देशातील ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

28 Aug 2023 18:58:15

Narendra Modi


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ५१,००० हून अधिक नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली आहेत.
 
देशात ४५ ठिकाणी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्रीय गृह मंत्रालय केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) तसेच दिल्ली पोलिस कर्मचारी भरती करत आहेत. संपूर्ण देशभरातून निवडलेल्या नव्या नोकरांची गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विविध पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि नॉन-जनरल ड्युटी कॅडर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
 
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संरक्षण किंवा सुरक्षा आणि पोलिस दलातील निवडीसोबतच येणाऱ्या जबाबदारीवर भर देताना सांगितले की, सुरक्षा दलांच्या गरजांबाबत सरकार खूप गंभीर आहे. त्यांनी निमलष्करी दलांच्या भरतीतील मोठ्या बदलांचा उल्लेख केला. अर्ज करण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंत भरती प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे.
 
पूर्वी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये परीक्षा घेतल्या जात होत्या, आता त्यांच्या जागी १३ स्थानिक भाषांमध्येही परीक्षा घेतल्या जात आहेत. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील शेकडो आदिवासी तरुणांना नियम शिथिल करून भरती केल्याचा उल्लेख त्यांनी केला. सीमावर्ती भागातील आणि दहशतवादग्रस्त भागातील तरुणांसाठी असलेल्या विशेष कोट्याबाबतही त्यांनी माहिती दिली.
 
सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या स्थितीचा उल्लेख करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दशकात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल याचा पुनरुच्चार केला. मोदी पूर्ण जबाबदारीने अशी हमी देतात, असेही ते म्हणाले. वाढत्या अर्थव्यवस्थेचा सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामांवर पंतप्रधान म्हणाले की, अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास करणे महत्त्वाचे आहे.
 
आज भारताचा फार्मा उद्योग सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा आहे आणि २०३० पर्यंत सुमारे १० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या वाढीचा अर्थ असा आहे की येत्या काही वर्षांत फार्मा उद्योगाला अधिक तरुणांची गरज भासेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0