७०हून अधिक गडकिल्ले तसेच जगातील उंच शिखरांपैकी एक किलीमांजारो सर करणारी नऊ वर्षीय ग्रिहिथा विचारे हिच्या जिद्दीची चित्तरकथा...
दि. ८ ऑगस्ट २०१४ रोजी ठाण्यात जन्मलेल्या कुमारी ग्रिहिथा सचिन विचारे हिला बालपणापासून घरातच गिर्यारोहणाचे धडे मिळत होते. वडील सचिन विचारे आणि आई स्नेहा विचारे हे दोघेही नोकरी करतात, तर मोठी बहीण हरिता यंदा इयत्ता दहावीत शिकत आहे. नोकरी सांभाळून गिरीशिखरांवर चढाई करण्याचा छंद जोपासणार्या वडिलांकडून तिला प्रेरणा मिळाली. दर शनिवार आणि रविवारी ते गिर्यारोहणाला जायचे, त्यातून ग्रिहिथालाही गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली अन् वडिलांचा हाच वारसा घेऊन चिमुकली ग्रिहिथा गिर्यारोहणाचा छंद जोपासत असून, तिची जिद्द पाहिली तर ’ग्रिहिथा’पुढती शिखर ठेंगणे! असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
घोडबंदर रोडवरील सरस्वती विद्यालयात इयत्ता चौथ्या इयत्तेत शिकत असलेल्या ग्रिहिथाने इयत्ता दुसरीत असतानाच कर्नाळा गिरीशिखरांवर पहिली चढाई केली. तिच्या आईवडिलांनी पहिलीमध्ये ग्रिहिथाला या आगळ्या-वेगळ्या क्षेत्राची ओळख करून दिली, तिनेही एक मौज म्हणून या साहसी खेळासाठी स्वतःला पूर्ण जोमाने झोकून देण्याचे ठरवले आणि नंतर आणखीही काही खूप गोष्टींचा आग्रह धरला. तिला गिर्यारोहण आवडते. कारण, तिला निसर्गाच्या, पर्वतांसोबत राहायला खूप आवडते. अतिशय प्रेमळ, बोलकी, मैत्रिपूर्ण आणि अवखळ स्वभावाच्या ग्रिहिथाला गिर्यारोहणासोबतच चित्र काढायला, रंगकाम, नृत्य आणि खेळायलाही आवडत असल्याचे ती सांगते.
मागील दोन वर्षांपासून ग्रिहिथा तिच्या वडिलांसोबत गिर्यारोहणाला जात आहे. ग्रिहिथाने आजवर ७०पेक्षा जास्त गडकिल्ले, डोंगर आणि जंगलात गिर्यारोहण पूर्ण केले आहे. ज्यात सामान्य गिर्यारोहण, उंच-चढण गिर्यारोहण, जंगल गिर्यारोहण आणि तांत्रिक चढाई यांचा समावेश आहे. वडिलांसमवेत तिने गोपाळगड, दाभोळ यांसारख्या कमी उंचीवरील लहान किल्ल्यां/टेकड्यांवर गिर्यारोहण सुरू केले. सोंडई, पन्हाळा, अगोदा, चापोरा, कर्नाळातील दिंडेश्वर टेकडी, नवरा नवरी शिखर, कर्नाळा किल्ला, हरिहर किल्ला, ईर्शाळगड, सोंडाई, गोपाळगड, अवघड रतनगड, सुधागड, सांधण व्हॅली वगैरे काही सामान्य गिर्यारोहण केले आहेत. ढाक भैरी आणि जीवधन तर तिने दोनदा सर केले आहे. याशिवाय गोरखगड, बोरंड्याची नाळ, भीमाशंकर मार्गे शिडी घाट, आधाराई, काळू धबधबा, अलंग (४,५०० मीटर), मदन (४,९००), कुलंग(४,८२५) वगैरे गिर्यारोहण पूर्ण केले आहेत.
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहणापैकी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक (५ हजार,३६४ मीटर) तिने ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण केला आहे.
असामान्य गिर्यारोहणाच्या ईर्षेतून तिने जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक किलीमांजारोवर कूच करण्याचे ठरवून यंदाच्या स्वातंत्र्य दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, हे स्वप्न सत्यात उतरवले. दक्षिण आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारो हे उंच शिखर तिने यशस्वीरित्या सर केले. ग्रिहिथाच्या या उत्तुंग कामगिरीने जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक असलेल्या माऊंट किलीमांजारोवर भारतीय तिरंगा ध्वज फडकवणारी सर्वात कमी वयाची भारतीय होण्याचा मान तिने पटकावला आहे. ग्रिहिथाच्या या मोहिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या हाती तिरंगा सुपुर्द करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले होते.
ग्रिहिथा आणि तिचे वडील जेव्हा-जेव्हा गिर्यारोहणाला जातात, तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छतेला विशेष प्राधान्य देतात. गिर्यारोहक व पर्यटकांनी फेकून दिलेले चॉकलेट रॅपर्स, डोंगरावर फेकलेल्या रिकाम्या बाटल्यांचा कचरा गोळा करून दोघीही बापलेक डोंगर आणि गडकिल्ले स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.
बालवयातच ग्रिहिथाने विविध सन्मान व पुरस्कारांना गवसणी घातली आहे. ’एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ पाच वेळा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तसेच अनेकदा तिला प्रशंसित करण्यात आले आहे. याशिवाय, ‘राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२३’, ‘महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्कार’, ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२३’ तसेच ‘ध्रुवरत्न पुरस्कार’ आणि ‘नवदुर्गा पुरस्कारा’नेही तिला गौरविण्यात आले आहे.
ग्रिहिथा आपल्या समवयीन पिढीला वडीलकीप्रमाणे संदेश देते. लहान वयात मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि मैदानी खेळ खेळण्यास विशेष प्राधान्य द्या. त्याचबरोबर नेहमीच थोरामोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्याला जे आवडते, त्यात १०० टक्के प्रयत्न आणि समर्पण असलेच पाहिजे, असे ती सांगते. भविष्यात तिला उत्तम गिर्यारोहक बनायचे असून, प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर तिला सर करायचे असल्याचा मानस ती व्यक्त करते. माऊंट एव्हरेस्ट (८ हजार, ८४९ मीटर), अमा दाबलम (६ हजार, ८१२ मीटर), अन्नपूर्णा (८ हजार, ९१ मीटर), माऊंट युनाम आदी अत्युच्च शिखरे पादाक्रांत करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे. अशा या गिरीप्रेमी ग्रिहिथाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!