गोंदिया - विजेचा धक्का देऊन तीन बिबट्यांची शिकार

29 Aug 2023 17:01:50
leopard gondia
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये विजेचा धक्का देऊन तीन बिबट्याची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवार दि. २८ आॅगस्ट रोजी समोर आलेल्या प्रकारणामधील आरोपींना मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. (gondia leopard) 

देवरी तालुक्यातील बोरगाव वनक्षेत्रामध्ये सोमवारी सायंकाळी तीन बिबट्यांचे मृतदेह आढळून आले होते. (gondia leopard) यासंदर्भातील माहिती मिळाल्यावर वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची तपासणी केली. यावेळी त्यांना घटनास्थळी तीन बिबट्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. चाचपणीनंतर हे मृतदेह प्रौढ मादी आणि तिच्या दोन नर पिल्लांचे असल्याचे समोर आहे. यावेळी विद्युत तारांचा वापर करुन बिबट्यांना मारल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही घटना महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या बोरगाव वनक्षेत्रात घडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. (gondia leopard)


या प्रकरणाच्या तपासादरम्यान मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी सकाळी चार आरोपींना अटक करण्यात आली. दशरथ ब. धांनगाये (रा. मेहताखेडा), अरुण राऊत (रा. भोयरटोला), देवराज ग. मानकर (रा. बेलघाट), भाऊलाल न. राऊत (रा. भोयरटोला) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रानडुक्करांच्या शिकारीसाठी जंगलात जवळपास १९० ते २०० विद्युत तारा लावल्या होत्या. मात्र, त्यामध्ये रानडुक्करांऐवजी मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ल अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि.२५ आॅगस्ट रोजी घडल्याचे आरोपींनी सांगितले.

 
Powered By Sangraha 9.0