प्रा. जेरोम लेव्हीला असं आढळलं की, ‘अन्नपूर्णा-४’ या शिखराखालच्या जमिनीमध्ये काहीतरी भानगड आहे. फार तांत्रिक तपशीलात न जाता आपण असं म्हणू या की, इथल्या जमिनीचा पोत काहीतरी वेगळाच आहे. असं का घडलं असावं? भरपूर अभ्यास, विमानांमधून पाहणी आणि पायी हिंडून केलेली प्रत्यक्ष पाहणी या सगळ्यांमधून प्रा. जेरोम लेव्ही आणि त्याच्या अभ्यास गटाला जे काही आढळलं, त्याचा निष्कर्ष सर्वसाधारण भाषेत असा की, साधारण इसवी ११९० साली ‘अन्नपूर्णा-४’ या शिखराची उंची इतकी वाढली की, खालच्या खडकांना तो डोलारा पेलवेना. मग एक दिवस एक महाभूस्खलन झालं.
आपला महाराष्ट्र प्रदेश हा सह्याद्री पर्वतामुळे निर्माण झालेला आहे. गोंडवन किंवा गोंडवनालॅण्ड नावाची एक ‘टेक्टॉनिक प्लेट’ म्हणजे अवाढव्य असं भूखंड तुटलं-फुटलं. त्या एका विशाल भूखंडाचे अनेक तुकडे झाले. त्यावेळी अत्यंत भयानक असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्या ज्वालामुखीतून सह्याद्री पर्वत निर्माण झाला. सह्याद्री पर्वतातला दगड हा भूगर्भशास्त्रदृष्ट्या बेसाल्ट या जातीचा दगड आहे. अतिशय कठीण, कणखर असा हा दगड जगात जिथे-जिथे ज्वालामुखी पर्वत आहे, तिथे-तिथे आढळतो. सह्याद्रीच्या जन्माची ही घटना सुमारे १० ते १५ कोटी वर्षांपूर्वी घडली असावी, असा शास्त्राज्ञांचा अंदाज आहे.
आता ही ’टेक्टॉनिक प्लेट’ काय भानगड आहे? भूगर्भशास्त्राज्ञांच्या मते, आपल्या पृथ्वी या ग्रहावर ७१ टक्के भाग पाणी आहे, तर २९ टक्के भाग जमीन आहे. म्हणजेच पाणी हे मुख्य आहे. जगातले सगळे महासागर हे खरे म्हणजे एकच एक विशाल सरोवर आहे. खार्या पाण्याचं सरोवर म्हणा हवं तर. माणसाने आपल्या सोयीसाठी त्यांचे वेगवेगळे भाग कल्पून हिंदी महासागर पॅसिफिक महासागर वगैरे नाव दिली आहेत आणि ही जी २९ टक्के जमीन आहे, तिचे वेगवेगळे तुकडे-खंड-प्लेटस् या पाण्यावर तरंगत आहेत, अशा तरंगत-तरंगत त्या प्लेटस् एकमेकींच्या जवळ जात आहेत किंवा लांब जात आहे. म्हणजे बघा, सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी आजची दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे एकच एक मोठं भूखंड प्लेट होती. तिचा मध्यभाग म्हणजे आजच्या भारत देशातल्या मध्य प्रदेश राज्यातला गोडंवन हा भाग होता. म्हणून हेन्री बेनेडिक्ट मेड्लिकॉट या ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञाने त्या भूखंडालाच नाव दिलं-‘गोंडवनालॅण्ड.’
मेडलिकॉट हा मूळचा आयरिश इंजिनिअर होता. लेफ्टनंट जनरल जेम्स टॉमसन हा भारतातल्या ’ईस्ट इंडिया कंपनी’चा लष्करी इंजिनिअर होता. १८४७ साली त्याने तत्कालीन संयुक्त प्रांतात म्हणजे आताच्या उत्तराखंड राज्यात रुड़की या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. आधुनिक भारतातलं हेच ते पहिलं आणि नंतर अतिशय प्रख्यात झालेलं रुड़की (रुरकी) इंजिनिअरिंग कॉलेज. टॉमसनने ते भारतीय जनतेच्या भल्यासाठी काढलेलं नसून, ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या अधिकार्यांना भारताच्या भूभागाचं सर्वेक्षण आणि मापन करणं सोईचं व्हावं म्हणून काढलं होतं. हेन्री बेनेडिक्ट मेडलिकॉट या कॉलेजात प्राध्यापक म्हणून १८५४ साली दाखल झाला. त्याने उत्तर भारतात सर्वत्र खूप भ्रमंती करून भरपूर सर्वेक्षण केलं आणि अनेक संशोधन निबंध लिहिले. ‘गोंडवनालॅण्ड’ हा शब्द प्रथम त्याने वापरला.
त्यानंतर १९१२ साली जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ आल्फ्रेड लोथार वेग्नर याने असा सिद्धांत मांडला की, संपूर्ण युरोप खंड आणि आशिया खंडाच्या उत्तरेपासूनचा म्हणजे आर्क्टिक वर्तुळापासून भारतातल्या विंध्य पर्वतापर्यंतचा भाग हा एक सलग भूखंड एक ‘टेक्टॉनिक प्लेट‘ आहे. तिला त्याने नाव दिलं-‘युरेशियन प्लेट.’ दक्षिण भारताचा भूखंड, जो मुळात गोंडवनालॅण्ड या प्लेटचा एक तुकडा आहे, तो तुकडा गेली किमान ५० कोटी वर्षं सारखा या युरेशियन प्लेटला टक्करतो आहे. यामुळे युरेशियन प्लेटची कड चुरगळते आहे, वर उचलली जात आहे. ही वर उचलली जाणारी कड किंवा कडा म्हणजेच हिमालय पर्वत होय. म्हणून हिमालय पर्वताचा जन्म सुमारे ५० कोटी वर्षांपूर्वी झालेला असून, पृथ्वीवरच्या इतर विद्यमान पर्वतांच्या तुलनेत तो फारच तरुण पर्वत आहे. हुश्श! आपण फक्त शून्ये मोजायची, नाही का? ५० कोटी काय नि १०० कोटी काय नि १५० कोटी काय! ही अचाट कालगणना म्हणजे एक भरलेलं चुरमुर्याचं पोतं आहे आणि आमचं आयुष्य यातल्या एका चुरमुर्याएवढंसुद्धा नाही.
असो. तर भूगर्भशास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की, गोंडवना प्लेटचा तुकडा अजूनही युरेशियन प्लेटला टक्करतोच आहे, तिच्या खाली घुसतो आहे. यामुळे हिमालयाची उंची वाढते आहे. ही सगळी प्रक्रिया अतिशय सूक्ष्मपणे गेली कित्येक सहस्रके चालू आहे. यामुळे आपल्याला ती जाणवत नाही.
फ्रान्स देशातल्या लोरेन विद्यापीठातला एक भूगर्भशास्त्र प्रा. बेरोम लेव्ही याला असा प्रश्न पडला की, ठीक आहे बुवा, हिमालयातल्या शिखरांची उंची, अशी अगदी सूक्ष्मपणे वाढून-वाढून कुठवर वाढेल? हिमालयाचं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट आज २९ हजार फूट उंच आहे. ते किंवा अन्य शिखरं येत्या किती हजार वर्षांत किती वाढतील? किंवा खरं म्हणजे, आतापर्यंत ही नुसतीच वाढत राहिली आहेत का? की वाढत्या उंचीचा डोलारा न पेलवून ती कोसळली आहेत? प्रा. लेव्हीला असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे, २०१२ साली नेपाळमध्ये गंगेच्या खोर्यात तो काही संशोधन करीत होता. नेपाळच्या गंडकी नदीच्या खोर्यात ‘अन्नपूर्णा’ ही एक विशाल पर्वतरांग आहे. ‘अन्नपूर्णा-१’ या एका डोंगराची तीन उत्तुंग शिखरं आहेत. मग ‘अन्नपूर्णा-२’, ‘अन्नपूर्णा-३’ आणि ‘अन्नपूर्णा-४’ अशी या पर्वतरांगेची एकूण सहा शिखरं आहेत. गंडकी नदीला ‘गंडक’ किंवा ‘नारायणी’ अशीदेखील नावं आहेत. ही पुढे गंगेला मिळते. गंडकी नदीतच शाळिग्राम शिळा सापडतात. ३०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी गंडकी नदीतून शाळिग्राम शिळेची जगदंबेची मूर्ती घडवून आणून तिची प्रतापगडावर स्थापना केली होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये नेपाळच्या गंडकी खोर्यातूनच दोन महाकाय शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल झालेल्या असून, त्यांच्यापासून प्रभू रामचंद्राची मूर्ती घडवण्यात येणार आहे, हा वर्तमान इतिहास आहे.
तर प्रा. जेरोम लेव्हीला असं आढळलं की, ‘अन्नपूर्णा-४’ या शिखराखालच्या जमिनीमध्ये काहीतरी भानगड आहे. फार तांत्रिक तपशीलात न जाता आपण असं म्हणू या की, इथल्या जमिनीचा पोत काहीतरी वेगळाच आहे. असं का घडलं असावं? भरपूर अभ्यास, विमानांमधून पाहणी आणि पायी हिंडून केलेली प्रत्यक्ष पाहणी या सगळ्यांमधून प्रा. जेरोम लेव्ही आणि त्याच्या अभ्यास गटाला जे काही आढळलं, त्याचा निष्कर्ष सर्वसाधारण भाषेत असा की, साधारण इसवी ११९० साली ‘अन्नपूर्णा-४’ या शिखराची उंची इतकी वाढली की, खालच्या खडकांना तो डोलारा पेलवेना. मग एक दिवस एक महाभूस्खलन झालं. याचा आकार-प्रकार किंवा आवाका केवढा असावा? आता आपल्याला माहीतच आहे की, हिरोशिमा आणि नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बनी ती शहरं क्षणार्धात भुईसपाट केली. परंतु, आपल्याला हे माहीत नसतं की, १९६१ साली सोव्हिएत रशियाने ’झार बाँबा’ या अण्वस्त्राचा चाचणी अणुस्फोट केला होता. हा बॉम्ब जपानवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा तीन हजार पट अधिक शक्तिशाली होता. नशीब की तो फक्त चाचणी करण्यापुरताच मर्यादित राहिला, तर ‘अन्नपूर्णा-४’ शिखर कोसळताना जे काही घडलं (त्याला स्फोट म्हणता येणार नाही. कारण तिथे अग्नी नव्हता) ते झार बॉम्बच्या सहा पट मोठं होतं. किमान २७ क्युबिक किलोमीटर्स एवढा खडक खाली कोसळला आणि त्याने निदान काही काळ गंडकी नदीचा प्रवाहच रोखून धरला.
’नेचर’ या प्रख्यात अमेरिकन वैज्ञानिक नियतकालिकात प्रा. लेव्हीने आपलं हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. यामुळे अमेरिकन वाचकांना कळावं म्हणून लेव्ही लिहितो की, ’एवढ्या प्रमाणातल्या दगडधोंड्यांच्या वर्षावाने न्यूयॉर्क शहरातला मॅनहॅटन हा संपूर्ण भाग लुप्त होऊन गेला असता आणि अख्खी एम्पायर स्टेट बिल्डिंग झाकून गेली असती. मॅनहॅटन विभागांची एकंदर लांबी-रुंदी ८७ चौरस किमी आहे आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगची एकंदर उंची १ हजार, ४५४ फूट किंवा ४४३ मीटर्स आहे. आता एवढा जबरदस्त लॅण्ड स्लाईड-भूस्खलन घडत असताना आणखी काय घडलं असेल? संपूर्ण नेपाळ आणि त्याच्या लगतच्या उत्तर भारतातल्या भूभागात जमीन दरादरा हादरली असेल का? माहीत नाही. ११९०च्या अधीपासूनच उत्तर भारतावर सतत मुहम्मद घोरीची आक्रमणं चालू होती. ११९२ सालच्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहान घोरीकडून पराभूत झाला. पुढे एकापाठोपाठ एक सुलतानी सत्तांनी उत्तर भारतात इतका भयानक विध्वंस केला की, कुण्या विद्वानाने या भूकंपाची नोंद केली असलीच, तरी आज ती उपलब्ध नाही.
प्रा. जेरोम लेव्हीच्या या संशोधनातून आपण काय प्रेरणा घ्यायची गरज आहे? सह्याद्री पर्वताची उत्पत्ती दहा ते १५ कोटी वर्षांपूर्वी झाली. त्याच्या पूर्व उतारावर म्हणजे आजच्या भाषेत ज्याला ‘दख्खनचे पठार’ म्हणतात, त्या पठारावरच आजचा महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडू वसलेले आहेत. पण सह्याद्रीचा पश्चिम भाग? ज्याला आज आपण कोकण म्हणतो, त्याचं वय किती? आपली परंपरा सांगते की, भगवान परशुरामाने सह्याद्रीच्या शिखरावर उभं राहून पश्चिमेकडच्या समुद्रावर ब्रह्मास्त्र सोडलं. समुद्र मागे हटला. एक चिंचोळी किनारपट्टी निर्माण झाली. या कथेचे काही पाठभेदही (व्हर्जन्स) आहेत. एका पाठात म्हटलंय भगवंताने सात दिव्य बाण सोडले. त्यामुळे सात भूखंड निर्माण झाले. म्हणून ते सप्तकोकण.
एका पाठात म्हटलंय परशू फेकला आणि समुद्र मागे हटवला. मग भूमी निर्माण केल्यावर भगवंताने वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळे उद्योगधंदे करणारे लोक बोलावून आणले आणि ही नवी भूमी वसवली. नांदती केली. हे सगळं केव्हा घडलं असेल? आज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने आपल्याला जी विपुल साधनं उपलब्ध करून दिली आहेत, त्यांचा सुयोग्य वापर करून आम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. फ्रान्स देशातला एका वैज्ञानिक सतत दहा वर्षं अभ्यास करून आमच्या हिमालयातल्या एका भूवैज्ञानिक घटनेवर संशोधन करतो. त्यावर अमेरिकेतल्या संशोधन पत्रिकेत निबंध लिहितो.
आम्ही आमच्या दख्खनच्या पठाराचं, सह्याद्रीचं, कोकणचं संशोधन केव्हा करणार? आपल्या परंपरेनुसार कोकण निर्मितीची ही घटना २५ लाख वर्षांपूर्वी घडली. या परंपरेला आधुनिक विज्ञानाचा भक्कम आधार आम्ही द्यायला हवा. पाश्चिमात्य विद्येने डोकं फिरलेला माझा एक उच्चशिक्षित मित्र एकदा मला सांगू लागला की, “कोकणातले तुम्ही सगळेच लोक, सगळ्याच जाती-जमाती, तुम्ही परदेशी आहात. कुणी इजिप्तमधून आले. कुणी इथियोपियातून आले. कुणी पॅलेस्टाईनमधून आले. कुणी अरबस्तानातून आले. तुम्ही मूळचे या भूमीतले नाही.” मी त्याला म्हटलं, आमच्या परंपरेनुसार कोकणची निर्मिती आणि वसाहत २५ लक्ष वर्षांपूर्वी झाली. त्या काळात हे तुझे इजिप्त आणि इथियोपिया नि पॅलेस्टाईन अस्तित्वात तरी होते का?