असतो. संकटावर मात करण्याची शक्ती आणि सहनशीलतादेखील वाढत असल्याचे दिगंबर सांगतात.
धावणे म्हणजे तपश्चर्या आणि ध्यानक्रियाच आहे. अगदी कमी पैशांत आणि कमी साधनांद्वारे करता येणारा व्यायाम म्हणजे धावणे. वडिलांच्या कष्टाला न्याय देता आले, याचे समाधान असल्याचेही ते सांगतात. पत्नी सरलासह चेतन अग्निहोत्री, उमेश बूब, हेमंत आपसुंदे यांचे मोलाचे सहकार्य दिगंबर यांना लाभते. हॉटेल व्यावसाय, धावणे, सायकलिंग असा तिहेरी संगम साधत आजारांना दूर पळवणार्या दिगंबर लांडे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...