विद्यार्थ्यांनी आता फक्त १४० रुपयांत पाहा सुभेदार!
29 Aug 2023 17:39:47
मुंबई : २५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला व दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'सुभेदार' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलची पाटी मिरवत आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'शेर शिवराज' आणि 'पावनखिंड' या चार चित्रपटांच्या अद्भुत यशानंतर श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला हा चित्रपट सिंहगडाची शौर्यगाथा मांडतो.
मोठ्यांप्रमाणेच शाळकरी इतिहासप्रेमींनीसुद्धा हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा यासाठी पीव्हीआर आणि आयनॉक्स यांनी खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट फक्त १४० तिकीटदरात पाहायला मिळणार आहे.
चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाच्या काही नियमांचे पालन शाळांनी करायचे आहे. त्यानुसार प्रत्येक शोसाठी किमान १०० तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. दर आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार या कालावधीत सकाळी ११च्या पुर्वी विद्यार्थ्यांना चित्रपट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार पीव्हीआर आणि आयनॉक्सची स्क्रीन देण्यात येणार असून ४८ तासांपूर्वी तिकीटांची खरेदी करणे शाळांना बंधनकारक असणार आहे.