एक ऐरावत, २६ तुतार्‍या (पूर्वार्ध)

30 Aug 2023 21:26:38
article on Why did Narendra Modi name Chandrayaan 3's point Shivashakti?

अपेक्षेप्रमाणे ‘शिवशक्ती’ नामकरणावर २६ तुतार्‍या वाजणार, हे नक्की होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील त्याची पूर्ण कल्पना असणार. परंतु, यावेळी त्यांनी २६ तुतार्‍या वाजाव्यात. म्हणून हे नामकरण केलेले नाही. ते उत्स्फूर्तपणे बोलले. जे अंतर्मनात असतं, ते उत्स्फूर्तपणे येतं. ‘शिवशक्ती’ म्हणजे ‘विश्व कल्याण करणारी शक्ती.’ आपली वैज्ञानिक प्रगती ही विश्वकल्याणासाठीच आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. हे मोदी यांनी पुन्हा स्पष्ट केले.

‘चांद्रयान-३’मधून ‘विक्रम’ लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले, तो क्षण डोळ्यात प्राण आणून कोट्यवधी भारतीयांनी पाहिला. ‘विक्रम’ लॅण्डर चंद्राच्या भूमीवर उतरताच कोटी-कोटी मुखातून ‘भारतमाता की जय’ हा ध्वनी निघाला. ‘इंडिया की जय,’ असे कोणी म्हटलं नाही. भारतमाता तिच्या पूर्वीच्या वैभवाने विश्वगुरू पदावर आरुढ होईल, अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली. एक हजार वर्षांच्या मोह निद्रेतून भारतमाता आता जागृत होत चाललेली आहे. बंगळुरूमधील वैज्ञानिकांनी भारतमातेच्या वैज्ञानिक शक्तीचे दर्शन स्वतःही घेतले, भारतमातेच्या सर्व मुला-मुलींना दिले आणि जगालाही घडविले.
या ऐतिहासिक क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग येथे होते. बंगळुरूला आल्यानंतर त्यांनी आपली मनःस्थिती सांगितली-‘मी जरी दक्षिण आफ्रिकेत असलो, तरी मनाने मी तुमच्याबरोबरच (इस्रोच्या वैज्ञानिकांसोबतच) होतो.’ त्याला ‘सायुज्यता’ म्हणतात. शरीर असते अन्य कुठेही; पण मन आणि चेतना आपल्या आवडीच्या कामातच गुंतलेली राहते. पंतप्रधानांची मानसिकता हीदेखील विज्ञानासारखीच एक मोठी शक्ती आहे. तिने प्रचंड बळ आणि ऊर्जा मिळते. कशी मिळते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूला वैज्ञानिकांच्या भेटीस गेले. तेथे त्यांनी घोषणा केली की, ‘चांद्रयान -३’चे ‘विक्रम’ लॅण्डर ज्या स्थानी उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ती’ असे म्हणण्यात येईल आणि ‘चांद्रयान- २’चे लॅण्डर ज्या ठिकाणी उतरले, त्या जागेला ‘तिरंगा पॉईंट’ असे नाव ठेवण्यात आले. यावर ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ म्हणतात, “ ‘चांद्रयान-३‘ चे लॅण्डर ज्या ठिकाणी उतरले, त्या बिंदूचे नाव ‘शिवशक्ती’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले, याचा ‘इस्रो’मधील सर्व शास्त्रज्ञांना खूप खूप आनंद झाला. अंतराळात संशोधन करणार्‍या समूहात असा एखादा नवीन शोध लागला की, त्याला आम्ही काही तरी नाव देतो. परंतु, पंतप्रधानांनी उत्स्फूर्तपणे नामोच्चारण केले आणि हे नावदेखील असे की, जे पूर्णपणे भारतीय आहे आणि भारताचा प्रतिध्वनीदेखील त्यातून उमटतो. हे खरोखरच अद्भुत आहे. पंतप्रधानच हे करू शकतात.”
 
सोमनाथ हे भाजपचे सदस्य नाहीत. संघ शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत की नाहीत, हे मला माहीत नाही. ते शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आहेत. तेवढेच ईश्वरभक्त आहेत. ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण होण्यापूर्वी ‘निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा’ अशी पूजा त्यांनी केली. मोहीम यशस्वी झाल्यानंतरदेखील ते मंदिरात गेले. परमेश्वरापुढे नतमस्तक झाले. विज्ञान ही शक्ती आहे आणि विज्ञानाच्या पलीकडची शक्ती ही ईश्वरीय शक्ती असते. विज्ञानशक्ती आणि ईश्वरीय शक्ती यांचा सुरेल संगम म्हणजे ‘हिंदू मन.’अपेक्षेप्रमाणे ‘शिवशक्ती’ नामकरणावर २६ तुतार्‍या वाजणार, हे नक्की होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील त्याची पूर्ण कल्पना असणार. परंतु, यावेळी त्यांनी २६ तुतार्‍या वाजाव्यात. म्हणून हे नामकरण केलेले नाही. ते उत्स्फूर्तपणे बोलले. जे अंतर्मनात असतं, ते उत्स्फूर्तपणे येतं. ‘शिवशक्ती’ म्हणजे ‘विश्व कल्याण करणारी शक्ती.’ आपली वैज्ञानिक प्रगती ही विश्वकल्याणासाठीच आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. हे मोदी यांनी पुन्हा स्पष्ट केले.
 
ते ‘इंडियावाल्यांना’ झोंबले आणि त्यांना इतकी धास लागली की, मोदी यांनी ‘इस्रो’चे सांप्रदायिकीकरण सुरू केले आहे, असे आरोप करणे सुरू झाले. नामकरण करायचे तर, ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानांशी विचारविनिमय करणे गरजेचे होते. एखाद्या शास्त्रज्ञाचे नाव देता आले असते. तुतार्‍या अशा वाजत राहिल्या आहेत. मोदी जेव्हा नामकरण घोषित करीत होते, तेव्हा ‘इस्रोे’चे सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आनंदाने टाळ्या वाजवित होते, त्यात महिलांची संख्या भरपूर होती आणि काय आश्चर्य बहुतेक महिला भारतीय परंपरेनुसार साड्या नेसून होत्या. विवाहितांच्या गळ्यात मंगळसूत्र होती, अनेकांच्या केसांवर सुगंधी फुलांचे गजरे होते. कपाळावर बिंदी होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने २००४ साली डोक्यावर टोपी, मिशा वाढलेला, धोतर घातलेला, गाय घेऊन आलेला एक माणूस चंद्रावर गेलेल्या चार जणांच्या क्लबचा दरवाजा ठोठावतो, असे कार्टून काढलं होतं. भारतीय पोशाखाचे सगळे स्त्री-पुरुष त्या खेडूताचे प्रतिनिधित्व करीत होते. रामायणात सुर्गीवपुत्र अंगदाची कथा आहे. रावणाच्या दरबारात तो पाय रोवून उभा राहिला आणि त्याने आव्हान केले, की ज्या कोणात हिंमत असेल, त्याने माझा पाय हलवून दाखवावा, असे अंगद पाऊल या सर्वांनी उचलले आणि बंद दरवाजावर लाथ मारली. जगाला शक्तीची भाषा समजते.
 
‘इंडिया’मधील काँग्रेसच्या तुतार्‍या वाजू लागल्या की, ‘इस्रोे’चे यश हे पंडित नेहरूंचे यश आहे. या बिनडोक तुतार्‍यावाल्यांना हे सांगायला पाहिजे की, दि. १५ ऑगस्ट १९६९ रोजी ‘इस्रो’ची स्थापना झाली. पंडित नेहरूंचा मृत्यू १९६४ साली झाला. पंडित नेहरूंच्या काळात ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ ही १९६२ साली स्थापन झाली होती. तिची सर्व कल्पना डॉ. विक्रम साराभाई यांची होती. दि. १५ ऑगस्ट १९६९ रोजी ‘इस्रो’ची स्थापना झाल्यानंतर १९६२ची कमिटी रद्द झाली, तरीही काँग्रेसी तुतार्‍या नेहरूंना याचे श्रेय दिले पाहिजे, असे आवाज काढत असतील, तर आपण ते बंद करू शकत नाहीत; पण त्यांच्या अज्ञानाचा आनंद अवश्य घेऊ शकतो.
 
चंद्रावर माणूस पाठवण्याच्या संकल्पनेचे श्रेय अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनडी यांना द्यावे लागते. १९६१ साली त्यांनी अमेरिकेच्या ‘नासा’पुढे १९७० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचे लक्ष्य ठेवले. अमेरिकन काँग्रेसकडून त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून घेतला. १९५७ साली रशियाने अंतराळात पहिले यान पाठविले. नंतर एक वर्षाच्या आत दुसरे यान पाठविले आणि त्यात युरी गागारिन यांनी अंतराळातून पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्या ते जगातील पहिले अंतराळवीर झाले. अमेरिकेसारखा देश शेजार्‍याच्या घरात मुलं झालं, म्हणून लोकांना पेढे वाटत बसत नाही. अंतराळ यानाचे अर्थ काय होतात? जमीन, आकाश आणि जल या तीन ठिकाणी युद्ध करावे लागतात. अंतराळ हे आता युद्धाचे चौथे क्षेत्र झाले आहे. जमीन, जल आणि आकाशात अमेरिका वरचढ होती. अवकाशात रशिया वरचढ झाला, ते अमेरिकेला परवडणारे नव्हते. रशियाच्या १०० पाऊले पुढे जाणारी प्रगती दहा वर्षांत करायची होती. दि. २१ जुलै १९६९ला अमेरिकन यान चंद्रावर उतरले आणि अमेरिकेचा नागरिक नील आर्मस्ट्राँग चंद्रावर फेरफटका मारून आला. अशक्य ते शक्य करून त्याने दाखविले.
 
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ‘इस्रो’चे वैज्ञानिक त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले की, “दळणवळण, कृषी, हवामानातील बदल याचा अचूक अंदाज घेणारी उपग्रह आपण विकसित केली आहेत, अवकाशात सोडली आहेत. ते यशस्वीपणे काम करतात. आता आपल्याला चंद्र आणि मंगळाची मोहीम सुरू केली पाहिजे.” अटलजींनी त्याला तत्काळ मान्यता देऊन चंद्रमोहिमेचे नामकरण ‘चांद्रयान’ असे केले. २००४ची ही घटना आहे.नेहरू आणि केनडी या दोघांच्या नावाचा उल्लेख या लेखात आलेला आहे. विज्ञान ही एक महान शक्ती आहे. याचे १०० टक्के आकलन केनडी यांना होते. नेहरूंना किती होते? यावर भाष्य करणे कठीण आहे. १९६२ साली मुंग्या वारुळातून बाहेर पडाव्या, तशा चिनी सेना लडाखपासून आसामपर्यंत भारतीय सीमेत घुसल्या. त्यांना रोखण्याचे आधुनिक तंत्रज्ञान पंडित नेहरूंनी विकसित केलेले नव्हते. जवानांच्या हातात ३०३ रायफल होत्या. या बंदुकीतून प्रत्येक गोळी झाडण्यासाठी दट्टा खेचावा लागतो. चीनच्या स्वयंचलित बंदुकांपुढे यांचा निभाव लागला नाही. भारतीय सैन्य इंच-इंच भूमीसाठी लढले, हुतात्मा झाले. यावेळी पंडित नेहरू यांनी केनडी यांना एक पत्र लिहिलेले. मूळ इंग्रजी पत्रावर टॉप सिक्रेट असे लिहिलेले आहे, हे पत्र आता सार्वजनिक करण्यात आले आहे. मूळ इंग्रजी पत्र छोटे आहे; पण ते फार महत्त्वाचे असल्याने जसे आहे, तसेच उद्याच्या भागात पाहू. (क्रमश:)
 
 
Powered By Sangraha 9.0