भारतातील पहिला खेकड्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास साताऱ्यात

26 Aug 2023 18:08:26
crabs migration research



मुंबई (प्रतिनिधी):
पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे स्थलांतर होते हे आपण ऐकले आहेच. मात्र, साताऱ्यात भारतातील पहिलेच खेकड्यांच्या स्थलांतरावर अभ्यास करणारे संशोधन केले जात आहे. महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था वर्ल्ड वाइड फंड (WWF) या संस्थेच्या सहकार्यातुन हे संशोधन कार्य करत आहे.


या संशोधनात खेकड्यांच्या पाच प्रजातींचा अभ्यास केला जाणार आहे. विशीष्ट हंगामात पठारावर येऊन तर काही कालावधीनंतर पुन्हा सुप्त अवस्थेत जाणाऱ्या खेकड्यांविषयी हा अभ्यास केला जात आहे. 'भारतातील गोड्या पाण्यातील किंवा पश्चिम घाटाच्या पठारांवरील खेकड्यांच्या वर्तनशास्त्र व स्थलांतराचा अभ्यास' असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले असुन महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इंस्टीट्यूटचे संशोधक यावर काम करत आहे. या क्षेत्रात तीस वर्षांहुन अधिक कालावधीचा अनुभव असणारे सुनील भोईटे, गायत्री पवार या संशोधकांचा समावेश आहे. ठरावीक पठारांवर अभ्यास सुरू असला तरी त्याची विशीष्ट ठिकाणे संवर्धनाच्या दृष्टीकोनातुन संशोधकांनी सांगण्यास नापसंती दर्शविली.


crabs migration research



गेले सहा महिने यावर संशोधन सुरू असुन ते पुर्ण होण्यास साधारणतः वर्षभराचा कालावधी लागणार आहे. संशोधनाबरोबरच स्थानिक लोकांची जनजागृती ही करण्यात या प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे. लवकरच या प्रकल्पाच्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध होऊन त्यातुन बरिच अद्भुत आणि नाविन्यपुर्ण माहिती हाती लागणार आहे असा विश्वास संशोधक व्यक्त करतात.

“सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट क्षेत्रातील बहुतांश पठारे येथील पुष्प सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु वनस्पतींसह येथील इतर प्राणीजीवन देखील तितकेच महत्त्वाचे असून त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे प्राधान्यक्रमाने आवश्यक आहे. सदर संशोधन प्रकल्पामध्ये त्यावर भर देण्यात येईल.”

- सुनील भोईटे
मुख्य संशोधक,
महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा
“गोड्या पाण्यातील विशेषत: पश्चिम घाटात आढळणाऱ्या पठारांवरील खेकड्यांच्या वर्तन व स्थलांतराचा अभ्यास करणारा हा भारतातील प्रथम व एकमेव संशोधन प्रकल्प असावा. WWF च्या CCP अंतर्गत अनुदानित या संशोधन प्रकल्पामध्ये खेकड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जैवशृंखलेचा अभ्यास करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.”

- गायत्री पवार
सहा. संशोधक,
महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा
Powered By Sangraha 9.0