मुंबई (समृद्धी ढमाले): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करणाऱ्या अनेक समुद्री पक्ष्यांची रेलचेल किनापट्टीवर दिसुन येत असते. यंदाही राज्याच्या किनापट्टीवर समुद्री पक्ष्यांच्या काही नोंदी झाल्या आहेत. यामध्ये व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड, ब्राउन नॉडी, कॉमन टर्न, गुलबील टर्न, सुटी टर्न, मास्क्ड बुबी, पेट्रल अशा अनेक पक्ष्यांचा समावेश आहे.
यामधील जूनच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गतील कुडाळ किनाऱ्यावर आढळलेली पक्ष्याची नोंद अत्यंत दुर्मिळ आहे. कारण, हा पक्षी दक्षिण आफ्रिकेवरुन भारतात आल्याची नोंद त्याच्या पायात असलेल्या रिंगमुळे झाली आहे. व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड असं या पक्ष्याचं नाव असुन त्याचा अधिवास उष्णकटिबंधीय अटलांटिक, पश्चिम पॅसिफिक आणि हिंद महासागरात आढळतो.
मास्कड बुबी हा पक्षी दरवर्षी राज्याच्या किनाऱ्यावर आलेला पहायला मिळतो. यंदाही त्याची पालघर, मुंबई आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांतुन नोंद झाली आहे. मुख्यत्वे उष्णकटीबंधीय महासागरांमध्ये आढळणारा हा पक्षी आहे. सुटी टर्न या पक्ष्याची मुंबईच्या किनाऱ्यावर नोंद केली गेली आहे. पेट्रल पक्षीही पावसाळ्याच्या सुरूवातीला जुहूच्या किनाऱ्यावर आढळला होता. दुर्दैवाने या पक्ष्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. स्थलांतरीत पक्षी आणि काही विशिष्ट कालावधीत येणाऱ्या पक्ष्यांच्या या नोंदी संशोधकांसाठी आणि पक्षीमित्रांसाठी महत्त्वपुर्ण ठरत आहेत.
अनेक ठिकाणी किनारी भागात येणाऱ्या समुद्री पक्ष्यांच्या नोंदी आणि त्यांच्या उपचारांसाठी काम करता यावं या उद्देशातुन सीबर्ड्स ऑफ इंडिया काही पक्षीमित्र आणि संशोधकांचा गट तयार करण्यात आला आहे. या पक्ष्यांविषयी जगजागृती करण्याचे काम या मार्फत केलं जात आहे.
काय आहेत कारणे?
पावसाळ्याच्या काळात हे पक्षी किनाऱ्यावर येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची म्हणजे समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांमुळे हे पक्षी भरकटुन किनाऱ्यांवर येतात. काही पक्षी थकुन विश्रांतीसाठी काही काळ किनारा जवळ करतात तर काही पक्षी दुखापत होऊन ही किनाऱ्यावर आल्याच्या घटना आहेत. वादळामध्ये हवेचे प्रमाण जास्त असले किंवा जखमेमुळे पंख खराब होऊ लागले तर काही समुद्री पक्षी किनारा जवळ करतात. अशावेळी किनाऱ्याजवळ आलेले पक्षी लक्षात आले तर त्यांचे निरिक्षण केले जाते. काही जखम किंवा दुखापत नसेल तर त्यांना तसेच सोडुन दिले जाते. पण, दुखापत असलेली आढळुन आल्यास त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडुन दिले जाते.