‘सुभेदार’चा क्लायमॅक्स वायरल, दिग्पाल लांजेकरांनी व्हिडिओतून केली ‘ही’ विनंती

26 Aug 2023 13:42:17
 
digpal and subhedar
 
 
मुंबई : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवाष्टकातील पाचवे पुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट काल २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. समाज माध्यमावर एकीकडे या चित्रपटाचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमची चिंता वाढवणारी गोष्ट होत आहे. सुभेदार चित्रपटाचा क्लायमॅक्स फोनवर शुट करुन समाज माध्यमावर वायरल केला जात असल्याने दिग्पाल लांजेकर यांनी प्रेक्षकांना इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ पोस्ट करत क्लायमॅक्स वायरल न करण्याची विनंती केली आहे.
 
शिवराय आणि तान्हाजींच्या मैत्रीचा चित्रपट 'सुभेदार'  
 
काय म्हणाले दिग्पाल लांजेकर?
 
“’सुभेदार’ हे पाचवं चित्रपुष्प तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं आहे, याबद्दल आनंद आहे. आमच्या प्रयत्नांना यश मिळतंय हे पाहून आनंद होत आहे. परंतु, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील क्लायमेक्सचा भाग काही जण शूट करुन तो इन्स्टावर अपलोड करत आहेत. तुमच्या भावना मी समजू शकतो. तुम्हाला हे सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे. पण, त्यामुळे इतरांचा रसभंग होतो. यामुळे ज्यांना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहायचा आहे, त्यात मग मजा राहत नाही. तुम्ही घेतलेला अनुभवही त्यांना घेता येणार नाही. कृपया क्लायमेक्स किंवा चित्रपटातील इतर भाग शूट करुन अपलोड करू नका, अशी मी विनंती करतो. तुम्ही मला साथ द्याल, अशी आशा बाळगतो. माझ्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. जय शिवराय,” अशी विनंती दिग्पाल लांजेकरांनी केली आहे.
 
 
 
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अजय पुरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली असून चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज आणि मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, मृण्मयी देशपांडे आणि दिग्पाल लांजेकर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0