मुंबई : नुकतीच २३ ऑगस्ट रोजी भारताची चांद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या पार पडली आहे. याबद्दल देशभरात जल्लोश साजरा होत असतानाच मोहिमेत सहभागी इस्त्रोतील वैज्ञानिकांचेही जोरदार कौतुक होत आहे. याच मोहिमेत रायगडच्या सुपुत्राचाही सहभाग आहे.
चिन्मय संदीप म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो पेण तालुक्यातीन आंबिवली येथील रहिवासी आहे. चांद्रयान-३ मोहिमेमध्ये चिन्मयने दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुकही होत आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. शिवन यांनी चिन्मयच्या कामगिरीबद्दल त्याचा सन्मानही केला आहे.
चिन्मय हा पेण तालुक्यातील आंबिवली येथील रहिवासी आहे. लहानपणीच त्याने संशोधन क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने त्रिवेंद्रम येथे आयआयएसटी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याचा स्वप्नपुर्तीचा प्रवास सुरु झाला.
शिक्षण पुर्ण करुन त्याने २३ ऑगस्ट २०१९ मध्ये यु. आर. राव. सॅटेलाइट सेंटर, बेंगरुळू येथे त्याने काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे दोन वर्षे त्याने वर्षे थर्मो-व्हॅक्युम चेंबर फॅसिलिटीमध्ये काम केले. यावेळी त्याने उपग्रहस्तरीय थर्मो-व्हॅक्युम चाचण्या पार पाडण्यात योगदान दिले. पुढे तो कंट्रोल डायनॅमिक्स गृपमध्ये सहभागी झाला. याठिकाणी उपग्रहांसाठी अॅटिट्यूड आणि ऑर्बिट कंट्रोल सिस्टम डिझाइन करण्यासाठीची जबाबदारी त्याच्यावर आहे.
चांद्रयान-३ मोहिमेमध्येही त्याने मोलाचे योगदान दिले आहे. चांद्रयान-३ साठी रोव्हर टीमचा एक भाग म्हणून चिन्मयने काम केले आहे. तसेच ट्रॅकींग सेंटरमधून ग्राऊंड ऑपरेशनमध्येही त्याचा सहभाग आहे. यासोबतच मिशन लाईफ दरम्यान रोव्हरचे पथ नियोजन करण्याच्या टीममध्येही त्याचे योगदान राहीले आहे. चिन्मयच्या या योगदानाबद्दल संपुर्ण रायगडमधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.