दि. २३ ऑगस्ट रोजी भारताची ‘चांद्रयान-३’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली आणि जगभरातून कौतुकवर्षाव झाला. त्यानिमित्ताने या अंतराळ संशोधन मोहिमेचे फलित, आगामी दिशा आणि जागतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
दि. ७ सप्टेंबर २०१९... सगळ्या भारताचे लक्ष लागलेल्या एका मोहिमेने सगळ्या भारताला अनेक प्रश्न विसरून एखाद्या वैज्ञानिक कारणासाठी जागे ठेवले होते. आसू आणि हसू अशा स्थितीत, एका अपुर्या राहिलेल्या स्वप्नाची ती रात्र होती. भारताने पाठवलेले ‘चांद्रयान-२’चे लॅण्डर ‘विक्रम’ यांच्याशी संपर्क तुटला आणि मोहीम अयशस्वी झाली. मात्र, त्याचबरोबर आशेचा किरण हा होता की, याच मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग असलेला ऑर्बिटर चंद्राभोवती यशस्वीपणे फिरत होता; फक्त फिरतच नव्हता तर भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या क्रायोजनिक इंजिनच्या आश्चर्यकारक अशा परिणामांमुळे, तो अजून साडेसात वर्षं चंद्राच्या फेर्या मारणार होता. केवळ एक वर्ष ऑर्बिटर फिरू शकेल, असे गणित होते. मात्र, संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजनिक इंजिनने कमाल केली आणि ऑर्बिटरकडे अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. भारतीयांचे यशस्वी लॅण्डिंगचे स्वप्न अपुरे राहिले असले, तरी तंत्रज्ञानातील झेप नवीन स्वप्नाकडे घेऊन गेली. अवघ्या काहीच काळात घोषणा झाली ‘चांद्रयान-३’ची. अनेक टीका, प्रश्न आणि विविध पातळ्यांवरचा थेट आणि छुपा विरोध यापैकी कशाचीही पर्वा न करता, ‘इस्रो’च्या तंत्रज्ञांनी एकच ध्यास घेतला, तो म्हणजे चंद्रावर यशस्वी मोहिमेचा!
२३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४०ची वेळ, अवघा भारत सगळ्या गोष्टी विसरून टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या मिळेल, त्या साधनाच्या मदतीने डोळ्यात प्राण आणून कोणतीही मालिका अथवा मॅच न बघता ‘इस्रो’च्या स्क्रीनवर दिसत असलेल्या हिरव्या रेषेकडे डोळे लावून बसला होता. ‘विक्रम’ लॅण्डरचा वेग कमी होतोय, ‘विक्रम’ लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचतो आहे, तसतसे इकडे हृदयाचे ठोके वाढत होते. ‘इस्रो’च्या तंत्रज्ञांनी ’चांद्रयान-२’च्या अनुभवावरून सर्व शक्यतांचा अभ्यास करून ‘चांद्रयान-३’च्या लॅण्डरमध्ये अनेक सुधारणा केल्या होत्या. सगळी इंजिन बंद पडली तरी लॅण्डर सुरक्षित उतरेल, असा विश्वास ‘इस्रो’च्या अध्यक्षांनी दिला होता, तरी सगळ्यांच्या मनात काळजी नक्कीच होती. ‘इस्रो’च्या त्या कमांड सेंटरमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर आत्मविश्वास आणि काळजीचे एक अनोखे मिश्रण पाहायला मिळत होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती आणि निर्धारित वेळेला, अगदी ठरलेल्या क्षणी म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६.०४ मिनिटांनी ‘विक्रम’ लॅण्डर यशस्वीपणे चंद्रावर उतरले. चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरात उतरणारा पहिला देश. कोट्यवधी भारतीयांना केवळ आणि केवळ अभिमान वाटावा अशी ही घटना होती. ‘चांद्रयान-२’च्या अपयशानंतर अवघ्या चार वर्षांत सर्व टीकेला भारताने आणि ‘इस्रो’ने दिलेले हे सडेतोड उत्तर होते.
‘चांद्रयान’ मोहिमांनी आपल्याला काय दिले, तर आपल्यालाच नाही, तर सगळ्या जगाला एक आशा दिली. चंद्रावर विशेषतः चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांमध्ये, बर्फ स्वरुपात पाणी असावे असा अंदाज होता. ‘चांद्रयान- १’ मोहिमेतील 'Miniature Synthetic Aperture Radar (MiniASAR)' आणि 'Moon Mineralogical Mapper (M३)'या ‘नासा’ने पुरवलेल्या उपकरणांच्या मदतीने हा अंदाज खरा असल्याचे दर्शवले. मात्र, भारत आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी विकसित केलेल्या (SARA) या अंदाजाची पूर्णपणे पुष्टी केली. सौर वार्यांमधील प्रोटोन हे चंद्राच्या पृष्ठभागावरून कसे परावर्तीत होतात, याचा अभ्यास करून चांद्रपृष्ठावर पाणी किंवा हायड्रॉक्सिल कोठे आणि किती प्रमाणात पसरले असू शकते, याचा अंदाज बांधायला मदत केली. या तंत्रज्ञानाचा ‘चांद्रयान-१’ मधील यशस्वी वापर युरोपियन स्पेस एजन्सीच्या बुधावरील मोहिमेमध्ये या उपकरणाचा अंतर्भाव करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. ‘चांद्रयान-१’च्या शोधांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष परत एकदा चंद्राकडे वळले. अनेक देशांनी चंद्रावरील पाण्याचा अधिक अचूकतेने शोध घेण्यासाठी मोहीमा आखल्या.
‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरवरील आधुनिक रडार उपकरणांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे अचूक मोजमाप घेऊन नकाशे तयार करण्यात आणि चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील पाण्याच्या अंदाज बांधण्यात मोलाचा हातभार लावला आहे. यातूनच प्रेरणा घेत कोरियासारख्या देशांनीदेखील ‘चांद्रमोहिमा’ हाती घेतल्या आहेत. ‘चांद्रयान-१’च्या अतिशय कल्पक अशा योजनेमुळे या योजनेचा खर्च जगातील इतर कोणत्याही देशाच्या मोहिमेच्या तुलनेत अतिशय कमी आलेला आहे. जरी या पद्धतीत वेळ जास्त लागत असला, तरी खर्चाचा आकडा बघता दिलेला वेळ हा अतिशय योग्य वाटतो. ‘नासा’च्या एका मोहिमेला जेवढा खर्च होतो, तेवढ्यामध्ये ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-१’, २ आणि ३ या तीनही मोहिमा पूर्ण केल्या आहेत. दक्षिण कोरियानेदेखील ‘इस्रो’च्या पावलावर पाऊल टाकून, याच पद्धतीने त्यांची चांद्रमोहीम (KPLO) यशस्वी करून त्यांचे ऑर्बिटर पाठवले आहे.
‘चांद्रयान’ मोहिमांच्या माध्यमातूनच भारतीय बनावटीच्या आणि मालकीच्या (Indian Deep Space Network)आणि (Indian Space Science Data Center) यांची निर्मिती झाली, ज्याचा फायदा भारताच्या ’मंगळयान मोहिमे’ला झाला आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ऑर्बिटरमधला कॅमेरा हा सध्या चंद्राभोवती फिरणार्या मोहिमांमध्ये सर्वात शक्तिशाली कॅमेरा मानला जातो. त्यामुळे त्यातून मिळणारी माहिती ही सर्वात अचूक आणि तपशीलवार असते. याच कॅमेर्याच्या मदतीने ‘चांद्रयान-३’च्या ‘विक्रम’ लॅण्डरचा फोटो काढला गेला आहे आणि लॅण्डर खरंच उतरले का, हा प्रश्न विचारणार्यांना चपराक मिळाली आहे. लॅण्डरमधील रोव्हर, ’प्रज्ञान’ आता चांद्रपृष्ठभागावर उतरले आहे. त्याच्या चाकांवरील ’नासा’ आणि भारतीय मानचिन्ह सिंह याच्या खुणा चंद्रावर उमटवीत, त्याने आपले काम सुरू केले आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे होती. ती म्हणजे चंद्रावर यशस्वीरित्या उतरणे, ’प्रज्ञान’ रोव्हर यशस्वीपणे चांद्रपृष्ठभागावर चालवणे आणि लॅण्डर व रोव्हरवरील विविध उपकरणांच्या मदतीने शास्त्रीय प्रयोग पार पाडणे. त्याकरिता विविध उपकरणे यावर बसवण्यात आलेली आहेत.
लॅण्डरवरील 'Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive ionosphere and Atmosphere' (RAMBHA)या उपकरणाच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा आणि आयनांच्या घनतेचे मोजमाप केले जाणार आहे. (Chandra's Surface Thermo Physical Experiment)च्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाजवळील, विशेषतः ध्रुवीय प्रदेशातील, तपमानातील बदलांचा आढावा घेतला जाईल. Instrument for Lunar Seismic Activity' (ILSA) याचा उपयोग लॅण्डरच्या जवळपासच्या परिसरातील चंद्राच्या गर्भातील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याद्वारे चंद्राच्या एकंदर रचनेचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे, तर Instrument for Lunar Seismic Activity' (ILSA) याच्याद्वारे एकंदरच चंद्राच्या सिस्टीमचा अभ्यास करता येणार आहे.
‘प्रज्ञान’ रोव्हरवर दोन महत्त्वाची उपकरणे आहेत. त्यातील LASER Induced Breakdown Spectroscope' (LIBS) या उपकरणाद्वारे एकंदरच चंद्रावरील पृष्ठभागाचे परीक्षण करून त्यात आढळणारी मूलद्रव्ये आणि संयुगे यांचा अभ्यास केला जाईल. त्याद्वारे चांद्रपृष्ठाच्या रचनेची माहिती आपल्याला मिळेल. ’प्रज्ञान’वरील दुसरे उपकरण 'Alpha Particle X-ray Spectrometer (APXS)'याच्या साहाय्याने चंद्रावरील मातीमधील मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह (Mg, Al, Si, K, Ca,Ti, Fe)या मूलद्रव्यांचा शोध घेतला जाणार आहे. याव्यतिरिक्त प्रोपल्शन मोड्यूलमधील 'Spectro Apolarimetry of Hbitable Planet Earth (SHAPE)या उपकरणाच्या मदतीने इतर तार्यांभोवती फिरणार्या अतिशय अंधूक अशा ग्रहांचा शोध घेण्यासाठी केला जाईल.
‘प्रज्ञान’ रोव्हर आणि ‘विक्रम’ लॅण्डर ही उपकरणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरली आहेत. दि. २३ ऑगस्टपासून साधारण १५ दिवस दोन्हीचे कार्य चालू राहील. १५ दिवसांनंतर चंद्राचा हा भाग सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेल्यामुळे अंधारात जाईल आणि ’प्रज्ञान’ आणि ’रोव्हर’ला ऊर्जा पुरवणारे सोलर पॅनल बंद पडतील आणि या मोहिमेचा शेवट होईल. २३ तारखेपासूनचे १५ दिवस येणारी जास्तीत जास्त माहिती मिळवणे, यासाठी उपयोगी ठरणार आहेत. या माहितीचा अभ्यास करून त्यातून काय निष्कर्ष निघतात, हे पाहणे फारच उत्सुकतापूर्ण आहे.
’चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेनंतर अवकाश मोहिमा आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची शान वाढली आहे आणि त्याचे स्थान अधिक बळकट झाले आहे. चंद्रावरील पाण्याचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जातो. त्याचसोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चंद्राच्या निर्मितीनंतर दोन अब्ज वर्षांनंतर चंद्रावर होणारी स्थित्यंतरे पूर्णपणे थांबलेली आहेत. म्हणजे दोन अब्ज वर्षांपूर्वी सौरमालेत काय स्थिती होती, याचा अभ्यास करण्यासाठी चंद्र हा उत्तम स्रोत आहे. ’चांद्रयान-३’ मोहिमेची जागा ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे, जिथल्या काही ठिकाणी सूर्यप्रकाशदेखील कधीच पोहोचत नाही. म्हणजेच ही जागा कोणत्याही प्रारणांच्या मार्यापासून बरीच सुरक्षित आहे. या भागातील मातीचा अभ्यास हा मूलभूत संशोधनांसाठी अतिशय दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. चंद्रावरील पाणी हे भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल. जर भविष्यात चंद्रावर अवकाश मोहिमांसाठी तळ बनवण्याचा प्रयत्न झाला, तर हे पाणी ज्वलनासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि इंधन म्हणून लागणारा हायड्रोजन यांचा प्रमुख स्रोत राहणार आहे. त्याचबरोबर अवकाश मोहिमांसाठी लागणार्या मनुष्यबळासाठीदेखील या पाण्याची गरज लागणारच आहे. चंद्रावरील खनिजेदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. चंद्र आता भविष्यातील आंतरग्रहीय मोहिमांसाठीचा तळ म्हणून निश्चित होण्याच्या दृष्टीने ही पुढची पावले आहेत आणि भारताची ’चांद्रयान’ मोहीम या सर्व निष्कर्षांमध्ये जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
या सर्वांमधून भारताला आणि त्यातही भारतीय अवकाश संशोधन क्षेत्र तसेच इतर क्षेत्रांना काय फायदा झाला आहे, याचा विचार केला तर आपण या मोहिमेच्या यशातून खूप काही कमावले आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, चंद्रावर यशस्वीरित्या उतरणार्या महासत्तांच्या यादीत आपण पूर्णपणे स्वतःच्या कष्टाने पोहोचलो आहोत. यामुळेच आपला राष्ट्रीय सन्मान वाढला आहेच. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पतही अधिक वाढली आहे. अवकाश संशोधन आणि अवकाश मोहिमांच्या क्षेत्रातील भारताची कीर्ती आणि दबदबा वाढला आहे. तसेच, यातील तंत्रज्ञानातील भारताचे कौशल्य अधोरेखित झालेले आहे. या मोहिमेमुळे अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि दळणवळण क्षेत्रातील भारताच्या तांत्रिक क्षमतांमध्ये वाढ झालेली आहे. ’चांद्रयान-३’कडून मिळणार्या माहितीच्या आधारे चंद्रावरील भूगर्भशास्त्र, खनिजे आणि तेथील पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करून त्याद्वारे आपल्या एकंदरच अवकाश व विश्वाच्या आकलनात भरीव वाढ होणार आहे. या मोहिमेच्या यशामुळे भविष्यात आपल्याला अनेक परदेशी संस्था आणि देशांबरोबर मोहिमांची संधी उपलब्ध होते आहे.
भारताबरोबर भागीदारी करण्यासाठी आज अनेक नामवंत देश आणि संस्था उत्सुक आहेत, त्यात आता भरीव वाढ होणार आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी अशा जागतिक मोहिमांमध्ये सहभागी होण्याची भारताला संधी उपलब्ध होणार आहे. अवकाश क्षेत्र हे नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय मोठी संधी आहे. तांत्रिक कौशल्य, उत्पादन, दळणवळण आणि माहिती प्रसारण सारख्या क्षेत्रांमध्ये अनेक रोजगार यातून निर्माण होतील, ज्याचा थेट परिणाम आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावरदेखील दिसणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नवाढीसाठी ही पोषक अशी घटना आहे. या मोहिमेमुळे अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेकांना मोठी प्रेरणा मिळते आहे आणि भविष्यातही मिळत राहील. त्याद्वारे या क्षेत्राशी निगडित शिक्षण विभागातही अनेक संधी उपलब्ध होऊन, त्याचा दूरगामी सकारात्मक परिणाम भारताच्या शिक्षण क्षेत्रावर होताना दिसेल. या मोहिमेच्या यशामुळे केवळ अवकाश क्षेत्रातच नाही, तर तंत्रज्ञान क्षेत्रातच भारताची पत सुधारल्यामुळे अनेक प्रकल्पांना आणि त्यातील आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना मिळणार आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी या भागीदार्या महत्त्वाच्या ठरणार आहेतच.
’चांद्रयान’ मोहिमेसारख्या योजनांकरिता केले गेलेले संशोधन, निर्माण झालेले तंत्रज्ञान आणि संशोधन अनेकदा विविध इतर क्षेत्रांमध्येही क्रांतिकारी बदल घडवते. दळणवळण, उद्योग आणि वैद्यकीय यांसारख्या क्षेत्रात याद्वारे नवनवीन तंत्र आणि उपकरणे विकसित होण्यासाठी मदतच होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अतिशय सकारात्मक, उत्साहवर्धक, सर्व भारतीयांचा आत्मसन्मान वाढवणारी ही घटना ही सर्व हेवेदावे, धर्म, जात, पंथ, प्रदेश, सगळ्या सगळ्या अस्मिता विसरून आपण सारे भारतीय असल्याची भावना जागृत करणारी, भारताच्या उज्ज्वल इतिहासातली सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी, अशी गोष्ट आहे. हे नक्की
सारंग ओक
(लेखक ‘असीमित’चे संस्थापक असून पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्राचे संचालक आहेत.)
७२१९२५९१४९