पावसाळ्यात वाहनांची विशेषत्वाने चारचाकींची जरा अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निश्चितच विमा संरक्षण हा एक उत्तम पर्याय. त्यानिमित्ताने आजच्या लेखात वाहनांसाठीच्या विमासंरक्षणाची सविस्तर माहिती करुन घेऊया...
चारचाकींचे पावसाळ्यात नुकसान होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. पाण्याचा लोंढा जर जोरदार असेल, तर त्यात चारचाकी वाहून गेल्याचे प्रसंगही घडतात. तुंबलेल्या पाण्यात उभ्या राहिल्यामुळे ही चारचाकीचे नुकसान होते. मग यासाठी वाहनधारकावर मोठा आर्थिक भार पडतो. तो कमी व्हावा, सुसह्य व्हावा म्हणून चारचाकींचा विमा उतरविला जातो. वाहनांच्या विम्याचे दोन प्रकार आहेत. एक ‘थर्ड पार्टी’ व दुसरा ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह’. ‘थर्ड पार्टी’ विमा उतरविणे हे कायद्याने बंधनकारक आहे. ‘थर्ड पार्टी’ विमा उतरवित नसल्यास वाहकावर कारवाई होऊ शकते. प्रवासात चारचाकीत बसलेल्या व्यक्तीस अपघात झाला, तर ‘थर्ड पार्टी’ विम्यातून त्या व्यक्तीला व अपघातात ती व्यक्ती मृत झाली असेल, तर तिच्या कायदेशीर वारसाला नुकसान भरपाई विम्याच्या दावा स्वरुपात मिळू शकते.
‘कॉम्प्रिहेन्सीव्ह’ विम्यात ‘थर्ड पार्टी’ संरक्षण समाविष्ट असते. वाहनातील प्रवासी समाविष्ट असतात. तसेच, वाहनाच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई मिळू शकते. पावसात चारचाकी अडकून झालेले बहुतांश नुकसान विम्यातून भरुन मिळत नाही, त्यासाठी पावसाळ्यामध्ये आपल्या मोटारीला अतिरिक्त सुरक्षा कवच द्यावे, म्हणजे बर्याच प्रमाणात भरपाई मिळू शकते.चारचाकी वाहनांसाठी विशेषत: पावसाळ्यात एक सर्वसमावेशक विमा उतरविणे आणि यात अतिरिक्त विमा सुरक्षा कवच म्हणजे विमा पॉलिसीबरोबर काही ‘रायडर’ घेणे गरजेचे असते.पावसाळ्यात वाहनाच्या इंजिनात पाणी जाऊन ते नादुरूस्त होऊ शकते. पाणी आत शिरल्याने वाहनातील बसायच्या सीट खराब होऊ शकतात. डॅशबोर्ड, इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब होऊ शकतात. विंडशिल्डला तडा जाऊ शकतो. पावसाने अंधारलेले असेल, तर दृश्यमानता कमी असल्याने इतर वाहने, झाडे किंवा रस्ता दुभाजकांवर धडकून बाह्य भागाचे नुकसान होऊ शकते.
इंजिन हा वाहनाचा सर्वांत महत्त्वाचा आणि किमती भाग असतो. पावसात वाहनात पाणी शिरल्यावर किंवा वाहन दीर्घकाळ पाण्यात अडकल्यावर अनेकदा ती सुरू होत नाही. हे पाहता वाहनचालक पुन्हा पुन्हा इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न करतो. यातून इंजिनात पाणी जाते आणि इंजिनाचे मोठे नुकसान होते. हा ’रायडर‘ घेतल्यावर इंजिन पाण्यामुळे नादुरूस्त झाले, तर त्याची बर्याच प्रमाणात नुकसान भरपाई मिळू शकते. एक ‘२४ बाय ७ रोड साईड असिसटन्स’ असा एक ‘रायडर’ आहे. या ‘रायडर’मुळे चारचाकी पाण्यात किंवा नादुरूस्त होऊन रस्त्यात उभे असल्यास त्या वाहनाला लवकरात लवकर ‘टोईंग’ करून तिथून उचलून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यात येते. यामुळे वाहनाचे नुकसान कमी होते. पाण्यात चारचाकी अडकल्यास किंवा वाहनात पाणी शिरल्यास, वाहनाचे फार मोठ्या प्रमाणावर सर्व्हिसिंग तसेच दुरूस्तीही करावी लागते, यासाठीचा ‘रायडर’ घेतल्यास इंजिन ऑईल, कुलंट ब्रेक ऑईल या गोष्टी वाहनात टाकाव्या लागल्यास, या खर्चाची भरपाई मिळू शकते.
पावसाळ्यामध्ये नादुरूस्त झालेली गाडी ठीक करण्यासाठी भरपूर खर्च येतो. बरेचदा गाडीतील अनेक भाग बदलावे लागतात. व्यापक प्रमाणावर सर्व्हिंसिंग करावे लागते, ज्याचा फार खर्च येतो. जर ‘झिरो डेप्रिसिएशन रायडर’ घेतले असेल, तर हे भाग बदलण्याचा संपूर्ण खर्च विमा कंपनीकडून मिळतो.आजच्या काळात बॅटरीवर आधारित वाहनेही काही प्रमाणात रस्त्यावर धावत असतात. यांचा देखभाल आणि इंधनाचा खर्च परंपरागत वाहनांच्या तुलनेत खूपच कमी असतो. इलेक्ट्रिक मोटर तसेच अन्य इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे बटरी. या वाहनातील बॅटरीची किंमत एकंदर वाहनाच्या किमतींच्या सुमारे ५० टक्क्यांपर्यंत असते. हे पाहता, बॅटरी खराब झाली, तर मोठा फटका बसतो. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांचा विमा उतरविताना बॅटरीकरिता ‘रायडर’ घेणे अत्यावश्यक आहे. पाणी हे बॅटरी नादुरूस्त करू शकते. इधनांवर चालणार्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त असतात. तसेच, यांचा विम्याचा प्रीमियमही जास्त असतो.
वाहनांसाठी ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह’ पॉलिसी घ्यावीच, पण पावसाळ्यात वाहनाच्या संरक्षणासाठी जे उपलब्ध ‘रायडर’ ही घ्यावेत. वाहन विमा उतरविण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील चार कंपन्या आहेत. तसेच, काही खासगी कंपन्याहीं आहेत. त्यामुळे ज्या कंपनीचे दावे संमत करण्याचे प्रमाण चांगले आहे व ‘प्रिमियम’ ही जास्त आकारला जातो, अशा विमा कंपनीकडे विमा उतरवावा. साधारणपणे सर्वसाधारण विमा हा एक वर्षांसाठी असतो व दरवर्षी यांचे नूतनीकरण करावे लागते. पण, काही विमा कंपन्या वाहन विमा एकाहून अधिक वर्षांसाठी ही देतात. काही विमा कंपन्यांचा असाही प्रस्ताव आहे की, एखादा चारचाकीचा मालक/चालक समजा काही कालावधीसाठी परदेशी गेला किंवा अन्य काही कारणांनी तो ठरावीक कालावधीत वाहन सुरूच करणार नसेल व एकाच जागी पार्क करून ठेवणार असेल, तर अशा कालावधीसाठी विमा सक्रिय आहे, असे न समजता या सर्व कालावधीसाठी विम्याच्या नूतनीकरणाची तारीख वाढवून दिली जाईल. तसेच, वाहन विमा घेतल्यावर विमा सक्रिय असातानाच्या कालावधीत एखाद्याने वाहन विकले, तर उरलेल्या कालावधीसाठी भरलेली ‘प्रर्पोशनेट’ विम्याच्या प्रीमियमची रक्कम पॉलिसीधारकाला परत केली जाते. वाहन जपून चालविले तरीही रस्त्यावर कधीही संकट येऊ शकते. त्यामुळे वाहन विमा हवाच व त्याचे नूतनीकरणही वेळच्या वेळी करावे.