मुंबईत २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

25 Aug 2023 19:09:44
International Tourism Festival In Mumbai City Suburbs

मुंबई :
शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर पुढील वर्षी दि. २० जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे.

या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, मुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यटन मंत्री गिरीष महाजन आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. यात या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित होत्या.



Powered By Sangraha 9.0